Wednesday, October 30, 2019

कदममामा






आमच्या सोसाय़टीत श्री.कदम वॉचमन म्हणून काही वर्षे काम करीत होते.काही महिन्यापूर्वी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या जागेवर आता नवीन वॉचमन कामे करीत आहेत.सोसायटीत त्यांनी  बरीच वर्षे काम केल्याने ते वॉचमन नसून सोसायटीचा एक सभासद झाले होते. सोसायटीची कामे व्यवस्थित करीत होते. सर्वांच्या परिचयाचे व कोणाचेही कोणतेही काम करण्यास तत्पर असायचे.विशेष म्हणजे लहान मुलांवर व वयस्कर मंडळींवर बारीक लक्ष ठेवायचे.पाण्याचे नियोजन व्यवस्थित करायचे.सोसायटीत येणा-या व जाणा-या लोकांवर पाळत ठेवून असायचे.सोसायटीतील काही मंडळी त्यांचा आदर करीत तर काही नोकरासारखी वागवायची.सर्वांच्या सुखदुखात सामिल व्हायचे. पण कायम दिवसपाळी करीत असत. गरीब होते.त्यांची पत्नीही घरकाम करीत होती. 

वॉचमन हा प्रत्येक सोसायटीतला महत्त्वाचा घटक आहे.सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी त्या वॉचमनवर असते. वॉचमन गेटवर पहारा देतो, त्यामुळेच आपल्याला घरात शांत झाप लागते. 
  
 कालच्या दिवाळीत त्यांची आठवण झाली. दरवर्षी दिवाळीत त्यांना एक मिठाईचा पुडा व एक शर्ट ’दिवाळी भेट’ देत होतो. पैसे दिले कि घरात जाणार याकरीता त्यांना शर्ट देत होतो.दुस-याच दिवशी तो नवीन शर्ट घालून दिवाळी शुभेच्छा देण्यास कामावर हजर राहून दिवाळी साजरी करायचे. नवीन शर्टात ते खुलुन व प्रसन्न दिसायचे. मधली काही वर्षे मी दिलेला शर्ट ते मुलाला देत असत आणि शर्ट मोठा किंवा लहान झाला असे मला खोटेनाटे सांगून वेळ काढीत असत.मुलगा खुष झाल्यावर तेही आंनदी वाटायचे.  

या वर्षी मात्र कामावर असलेल्या दोन्ही वॉचमनना दिवाळीसाठी पैसेच दिले.

No comments: