Tuesday, September 24, 2019

अलार्म




पूर्वी माणसं कोंबडा आरवल्यावरच उठायची.दिवस कोंबड्याच्या आरवण्याने सुरु व्हायचा.ग्रामीण भागात अजूनही कोंबडा आरवल्यावर कामे सुरु होतात.आधी माणसं कोंबडा आरवल्यावर उठायचे आता फरक फक्त एवढाच की आता ते अलार्म वाजल्यावर उठतात. वेळेवर जागे होण्यासाठी अलार्मची आवश्यकता असते.सकाळी लवकर उठण्यासाठी आपण अलार्म  सेट करून झोपतो.मात्र सकाळी अलार्म  वाजल्यावर काही लोक तो अर्लाम बंद करून पुन्हा झोपी जातात.असं मुळीच करू नका कारण त्यामुळे तुमच्या लवकर उठण्याच्या संकल्पाला नकळत तुम्हीच टाळत असता. जर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटावं असं वाटत असेल तर अलार्मप्रमाणे उठा आणि कामाला लागा. अलार्म  लावून उठवण्याची जबाबदारी धड्याळावर टाकून झोपणारा बिंधास्त झोपी जातो.मग अलार्म  आपले काम चोख वेळेत करतो. काय तर हा अलार्म  झोपणा-यांना जागे करतो.पण कधी चुकून अलार्म  लावलाच नाही किंवा वाजलाच नाही तर मोठी पंचाईत होते.यासाठीच या अलार्मचा मनुष्याच्या जीवनात जबाबदारीचे व महत्वाचे स्थान आहे. घड्याळात अलार्मची सोय नसती तर रात्री न झोपता किती वाजले ते पाहत जागावे लागले असते. अलार्म हा दिवसाची प्रसन्न सुरुवात करणारा व गरजेचा मुख्य घटक आहे. अलार्म  वाजला नाही तर पहाट होतच नाही असे.नंतर अलार्मची  ऐवढी सवय होते की अलार्म  वाजण्याच्या वेळेस बरोबर जाग येते.मात्र कडाक्याच्या थंडीत अलार्म वाजू नये असे वाटते.



पहाटे लवकर उठण्यासाठी अनेकजण अलार्म  लावतात.परंतू अलार्मचा आवाज कर्णकर्कश असल्याने ध्वनी प्रदुषण होते,शिवाय,
अचानक झालेल्या आवाजामुळे कधीकधी खडबडून जाग येते. याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हृदयविकार असल्यास कर्णकर्कश आवाजाच्या अलार्मचा मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे अलार्म  सुमधूर आवाजाचा लावा.

‘वेक-अप कॉल’ ही सुविधा देखील अलार्मच आहे.फोनवर कॉल येतो. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे अलार्म  लावले जातात.

चोरी करणा-यांसाठी हा अलार्म धोक्याचा असतो.चोरी करायला गेलो परंतु अलार्म वाजल्यामुळे चोरी करता येत नाही.चोराला माहीत नसते अलार्म कितीचा लावला आहे.

सतर्कतेसाठी अग्निशामक फायर अलार्म व बॅकांना सुरक्षा अलार्म लावले असतात.घरासाठी गजर असलेले गॅस गळती शोधक,घरगुती गॅस अलार्म.हे जेव्हा वाजतात तेव्हा मोठे संकट व मोठी धावपळ होते.

प्रत्येकाला आपले शरीर सतर्कतेचा अलार्म देत असतो.त्यावेळी त्याने उपचार केले तर ठीक नाहीतर त्रास सहन करावा लागतो.

कंपन्यामध्ये व विमानात विविध प्रकारचे धोक्याचा इशारा देणारे अलार्म सुचना देत असतात. सुरक्षेच्या अनुषंगाने अत्याधुनिक सिक्युरिटी अलार्म बसविण्यात येतात.

 दोनशेपेक्षा जास्त पुलांना इलेक्ट्रॉनिक सेन्सर बसविण्यात आले आहेत. पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी ओलांडल्यास ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन यंत्रणेस धोक्याचा अलार्म वाजवून सुचित केले जाते.


सतर्कतेचा अलार्म महत्वाचा असतो.त्याच्याबद्द्ल निष्काळजीपण धोक्याचा ठरतो.

No comments: