Thursday, January 2, 2020

आजीचा फोटो


मित्राच्या गावाला गेलो होतो.पहाटेचा नजारा टिपण्याची संधी असल्याने लवकरच कॅमेरा घेऊन एकटाच घराबाहेर पडलो. गारठा पडल्याने सगळे गुरगुटून घेऊन घरातील कामे करीत होती.तर काही व्ययस्कर मंडळी शेकोटी घेत शेकत होती.गोठ्यात गुरांना चारापाणी देत होते.शेतकरी शेतावर जाण्याची तयारीत होते. झुंजुमुंझु झाले होते.घरांच्या कौलातून घूर बाहेर येते होता.वासरं हंबरत होती.बक-या व कोंबड्या बाहेर पडण्याच्या तयारीत होत्या.गाव जागे झाले होते.फोटो काढत काढत गावाबाहेर आलो होतो.


आता चांगलेच तांबडे फुट्लं होतं.माझे फोटो टिपणे सुरु होते.तेवढ्यात बैलांच्या गळ्यातील घुंगुरांचा आवाज कानावर पडला.खिल्लारी बैलांची एक बैलगाडी माझ्या दिशेने येताना दिसली.चांगला फोटो काढण्याची नामी संधी माझ्याकडे धावून आल्याने माझी धावपळ सुरु ली. घुंगुरांचा आवाज जवळ येऊ लागल्यावर मी सरसावलो. बैल बैलगाडी एका लयीत ओढत असल्याने घुंगुरांचा आवाज लयबध्द होता. सफेद रंगाच्या खिल्लारी बैलांची बैलगाडी हाकलणारा मला पाहून हबकला व सावरून बसला.मला पाहिजे होत्या तशाच बैलगाडीचे मी वेगवेगळ्या कोनातून फोटो टिपत होतो. किती फोटो काढू असे झाले होते. बैलगाडी आता खुपच जवळ आली होती. तरीही माझे फोटो काढणे काही थांबत नव्हते.आता बैलगाडी माझ्या समोरून जात होती.मी गाडीत पाहिले तर एक आजीबाई टोपली घेऊन बसलेल्या दिसल्या.त्या शेतावर निघालेल्या दिसल्या.पहिल्या पासून माझी नजर बैलगाडीवर असल्याने गाडीत कोण बसले याकडे लक्ष नव्हते.आजीना पाहिल्याबरोबर माझा कॅमेरा पुन्हा सरसावला.आजीनी साडीचा पदर डोक्यावरुन घेऊन साडीत अंग झाकलेले होते.कपाळावर काळा टिळा होता.चेहरा हसरा होता.आजीनीही मला पाहिल्याबरोबर पोझ दिली व गालात हसल्या. मी पटकन फोटो काढून घेतला. मी नकळत त्यांना नमस्कार केला.कोणतरी आपला फोटो काढतोय याचा त्यांना आंनद झालेला दिसला.या वयात देखील शेतावर शेतीची कामे करण्यास निधालेल्या पाहून मन भरुन आले.



आजी देखण्या होत्या.त्या प्रेमळ व आंनदी वाटल्या.माझी त्यांच्याशी नजरानजर आणि दोघांमध्ये आपूलकीचे नाते जुळले. ज्या प्रकारे गाडीत बसल्या होत्या त्यांना पाहून मला पूर्वी लग्नानंतर बैलगाडीतून सासरी जाण्यास निधालेल्या नववधूचा भास झाला.नवरी सजलेली असते पण गाव व माहेर सोडून नव-याबरोबर सासरी निधालेली असल्याने थोडीशी हिरमुसलेली दिसते.इथे आजी आंनदी दिसत होत्या.


खिल्लारी बैलांच्या गाडीपेक्षा आजीचा बोलका फोटो कॅमे-यात कैद केला होता.



No comments: