Saturday, September 5, 2015

दुष्काळाचे संकट दूर करावे .







    दुष्काळ हा नैसर्गिक असण्यासोबतच मानवनिर्मितही आहे.
परतीचा मॉन्सूनदेखील   पडला नाहीतर राज्याला दुष्काळाला 
सामोर जावे   लागणार आहे.या अगोदरच्या सर्व दुष्काळाहून 
तीव्र असा हा दुष्काळ असेल.गेल्या काही वर्षांपासून पावसाचे 
खालावत    चाललेले  प्रमाण   लक्षात घेता सध्याच्या आणि 
भविष्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 
सरकारने नेमक्या      काय     उपाययोजना   केल्या आहेत?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य 
सरकारने पाणी नियोजनाच्या आपत्कालीन कोणत्या योजना
आखल्या     आहेत?  पावसाची अनियमितता व पावसातील 
खंड यामुळे सतत    टंचाई सदृश  परिस्थिती निर्माण होऊन 
त्याचा    मोठा परिणाम    कृषी    क्षेत्रावर  होत  आहे.टंचाई 
परिस्थिती      निर्माण      झाल्यानंतर करावयाच्या  उपाय 
योजनांसोबतच      दुष्काळावर       कायमस्वरूपी    उपाय 
योजण्यावर आपल्या सरकारचा भर राहिला पाहिजे.


    यंदाही पावसाने मोठी ओढ दिल्याने  खरिपाचे पीक हातून 
गेले.पिण्यासाठी    पाणी    कुठून आणायचे  हा  आज सर्वात 
चिंतेचा विषय बनला आहे.     दुष्काळाने  शेतकरी, सामान्य 
नागरिक आणि जनावरांच्या समोर भीषण समस्या उद्‌भवली 
आहे.   पण सरकारमध्ये     मात्र     नियोजनाचा अभाव आहे.
पाणीपुरवठ्याचे    अन्य कोणते   मार्ग राज्य  सरकार आणि 
महाराष्ट्र पाणीपुरवठा     नियोजन  प्राधिकरण अवलंबणार? 
हा    धोक्‍याचा इशारा     समजून   राज्य सरकारने तातडीने 
पाण्याचे     नियोजन      आणि     पाणीपुरवठ्याच्या अन्य 
पर्यायांबाबत विचार करायला हवा.


    गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात दुष्काळ पडतो.यावर कायमची
 उपाययोजना करण्याऐवजी दरवर्षी थातूरमातूर उपाययोजना
करून कोटय़वधी रुपये खर्च केले जात  आहेत.दुष्काळासारखा 
संवेदनशील     प्रश्न       जीवन-मरणाशी   जुळला  असताना 
दुष्काळाचे सोहळे साजरे करण्याची मानसिकताही  समाजात 
आहे. सामान्य     जनता   व गुरांसाठी  दुष्काळ मरणयातना 
देणारा      असताना दुष्काळाची     मलाई खाणार्‍यांसाठी  ही 
सुवर्णसंधी असते. चारा छावण्या व पाण्याचे टँकर लॉबीसाठी 
दुष्काळचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस असतात. 


       पॅकेजने दुष्काळाचे निवारण होत  नसते तर दुष्काळाचा 
सामना    करण्यासाठी  तात्पुरती मदत  असते. यातून काही 
प्रमाणात दिलासा    मिळू शकतो. दुष्काळ  निवारण करणारे 
जगात कोणतेही      पॅकेज    नाही. निवारणासाठी मानवाचे 
प्रामाणिक प्रयत्नच एकमेव पॅकेज आहे.

      सर्व विरोधी पक्षांनी राजकारण बाजुला ठेवून एकजुटीने 
या संकटाचा    सामना केला  पाहिजे.जनतेला जगण्यासाठी 
आणि जनावरे    जगवण्यासाठी ठोस   उपाय योजना करणे 
गरजेचे आहे.पावसाच्या पाण्यासह जमिनीखालील पाण्याचे 
साठे शोधण्याचेही प्रयत्न करायला हवेत. 

    भविष्यत दुष्काळ   हटवण्यासाठी आता पासूनच नियोजन 
केले तरच दुष्काळ टाळता  येईल. त्यासाठी जागो  जागी नदी 
अडून त्यावर सिमेंट काँक्रीटचे बंधारे घालावेत.त्यामुळे भूजल 
पातळीवर येण्यास मदत होणार आहे त्याशिवाय परिसरातील
 शेतीला ही पाणी मिळेल. राज्यात नदी जोड प्रकल्प राबवावा.

   मृदसंधारण, जलसंधारण,  नैसर्गिक  जैवविविधता टिकवून 
ठेवण्यासारखे कार्य निसर्गासाठी नसून मानवतेसाठीच वरदान
असल्याचे माणूस समजून घेईल, तेव्हा खर्‍या अर्थाने दुष्काळ 
निवारण     झाल्याशिवाय   राहणार नाही.कुठल्याही राजकीय 
व्यवस्थेचे अंतिम ध्येय हे आपली  जनता सुखासमाधानात व
सुरक्षित वातावरणात राहावी हेच प्रामुख्याने असावे. त्यासाठी 
लागणार्‍या    इच्छाशक्तीचा अभाव आजवर जाणवत असला, 
तरी  योग्य ती     धोरणे व त्यांच्या प्रभावी  अंमलबजावणीचा 
आग्रह धरला तर या मोठय़ा लोकसंख्येला  या गर्तेतून काढणे 
फारसे कठीण आहे असे वाटत नाही.

No comments: