Friday, October 11, 2019

चिऊताईचे घरटे




गुजरातमधील भूज परिसरात भटकंती करताना ही चिऊताईची मातीची घरटी दिसली.चिमणीच्या सुरक्षेसाठी मानवनिर्मित घरटी सुबक दिसली.घराच्या छप्पराच्या बाजुला व झाडांवर लावल्याने चिमण्या या घरट्यांचा वापर करताना दिसल्या.मोठ्या शहरातून चिमण्या दुर्मिळ होणे ही गंभीर बाब आहे.चिमण्यांना वाचवण्याकरीता ही चांगली कल्पना वाटली.

चिमणीचे घरटे आतून अतिशय उबदार असते. छान मऊ कापूस, तलम धागे आणि गवत यांचा बिछाना आत असतो. या घरटय़ात पिले अगदी सुखात वाढतात. मात्र. या मऊमुलायम बिछान्याखाली काही काटेही असतात.पिलांचे वजन जसजसे वाढते तसतसे त्यांना खालचे काटे टोचू लागतात.अखेरीस टोचणे सहन न होऊन ही पिले धडपडत घरटय़ाच्या बाहेर येतात आणि लवकरच गगनभरारी घेतात .पिलांना स्वावलंबी बनविण्याचा हा अनोखा मार्ग माणसाने पक्ष्यांकडून शिकण्यासारखा आहे.

निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा... सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले. कविता, बडबडगीते यांतच चिमणी प्रजात संपुष्टात येते की काय अशी भिती वा़टू लागली आहे. चिऊताईच्या गोष्टी बाळाला सांगून घास भरविणार्‍या आईच्या नजरेलाही आता चिमणी दिसेनासी झाली आहे.









 शहरीकरणाचा वाढलेला वेग, प्रदूषण आणि चिमण्यांना न मिळणारे खाद्य यामुळे हा चिवचिवाट कमी झाला आहे. चिमण्यांचे मुख्य अन्न म्हणजे बिया, भात, गहू, बाजरी हे आहे. मात्र, शहरात चिमणीला हे खाद्य मिळेनासे झाले. तेच गावाकडे घरातील महिला धान्य निवडतानाही चिमणीला ते घालते. त्यामुळे चिमण्यांची मुख्य गरज पूर्ण होते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही हजारोंच्या संख्येने चिमण्या दिसतात.




माणसांची घरं बदलत गेली, तशी तडजोड चिमणीनेही केली. पूर्वी वाळलेल्या गवताच्या काड्या-काड्या वेचून घर बनविणारी चिमणी पुढे गवताबरोबर कापूसही वापरू लागली. शहरात घरट्यांसाठी जागा मिळाली तर गवत कुठून आणणार म्हणून कापडाचे तुकडे, सुतळीच्या दशा, सुती धागे आदी बाबीही घरट्यात दिसू लागल्या. अलीकडची निरीक्षणे भयानक आहेत. कचरा डेपोच्या परिसरातील काही घरट्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचे जीर्ण तुकडे, प्लास्टिकचे बारीक दोर आदी बाबीही आढळतात.चिऊताई स्वतःचे घरटे स्वतः बनवते पण आपण हा कधी विचार केला आहे का? तीन ऋतूत म्हणजेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ती कशी सोसते? 








चिमण्यांच्या घटत्या संख्येचे गांभीर्य लक्षात घेऊन २० मार्च २०१० पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिमणी दिन पाळला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून देशात विविध पर्यावरणप्रेमी व सामाजिक संस्था चिमणी वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.  





शहरात चिमण्यांना घरटे बांधणे शक्‍य नसल्याने कृत्रिम घरट्यांचे वाटपही पक्षीप्रेमी करतात. शिवाय बाजारातही हे घरटे विकत मिळतात; पण सभोवतीचे वातावरण दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याने चिवचिव ऐकू येत नाही.





जिच्या चिवचिवाटाने प्रत्येकाचीच सकाळ रम्य व्हायची अशी सगळ्यांची लाडकी चिऊताईची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. सध्या ज्या चिमण्या अस्तित्वात आहेत, त्या टिकवून ठेवणे आवश्यक आहे.

No comments: