Saturday, November 2, 2019

चिमणी व चिमणा



एक चिमणी रस्त्याहून जाणा-या कारवर जोरात आदळलेली पाहिली.ती कारवर वेगात आदळल्याने तशीच खाली पडली.असं कधी होत नाही.पण माझ्या समोर घडले होते. तिला कारचा जोरात फटका बसलेला होता.तीने उडण्याचा प्रयत्न केला.पण तीला उडण्यास जमत नव्हते.तडफडत होती.उडण्याच्या प्रयत्नाला असताना तेथे चिमणा आला.तो चिवचिव करीत तिला उठवत होता.ती आता पाय वरती करुन शांत पडून होती.चिमणी चिमण्याच्या प्रयत्नाला प्रतिसाद देत नव्हती.चिमणा तीला ओढू लागला.चिमणा ज्या प्रकारे तिला उठवण्याचा प्रयत्न करीत होता ते पाहून वाईट वाटत होते. चिमणी तसा छोटासा पक्षी,पण तो प्रसंग पाहून सर्व सजीव सारखेच आहेत असे वाटले.

चिमण्याचा प्रयत्न सुरु असताना तेथे कोणीच पुढे गेले नाही.हे सगळे भर रस्त्यात चालले होते.त्या वेळेस नेमकी रस्त्यावर गाडी नव्हती. चिमणी उठत नसल्याने तीला उचलून आणून पाणी पाजावे या उद्देशाने मी पुढे झालो.इतक्यात एक गाडी मागून आली. मी मागे झालो.पण चालकाला गाडी बाजूने घेण्याचा इशारा केला.त्या गाडी चालकाला पुढे काय आहे,हे कळलेच नाही.त्या गाडीचा एक टायर नेमका त्या चिमणी वरुन गेला आणि ती चिमणी दिसेनाशी झाली.फक्त पिस दिसत होती.काय झाले हे कळण्याच्या आत सगळ घडलं होतं. सगळ शांत झालं. खूप वाईट वाटलं.आपण तेथे असून देखील चिमणीला वाचवू शकलो नाही.मी स्वत:ला दोष देत होतो.

मी आता चिमण्याला शोधू लागलो.रस्त्यावरील गाड्या कमी झाल्यावर तो चिमणा कोठून तरी पटकन तेथे आला.चिवचिव करीत नव्हता.चिमणी भोवती गोल फिरला.रक्त आणि पिस दिसत होती.चिमणीचे काय झाले असेल ते त्याला समजल्यावर त्याने मोठ्याने चिवचिवाट करीत आक्रोश केला.साथीदार मध्येच सोडून गेल्याचे तो दु:ख व्यक्त करीत होता.तो प्रसंग पाहून मी सून्न झालो.  

घटना  वेगात घडल्याने कोणाला काहीच करता आले नाही.चिमणा तेथून उडून जात नव्हता.रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्यास तोही गाडी खाली  यायचा अशी भिती वाटल्याने त्याला तेथून उड्वण्याचा प्रयत्न केला पण तो जात नव्हता. शेवटी एक गाडी जवळ आल्याबरोबर तो तेथून उडला. स्वत:चा जीव वाचवण्याकरीता की चिमणीच्या पिल्लांना आधार देण्यासाठी ते कळले नाही.    

No comments: