Tuesday, March 31, 2020

जरा थांबा रे



                                                      जरा थांबा रे


काय चाललं आहे? काही कळत नाही?लॉकडाऊनच्या काळात रोज सोशल मीडियावर ढिगभर मेसेज येत आहेत.
काही ग्रुपवर तर दिडशे ते दोनशे मेसेज पडलेले असतात. ही परिस्थिती जवळ जवळ सर्वांकडेच असेल.आपण हे सगळे मेसेज वाचतो का? हे मेसेज वाचायला कोणाकडे वेळ आहे? सर्वात जास्त मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविले जातात.लॉकडाऊन मध्ये घरात बसल्याने हाताला कोणतेच काम नसल्याने मोबाईलवर सारखा हात जात असतो.आलेले मेसेज पाहायचे व लगेच इतरांना पाठवायचं काम हाताना उरलं आहे.कशासाठी हा आपला अट्टाहास? काय मिळवतो असे करुन? समजावर व इतरांवर या   मेसेजचा काय परिणाम होईल याचा आपण कधी विचार करतो का? मीच या मेसेजचा जनक असल्याचा आव आणत प्रत्येक जण हे मेसेज पटापट वेगवेगळ्या ग्रुपवर पाठवून मोकळे होतात.    

मोबाईलने क्रांती केली आहे.प्रत्येकाच्या हातात संपर्काचे साधन आले आहे.फेसबुक, इन्स्टाग्राम,व्हॉट्सअ‍ॅप व ट्विटर असे सोशल मीडियावर संदेशवाहक निर्माण झाले आहेत.पल्याकडे व्हॉट्सअ‍ॅपला पसंती आहे.पूर्वी फोन करताना प्रत्येक कॉलला जसे पैसे लागत असत  तसे  पैसे प्रत्येक मेसेजेस ला लागले असते तर अशा मोठ्या संख्येने मेसेज कोणी पाठवले असते का? याच व्हॉट्सअ‍ॅपमुळे बऱ्याच फेक न्यूज पसरत आहेत.व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवा, चुकीची माहिती किंवा समाजात तणाव निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषत: व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरणाऱ्या अफवांमुळे सध्या समाजमन व्यथीत होते.वाऱ्याच्या वेगाने पसरणाऱ्या अफवांमुळे सामाजिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे.व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूजमुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या पार्श्वभूमीवर वारंवार आवाहन करूनही नेटिझन्स पुरेशी काळजी घेत नसल्याचे दिसून येते.

कोरोना विषाणू आल्यानंतर अवघ्या काही तासांतच तो सोशल मीडियावरही व्हायरल होता गेला. बघता-बघता करोना संदर्भातले अनेक मेसेज व्हायरल होऊ लागले.व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा संपूर्ण सोशल मीडियावर करोना दिसू  लागला. जेवढ्या वेगानं हा व्हायरस जगभर पसरला, त्याहून दुप्पट वेगानं त्याबद्दल विविध प्रकारचे आशय सोशल मीडियावर पसरु लागले. करोनाबाबत आलेल्या अनेक मेसेज किंवा पोस्टसचा खरेपणा तपासून न पाहताच ते मोठ्या प्रमाणत शेअर होत जाऊ लागले. योग्य गोष्टींच्या बरोबरीनंच अयोग्य आणि दिशाभूल करणारी माहितीही लोकांच्या मोबाइलमध्ये धडकू लागली.त्यामुळे कोरोना
बद्द्लचे गांभीर्य कमी झाले.

आपल्याला आलेल्या कोणत्याही मेसेजची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय उगाचच तो पुढे पाठवण्याची सवय सगळ्यांसाठी घातक ठरू शकते.एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला संपूर्ण माहिती नसेल, तर विषयीचा कोणताही तपशील सोशल मीडियावर न पोस्ट करणं हेच शहाणपणाचं ठरेल.सोशल मीडियावर अफवा निर्माण करून त्याचा प्रसार करणाऱ्या पोस्टवर पोलिसांना सतत लक्ष ठेववे लागत आहे.जास्तीत जास्त जनजागृती करणं आवश्यक असताना उलट अफवा पसरवणं अत्यंत धोक्याचे आहे. अशा वृत्तीच्या समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणांना तेवढ्याच प्रभावीपणे प्रयत्न करावे लागत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून येणारे ढिगभर मेसेज व व्हिडीओ बहुतेक कोरोना जाईल तेव्हाच कमी होतील असे वाटते आहे.तोपर्यत मेसेज झेलावे लागणार..

                        जरा थांबा रे बाबानो.

No comments: