Tuesday, November 12, 2019

दानशुर शेतकरीमामा


                       

    आम्ही त्रंबकेशवर परिसरातील  ’हरीहर’ गडाच्या शेजारीच असलेल्या ’भास्करगड’ (बसगड) वर ट्रेकिंगला गेलो होतो.निरगुडपाड्यात न जाता आम्ही सरळ भास्करगडाच्या पायथ्याशी पोहचलो.भास्करगडाकडे जाण्याच्या दिशादर्शकासमोरच एक झोपड़ी होती. आम्ही तेथे गडावर जाण्याच्या वाटेची चौकशी करण्यास सुरुवात केली.पाउस पडल्याने गवत व रान वाढलेले असल्याने गडाची वाट मिळाली नाहीतर चुकण्याची शक्यता होती. झोपडीत काही तरुण मंडळी होती.त्यांनी गडाची माहीती दिली.आमची तयारी झाली होती.पण गडावर जाण्यासाठी वाट दाखवण्यासाठी वाटाड्या नेण्याची सगळ्यांना गरज वाटली.तरुण मंडळी गडावर आमच्यासोबत येण्यास तयार नव्हती. तेवढ्यात एक वयस्कर शेतकरी रानातून काम करुन तेथे झोपडीत आला.वयस्कर असल्याने त्याला वाटाड्या म्ह्णुन विचारण्याचे आम्हाला धाडस झाले नाही.त्यांनी पाणी पिऊन झाल्यावर आमच्या सोबत संवाद साधला.तो काम करुन दमून आलेला दिसला.आमची अडचण कळल्यावर तेच आमच्यासह गडावर येण्यास तयार झाले.      



   आमच्या ओळख परेडमध्ये त्यांनी आपले नाव ’गंगाराम हनुमंत पारधी’ असे सांगितले. त्या वयस्कर वाटाड्याच्या मार्गदर्शनाखाली आमचे पदभ्रमण सुरु झाले.सफेद टोपी,सफेद शर्ट,खाली टॉवेल ,पायात प्लास्टिकच्या चप्पला,हातात प्लास्टिकची पिशवी   व खांद्यावर कु-हाड असा मामाचा पेहराव होता. चेहरा रापलेला व सुरकुत्या पडलेला. आपले आयुष्य रानावनातून जगल्यामुळे चढाईत सफाई व वेगळीच शैली होती.आमचा वाटाड्या असल्याने सगळ्यांच्या पुढे रस्ता दाखवत आमची चढाई सुरु झाली.मामा पटापट चढत आम्हाला लाजवत होते.आम्हाला दम लागत होता.मामा गावाकडल्या गोष्टीवर संवाद साधू लागला. आम्ही त्यांच्याकडून माहिती गोळा करु लागलो.



    त्यांचा गाव दुर्गम भागात असल्याने चांगला रस्ता देखील नव्हता.त्यांच्या गावात शिक्षण अधिकारी शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते.पण शाळेसाठी जागा नसल्याने शाळा सुरु होणार नव्हती.तेव्हा या शेतकरीमामाने आपल्या कडील जागा शाळेसाठी देण्याची तयारी दाखवल्यावर गावात शाळा सुरु झाली.गावातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला होता.एका अशिक्षित माणसाहातून  मोठे सामाजिक कार्य झाले होते.शिक्षणाचे महत्व मामाला कळले होते. आम्हाला मामाबद्दल आदर वाटू लागला.मामाचा छानपैकी एक फोटो काढला.एका दानशूर व्यक्तीची भेट झाल्याने आंनद झाला.    


एका अशिक्षित माणसाकडून मोठे सामाजिक कार्य झाले होते.सर्वांना जमीन पाहिजे असल्याने जमीनीवरुन भावाभावांमध्ये भांडण होतात.पण कोणीही आपल्या हिश्याची जमीन दुस-या भावासाठी सोडायला तयार नसतो.शेतकरीमामाने गावातील मुलांचे शिक्षणासाठी होणारे हाल पाहिले असतील व शाळेमुले गावात इतर सुधारणा होतील या उद्देशाने आपली जागा शाळेला देऊन जमीनीवरुन वाद घालणा-या भावानां चांगला संदेश दिला आहे.


    आम्हां सर्वांना गडावरुन नेऊन सुरक्षित खाली उतरवल्याने आम्ही त्यांचे आभार मानले.पुन्हा भेटू म्हणत आम्ही त्यांचा निरोप घेतला.  







No comments: