Monday, September 1, 2014

उत्सवाचा 'इव्हेंट' होतोय?


भारतीय संस्कृतीत सणवार, व्रतवैकल्ये, उत्सवांना विशेष महत्त्व आहे.प्रत्येक सणाला धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व आहे.  भारतातील तेहतीस कोटी देव, त्यांच्याशी निगडीत असलेल्या पौराणिक कथा, निसर्गात सतत घडणारे बदल, ऋतुमान या सर्वांशी सांगड घालून विविध सणवार यांची निर्मिती झाली.तसेच दैनंदिन आयुष्य जगताना आपण कंटाळून जात असतो. काहीतरी नवीन घडण्याची वाट पहात असतो. माणसाच्या या सतत नाविन्याच्या आणि बदलाच्या ओढीने तो समारंभासाठी निमित्ते शोधत गेला.सणाचा दिवस आनंदाचा दिवस करतो, हे जर खरे तर आनंदाचा दिवस आपण नेहमीच का करू नये?सणाच्या दिवशी आपण गोड खाणं करतो, फराळ करतो, दिवाळीत तर फटाके उडवितो. हे सर्व गोष्टी करण्यामागे आपला हेतू कालपर्यंत असलेलं दु:ख विसरणं हाच असतो.उत्सव हा जीवनाचा भाग आहे उत्सव जीवनासाठी आहेत जीवन उत्सवासाठी नाही हे विसरून चालणार नाही. प्रत्येक सण हा लोकांनी आपल्या जीविताचे आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेला अधिक महत्व देऊनच साजरे करायला हवेत.उदास मनाच्या काळोख्या आयुष्यातही चैतन्याची सळसळ हे सणवार निर्माण करते.म्हणूनच मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे.सणवार-उत्सव साजरे करण्यामागे आपले पालक, कुटुंबीय, निसर्ग या गोष्टींचं स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मुख्य उद्देश असतो.    


 गोकुळ अष्टमी,श्री गणेश चतुर्थी,नवरात्र उत्सव, दीपावली, होळी हे मोठे सण उत्साहात साजरे केले जातात.यंदा या सणांना वेगळा रंग, वेगळे महत्त्व आले आहे.भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्व सा-या जगालाच परिचित आहे पण आज होत चाललेला भारतीय सांस्कृतीचा  -हासाला हे सण साजरे करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होण्यास कारणीभूत होत आहे. त्यातील काही बदल स्वागतहार्य तर काही बदल आक्षेपाहार्य आहेत.   


दहा थरांच्या दहीहंडय़ा, लाखापासून २५ लाखांपर्यंतची बक्षिसे, उंच गणेशमूर्तींची वाढती स्पर्धा,पर्यावरणस्नेही मातीच्या मूर्ती न बनवता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंचच्या उंच मूर्ती तयार करणे, रात्रभर रोषणाई चालू ठेवून विजेची उधळपट्टी करणे,जाहिराती करायच्या, दूरचित्रवाणी वाहिन्यांना त्यांच्या प्रक्षेपणासाठी पैसे मोजायचे,करोडो रुपयांची उलाधाल,दानपेट्या पैशानी व दागिन्यांनी भरुन वाहतात,उत्सवांसाठी वर्गणी काढली जाते, तिला खंडणी म्हणता हा भाग वेगळा,ध्वनिप्रदूषणाचे म्हणाल तर त्याचे काय एवढे? ,गोविंदा नाचला, जितेंद्र नाचला, बिपाशा आली, माधुरी बोलली की ते सगळे खूश होतात,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पायदळी तुडविले जातात ते पाहत पोलीस गप्प बसतात,  डीजेच्या माध्यमातून तालावर नाचता येईल अशी गाणी, स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या छायाचित्रांचे फ्लेक्स सणवार भव्य झळकू लागले आहेत.फटाक्यांच्या आवाजानी व धुरानी प्रदुषण वाढते,लांबलचक फटाक्यांच्या माळा भर रस्त्यात लावून धूरच धूर करत पैसे कापरासारखे जाळणे, होळीत रंगाची उधळण होते पण नतंर रंगांचा वाईट त्रास होतो.उत्सवांतली सांस्कृतिकता हरवत चालली आहे का? उत्सवाचा 'इव्हेंट' होतोय हे खरा आहे.लोकमान्यांनी उत्सव चालू कशासाठी केला हे लोक पार विसरले आहेत.

फक्त स्थानिक राजकारणी आणि उद्योजकांना जास्त फोकस करणारा हे इव्हेंट होतोय काय?प्रत्येक उत्सवांत धांगडधिंगा, पैशांचा खेळ, आयोजक नेत्यांनी चाटून-माखून ओरपलेला राजकीय फायदा.राजकीय पक्षांचा, बिल्डरांचा या उत्सवांमधील शिरकाव स्पष्टपणे दिसतो आहे.त्सवाच्या थाटामाटात भर पडली असली तरी त्यामुळे मूळ हेतूपासून हा उत्सव भरकटू नये ही चिंताही वाटते. उत्सव म्हणजे असते काय?



वाचण्यात आलेले उत्सवांचे मार्मिक विडंबन  



उत्सव म्हणजे असते काय?
जनतेच्या पैशाचा चुराडा
उत्सव म्हणजे दारू पिऊन
घालायचा राडा॥ १॥
उत्सव म्हणजे रस्तोरस्ती 
जाहिरातीच्या उभ्या कमानी
उत्सव म्हणजे वर्गणीसाठी
'दादा' लोकांची मनमानी॥ २॥
उत्सव म्हणजे श्रवण यंत्रावर
ध्वनीचा भडिमार
'मुंगळा' नृत्याचे
बीभत्स प्रकार॥ ३॥
उत्सव म्हणजे निरुद्योगांना
कमवायचे साधन
उत्सव म्हणजे मिरवणुकीत
हिडीस असभ्य वर्तन॥ ४॥
उत्सव म्हणजे असतो
राजकारणाचा धंदा
आपसातील भांडणाने वाढवायचा
स्वत:चा फायदा॥ ५॥
असे असूनही आपण सारे
उत्सवाची वाट पहातो
स्वत:च्याच हाताने
पायावर धोंडा पाडतो॥ ६॥



सर्व सण-उत्सव, व्रतवैकल्यांमागे व्यापक विचार असल्याचे दिसते. आधुनिक काळाशी सुसंगत बदल करत या ठेव्याचं जतन, संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. 

No comments: