Sunday, April 19, 2015

'मुलगाच हवा'........मानसिकता बदलावी.


मुलगा न होता दुसरी मुलगी झाली म्हणून आपल्या पाच दिवसांच्या चिमुरडीला हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची कबुली सुजाता गायकवाड या महिलेने दिली.मुलीचा दुर्दैवी मृत्यू नसून खून केला आहे.ही क्रूरता तिने कोणच्यातरी दडपणाखाली केले असण्याची शक्यता आहे.आपल्या मुलीला अशा प्रकारे मारण्याचे कृत्य करणे हे आई नात्याला या कालिमा लावणारे आहे.      


स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सातत्याने जनजागृती करूनही २०१३ व २०१४ या दोन्ही वर्षांमध्ये मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले नसल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.एक हजार मुलांमागे ९५० मुली हा जन्मदर समाजस्वास्थासाठी महत्त्वाचा मानला जातो, मात्र मुंबईमध्ये हे प्रमाण सध्या एक हजार मुलांमागे ९३० मुली इतकेच आहे.मात्र राज्यातील काही भागात मुलींचा जन्मदर वाढत असल्याच निर्दशनात आले आहे.



गर्भलिंग निदान करून स्त्री-भ्रूणहत्या करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात असल्याने  'मुलगाच हवा'चा अट्टहास असलेली अनेक जोडपी शेजारच्या राज्यांमध्ये जाऊनही गर्भपात करून घेतात.


मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, हुंडा घेऊन वरच्या आर्थिक स्तरात जाण्याची संधी; तर मुलगी म्हणजे परक्याचं धन, लग्नाचा खर्च. म्हातारपणाची काठी म्हणजे मुलगाच याचा पगडा, मुलीला असणारं दुय्यम स्थान यामुळे मुलगाच हवा यासाठी प्रयत्न केले जातात.


 मुलीला शिक्षण, चांगलं आरोग्य, वाढीसाठी आश्वांसक, हिंसारहित वातावरण कसं मिळेल, तिच्या अंगभूत क्षमतांना फुलण्याची संधी कशी मिळेल यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे. पण त्याआधी तिचा जन्माला येण्याचा-जगण्याचा अधिकार तिला मिळवून द्यायलाच लागेल.


‘आम्हाला हवा होता मुलगा, पण एका पाठोपाठ तुम्ही पोरीच जन्माला आलात’ हे आई-वडिलांचे उद्गार सतत यांच्या कानावर पडत असत. मुलगा हवा असताना मुलीच झाल्या म्हणून आईवडिलांनी सतत मुलींची आबाळ केली. दुर्लक्ष केले. स्वतःच्याच आई-वडिलांच्या घरी त्या उपेक्षित, निराश्रित मुलींसारख्या वाढल्या. परिणाम? या बहिणींच्या मनात आई-वडिलांविषयी आदर, प्रेम नाहीच; आहे ती फक्त चीड! तिरस्कार!

मुलीला गळ्यातील धोंडा समजून पालनपोषण करणं, या मानसिकतेचं आपण काय करणार आहोत? त्या स्त्रीच्या हतबलतेचं, निराशेचं आपण काय करणार आहोत? आजही एक मोठा वर्ग या मानसिकतेचा गुलाम आहे.

मुलगी नको म्हणण्याच्या, मुलगी नको म्हणून तिला जन्माला न घालण्याच्या, मुलगी झाली की नाक मुरडण्याच्या या मानसिकतेत कधी बदल होईल की नाही? 


 मुलगा असो वा मुलगी, निसर्गाने आपल्याला जे काही दिलं आहे, त्याचा आनंदाने स्वीकार करण्याची सवय समाजाला लागण्यासाठी विविध आघाडय़ांवर वेगवेगळया पद्धतीने अनेकांच्या सहभागाने निराश न होता भगीरथ प्रयत्न सातत्याने केले गेले पाहिजेत. अन्यथा शिवाजी जन्माला आला तर पाहिजे पण दुसऱ्याच्या घरी. तसं मुलगी जन्माला तर आली पाहिजे, पण ती दुसऱ्याच्या घरी या अवस्थेतून बाहेर पडणं कठीण.

शासनाने  केलेल्या  कायद्याने व योजनेने  हा प्रश्न  सुटणार नसून समाजानेही आपली मानसिकता     बदलण्याची गरज आहे.मुलीच्या जन्माचे स्वागत करुन मुलाप्रमाणेच मुलींनासुद्धा मान, सन्मान, शिक्षण   देऊन  समान जगण्याचा  अधिकार दिला पाहिजे.


तिसरी मुलगी झाल्यानंतरदेखील निराश न होता मिठाई वाटणारेही आहेत. समाज सुधारल्याच्या या घटनेचं स्वागत केलं पाहिजे. तिसऱ्यांदा मुलीचा पिता झाल्याबद्दल मिठाई वाटणाऱ्याचं हार्दकि अभिनंदन केलंच पाहिजे. पहिल्या मुलीला- पहिली बेटी, धनाची पेटी किंवा पहिली बेटी, तूप रोटी, असं मनापासून वाटणारे कधी तरी भेटतात, नेहमी नाही.अलीकडच्या काही वर्षांत मला पहिली मुलगी झालेली आवडेल किंवा मला मुलगीच पाहिजे असं म्हणणाऱ्यांना जेव्हा मी, का बरं? मुलगा का नको असं विचारल्यानंतर मुलगा-मुलगी आजकाल समान आहेत, मला मुलगीच आवडते अशी उत्तरं मिळतात. यातून मुलाचा हव्यास भविष्यात कमी होईल, असे काही संकेत मिळतात. 

No comments: