Monday, March 14, 2016

टाहाकारीच जगदंबा मंदिर

                                                     टाहाकारीच जगदंबा मंदिर    

 अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुक्यात अनेक प्राचीन व कलाकुसरीने युक्त मंदिरे आहेत.त्यातील एक टाहाकारी गावात "जगदंबेचे " प्राचिन मंदिर आहे.आढळा नदीकाठच्या त्या भव्य, कोरीव मंदिरावरील शिल्पकलेचे गारुडच मनावर आरूढ होते.


मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्‍याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्‍याला जाणार्‍या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहुन टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.
टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिरा जवळ पोहोचल्यावर मंदिरा भोवती असलेली सात फ़ूट उंच तटबंदी दिसते. तटबंदीतील पूर्व दरवाजातून आपला मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याचे तोंड उत्तरेला म्हणजेच आढळा नदीकडे आहे. टाहाकारी मंदिराची बांधणी हेमाडपंथी पध्दतीची आहे.त्रिदल पद्धतीचा गाभारा, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप अशी मंदिराची रचना. यातील मुखमंडपच दहा खांबांवर आधारित. यावरूनच मंदिराची भव्यता ध्यानी येते. टाहाकारीच हेमाडपंथी मंदिर भूमीज पध्दतीचे आहे. या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चारफ़ूट उंच दगडी जोत्यावर (ज्याला "अधिष्ठान" म्हणतात) उभ आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पही आहेत. मुख मंडपातून सभामंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मुर्ती दिसतात. त्यातील एक शंकर पार्वतीची आहे, तर दुसरी गणपतीची आहे. मंदिराच छत ७२ खांबांवर तोललेल आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्प, किर्तीमुख, भौमित्तीक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत.देवालयात शृंगारिक शिल्पे आढळतात.

 मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशव्दारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भूजा असलेली काष्ठमुर्ती आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुर मर्दीनीच्या’ अवतारात आहे. सभामंडपाच्या दोन बाजुस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मुर्तीं आहेत.

 मंदिराचा अंतर्भाग पाहुन मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर अनेक कोनात दुमडलेला बाह्यभाग समोर येतो. यामुळे निर्माण झालेल्या कोनाड्यांमधे सुरसुंदरींच्या मुर्ती बसवलेल्या आहेत. यात शुकसारीका, नृत्य करणारी, वादन करणारी,शस्त्र धारण केलेली इत्यादी अनेक प्रकारच्या सुरसुंदरींच्या मुर्ती आहेत.

गणेश, शिव-पार्वती, चामुंडा आदी देवतांबरोबरच सूरसुंदरींचे तब्बल बावीस प्रकारचे आविष्कार येथे प्रकटले आहेत! सूर सुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल यांचा मान. कोण आरशात स्वतःची सुंदरता न्याहाळतेय.कोण केशरचना करण्यात गुंग आहे.कुठे नृत्य अवस्थेतील सुंदरी तर कोणी बासुरी-मृदुंग वाजविणाऱ्या.हाती पक्षी घेतलेल्या शुक सारिका, मुलाला घेतलेल्या वात्सल्य मूर्ती असे त्रिभंग अवस्थेतील नाना शिल्पाविष्कार आचंबित करतात.

टाहाकारीसारखी अनेक कोरीव शिल्पमंदिरे आज आपल्याकडे खेडोपाडी उपेक्षेचे जीवन जगत आहेत. अशा प्राचीन वास्तूंच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या पुरातत्त्व विभागाचे त्यांच्याकडे लक्ष नाही तर दरदिवशी ढासळत्याबांधकामाने स्थानिक गावकऱ्यांचे मात्र चित्त लागत नाही. 


आमच्या गौरवशाली इतिहासाचाच हा भयाण वर्तमान म्हणावाकी काय! असे असले तरी टाहाकारी मंदिर आवर्जून पाहण्यासारखेच आहे. महाराष्ट्रातील प्राचीन ठेवा जपून कसा ठेवता येईल याकडे सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
Post a Comment