Sunday, October 18, 2015

मूल्ये जपली पाहिजेत.

                   

देशाची विविधता, सहिष्णुता आणि विभिन्नता या मूलभूत मूल्यांना धक्का लागू देणार नाही, तसेच या मूलभूत मूल्यांचे रक्षण करण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दादरी प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर केले आहे. 

भारत हा विविधता असलेला लोकशाहीवादी देश आहे.विभिन्नता आणि बहुविधता हे आपल्या देशाचे वैशिष्टय़ आहे.भारतातील विविधता, सहिष्णुता व विभिन्नता या सुसंस्कृत मूल्यांनी देशाची एकता अनेक शतके कायम राखली आहे.अनेक पुरातन संस्कृती काळाच्या ओघात नष्ट झाल्या. मात्र, भारतीय संस्कृती परदेशी आक्रमकांच्या अनेक आक्रमणानंतरही अद्याप टिकून आहे. आक्रमकांनी भारतावर अनेक वर्षे राज्य केल्यानंतरही ही संस्कृती काळाच्या ओघात टिकून आहे. याचे कारण भारतीय संस्कृती मूलभूत मूल्यांवर आधारलेली आहे.हे आपण लक्षात ठेवून या मूल्यांना धक्का लावणा-या गोष्टी टाळायला हव्यात.

देशाच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून समाजात बंधुभावाचे, एकमेकांना सांभाळण्याचे भान प्रत्येकाला असायले हवे आणि ते सगळ्यांनी बाळगायला हवे.देशाला एकोपा आणि शांततेची गरज असल्याने राजकीय नेत्यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करुनयेत.देशातील राजकीय नेत्यांनी अशा वेळी परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे.विविधता, सहिष्णुता आणि विभिन्नता या मूलभूत मूल्यांवर भारताचे ऐक्य अनेक शतके टिकून असून ही मूल्ये वाया जाता कामा नयेत.आपल्या राष्ट्रीय ऐक्याला तडा जाऊ नये.

काही राजकारणी राजकीय फायद्यासाठी बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत.त्या धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.प्रक्षोभक भाषणं आणि भीती पसरवण्याचा प्रयत्न करुन दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना आळा घालणे गरजेचे आहे.समाजातील अनेक अपप्रवृत्तींमुळे भारतीय संस्कृती आणि तिच्या मूल्यांना धक्का पोहोचू लागला आहे. जनतेमध्ये जातीय व धार्मिक सलोख्यासोबत सामाजिक व राजकीय सामंजस्य आणि लोकांमध्ये सामाजिक सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे जे उद्दिष्ट ठेवले पाहिजे.

 दहशतवाद ही राष्ट्रीय समस्या आहे. धर्म, जात, पंथाच्या नावाने समाजामध्ये तेढ निर्माण करुन स्वार्थ साधणारी ही प्रवृत्ती वाढत आहे.याही प्रवृत्ती वेळीच रोखणे गरजेचे आहे.आपण सर्वानी मिळविलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ एकांगी न घेता सर्व समाजाचे एकमेकांवर  असलेले अवलंबित्व असा घेतला तरच स्वातंत्र्याची खरी चव चाखता येईल.

 देशाची विविधता,विविधतेत असते एकता,एकतेतूनच होतो सर्वांचा विकास.आमचा देश बहुधार्मिक, बहुवांशिक बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, बहुपंथिक आहे. सहिष्णुता हे मूल्य आम्ही सर्वानीच जपलेले आहे.विविधतेत एकता आम्हाला गवसलेली आहे म्हणूनच तर देशात लोकशाही आज सुद्धा टिकून आहे.आपला देश लोकशाही व्यवस्थाच राबवू शकतो. धर्मसत्ताक व्यवस्था आपल्या देशात राहूच शकत नाही.


 जातीयवादाने आपल्या देशाची, समाजाची, स्वतःची आणि काही प्रमाणात आपल्या भावी पिढीचेही नुकसान केले आहे. देशात मानवतावाद निर्माण करायचा असेल तर सर्वप्रथम धर्मवाद संपुष्टात आला पाहिजे.जातीय सलोखाच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो.

 विविधतेतील एकता ही भारताच्या अस्मितेची खूण जात, धर्म, भाषा, वर्ग यांची विविधता असूनसुद्धा आम्ही भारतीय म्हणून एक जोपर्यंत भारतात धार्मिक आधारावर भेदभाव होणार नाहीत, तोपर्यंत भारताची यशस्वी वाटचाल चालू राहील. 

देशाची विविधता, सहिष्णुता आणि विभिन्नता या मूलभूत मूल्यांना धक्का लागू देऊ नका.

No comments: