Thursday, July 24, 2014

तरुणांनो विचार करा.



     आंदोलने होतात. संतप्त तरुणांकडून   दगडफेक होते.पो लिस येतात. तरुणांना   पकडून   नेतात.नतंर त्या 
तरुणांना कळते आपण कोणती चुक केली. राजकारणी सोडविण्यास येतातच असे नाही. राजकारण्यांच्या वादात सामान्य कार्यकत्ते व तरुणाई बेफ़ाम होते.तरूणांना भडकवण्याइतके सोपे दुसरे काही नसते, हे राजकारणी लोकांनी चांगले ओळखले आहे. त्यामुळेच मोर्चा, आंदोलन असो वा एखादी दंगल यामध्ये तरूणांची फौज आघाडीवर दिसते. आजची तरुणाई पुढचा पाठचा विचार न करता आंदोलनात उतरते. 




गरम रक्त असते, परिणामांची तमा नसते. त्यामुळेच या तरूणांकडून त्या गर्दीत दगडांचा वर्षाव केला जातो. मात्र अशा भिरकावलेल्या एका दगडाची मोठी किंमत राज्यातील शेकडो तरूण आज मोजत आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.





एकट्या-दुकट्याला असे धाडस होत नाही. पण गर्दीत कोण बघतंय, म्हणून दंगल किंवा आंदोलनात दगड भिरकावण्याचे धाडस केले जाते. लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अलिकडे आंदोलनाची संख्या वाढली आहे. सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने सर्वांनाच दिला आहे. पण अलिकडे आंदोलनात हिंसक मार्गाचा वापर वाढत आहे. यामध्ये तरूण पुढे असतात. नेते आपली पोळी भाजून घेतात, मात्र बळी जातो तो गुन्हा दाखल झालेल्या तरूणांचा. केवळ कोल्हापूर शहरात चार महिन्यांत ८० तरूणांवर गुन्हे दाखल झाले. संपूर्ण राज्यात असे गुन्हे दाखल झालेल्यांची संख्या शेकड्याने असेल. अशा तरूणांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. कोणी तरी भडकावतो म्हणून गर्दीत घुसून दगड मारण्यापूर्वी तरूणांनी दहादा विचार करायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. परिणामी त्यांच्यावर दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल होतात. पूर्वी चित्रिकरणाची सोय नव्हती, पण आता मोबाइलवर सहज चित्रिकरण होऊ शकते. सीसीटीव्ही असतात. वृत्तपत्रांतून फोटो छापून येतात. त्यामुळे दगड मारणारे अलगद सापडतात. याचा विचार करून तरुणांनी हिंसक आंदोलनात सहभागी होताना विचार करायलाच हवा. गुन्हा दाखल असतो, त्याला सरकारी नोकरी मिळत नाही. पासपोर्ट मिळत नाही. राज्यात आज असे अनेक तरूण आहेत, ज्यांच्या हातात डिग्री आहे, चांगले मार्क आहेत, पण त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का आहे. ते गुन्हेगारी वृत्तीचे नक्की नाहीत, पण चुकून, भावनेच्या भरात गुन्हा घडला आहे. जोपर्यंत ते निर्दोष सुटत नाहीत, तोपर्यंत आरोपी म्हणून शिक्का कायम राहणार. कोर्टांचा अनुभव बघता लवकर निकाल लागत नसल्याने या तरूणांना वाट पाहावी लागते. कोल्हापूर पोलिसांनी याचे गांभीर्य ओळखून प्रत्येक कॉलेजवर जाऊन जाणीवजागृती मोहीम राबवायचे ठरविले आहे. शालेय मुलांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांनाही त्याचे गांभीर्य पटवून देण्यात येत आहे. अशा मोहीमा मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर राबवायला हवी.

तरुणांनो आंदोलनात भाग घेण्यापूर्वी विचार करा.गेलेली वेळ  व घडलेला गुन्हा पुन्हा मागे घेता येत नाही. तरुणांनो,सावध रहा. नुकसान तुमचेच आहे.  

No comments: