Friday, September 18, 2015

तरुणाईचे परिवर्तन


तरुणाई म्हणजे सळसळते रक्त, प्रचंड उर्जा, नवं काही करण्याची जिद्द, धोके पत्करण्याची तयारी, उमेद,आशा-आकांक्षा, बंडखोरी आणि बरंच काही. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून अल्पावधीत मिळणारी लोकप्रियता आणि मिळकत यामुळे तरुण या माध्यमांकडे चटकन आकर्षित होतो आहे.आजच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांत काम करणार्‍या तरुणाईकडे कोणतेही काम करण्याची प्रचंड क्षमता, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास आहे.याना इलेक्ट्रॉनिक माध्यम हे आव्हानात्मक क्षेत्र नक्कीच आहे.तसेच कामामधील थरार इथे अनुभवायला मिळतोच.पण सातत्याने नवनवीन गोष्टी शिकायला मिळते. नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता,अद्ययावत माहितीचे संकलन, प्रचंड उत्साह आणि आव्हानांमुळे होणार्‍या शारीरिक आणि मानसिक ताणतणावांशी लढण्याचे सामर्थ्य ह्या तरुणाईत आहे.इलेक्टॉनिक मीडिया आणि तरुणाईच नाते फार घट्ट आहे. या वेगवान माध्यमाला सळसळत्या उत्साहाची गरज असते.कारण धावणार्‍या जगाबरोबर या माध्यमांनाही धावावे लागते.झपाटलेली तरुणाईच या नवीन माध्यमांना वेग मिळवून देत आहे.



 तरुणाईने बनवलेली इलेक्टॉनिक मीडिया आजची तरून पिढी वाहून गेली आहे. आजचे युग म्हणजे सोशल मिडियाचे युग.आजची पिढी या विश्वात पुरती डुंबून गेली आहे. इलेक्ट्रॉनिक जगातली हि एक नवीच कम्युनिटी तयार झाली आहे. इथेंच यांच जग आणि हेच यांच जगणे असे काहीसे होऊन बसले आहे. प्रत्येक तंत्रज्ञान निर्माण होण्याचा मुख्य उद्देश सोय हाच असतो. सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवलंय. कुठल्याही क्षणी, कुठल्याही गोष्टीवर आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सोशल मीडियाने आपल्याला दिले आहे. चांगल्या गोष्टी, विनोद, आपले आनंदाचे क्षण, आपल्या मनातील भावना सहज दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यात त्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी हे सोशल मीडियाचे व्यासपीठ खरंच खूप चांगले आहे.



पूर्वी मुलं गप्पा मारण्यासाठी कट्टय़ावर किंवा एखाद्या चौकात जमायची परंतु आता गप्पांसाठी उठून कुठे जायची गरजच उरली नाही. हातात इंटरनेट नावाचे एक आयुध आले. त्यात सोशल मीडिया नावाचे शस्त्र आले आणि तरुणाईच्या आवाक्यात आकाश आले. राजकारण, निवडणुका यांचेही व्यासपीठ तिथेच भरते. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून अनेकांना लोकांपर्यंत आपले विचार, मते, माहिती पोहोचविण्याचा एक नवा मार्ग पुढे आला आहे.तरुणाई या सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करीत आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधीही दिवसागणिक निर्माण होत आहेत.


सोशल मीडिया आपल्या आजच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सोशल मीडियाचा परिणाम आज जगण्याच्या सर्व अंगांना स्पर्श करतोय. म्हणून तर त्याचा जबाबदारीनंच वापर करायला हवा. कोणताही मीडिया हा काही चांगला किंवा वाईट नसतो. व्यक्ती आणि समूह त्याचा वापर कसा करतात यावर सारे अवलंबून असते. सोशल मीडिया नेमका कसा हाताळावा, त्यातून काय करावं आणि मुख्य म्हणजे काय टाळावे, हे अजूनही या तरुणाईला समजलेले नाही. हातातल्या स्मार्टफोनवर इंटरनेटचा पॅक घेता आला, लॅपटॉपवर इंटरनेटचे कनेक्‍शन मिळाले की सोशल मीडिया कसाही वापरायचा परवाना मिळाला,असं होत नाही.सध्या नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणे, माध्यमे यांचा भडीमार होत आहे. मित्रांच्या हातातील नवीन इलेक्ट्रॉनिक साधनांविषयीचे कुतूहल वाटणे नैसर्गिक आहे.या सुविधांची उपयुक्तता व आवश्यकता याविषयी तरुणांनी विचार करणे आवश्यक ठरत आहे.  


इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आवश्यकता संपून त्यांच्या आधीन जाण्याचा धोका व त्याचे परिणाम समाज अनुभवत आहे. ही अधिनता सुविधांचे व्यसन लागेपर्यंत पोहचलेली आहे. बहुतेक सर्व देशांमध्ये तरुणाईला लागलेल्या या व्यसनामुळे चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.आवश्यक असलेल्या सुविधांचा योग्य उपयोग न होता, व्यक्तीचा अमूल्य वेळ घातक व्यसनात रूपांतर होताना आपण पाहत आहोत. या परिवर्तनाच्या काळात तरुणांमध्ये सुदृढ मन, निर्णय क्षमता व व्यसनापासून स्वत:चे रक्षण करण्याची विवेकबुद्धी आवश्यक आहे.

No comments: