Saturday, March 28, 2020

महिलांची ओरड


                                                          महिलांची ओरड


लॉकडाउन सुरु झाल्यापासून घरातील ऐतखाऊ घरात बसून सकाळ, दुपार व संध्याकाळ खाण्यासाठी रोज नव्या पदार्थांची ऑर्डर देत महिलांना बेजार करीत असल्याची समस्थ महिलांची ओरड आहे.शाळा बंद असल्याने बच्चे व ऑफिस नसल्याने मोठे यांची खादाड युती घरातल्या महिलेला स्वंयपाकात मदत न करता तिला छळत आहेत.घरात काही काम नसल्याने त्यांची भूक वाढली आहे.त्यांच्या जिभेची चव सांभाळता सांभाळता महिलांना नाकीनऊ आले.घरात बसणारे  असतील तर  त्यांच्या  चकन्याच्या मागण्यांवर विशेष लक्ष
द्यावे लागते.नाहीतर नाराजी व्यक्त होत राहते.बिचा-या काही महिला तर आजारी पडल्या आहेत.तरीही या खादाड मंडळीच्या मागण्या काही कमी होत नाहीत.हाही एक अत्याचार आहे.कामवाल्या बाया देखील कामावर येत नसल्याने महिलांना हा लॉकडाउन नकोसा झाला आहे.ही परिस्थिती जवळजवळ सर्वच घरातून दिसत आहे.

महिलांच्या या व्यथा समजून घेऊन देशाच्या अन्नपुरवठा मंत्र्यानी रात्री टि.व्हीवर येऊन या खादाड मंडळींचे प्रबोधन   करावे.आठवड्यातील प्रत्येक दिवसाप्रमाणे सकाळ, दुपार व संध्याकाळच्या वेगवेगळ्या पदार्थांचा एक मेनू बनवून प्रसिध्द करावा.तेच पदार्थ फक्त घरात शिजतील.वेगळा पदार्थ पाहिजे असल्यास त्याने तो स्वत: बनवून खावावा.पण महिलेला त्रास देऊ नये.कायदेशीर गुन्हा समजला जाईल.लॉकडाउनमुळे देशातील गरीब व भिका-यांना अन्न मिळत नाही.काही सामजिक संस्था यांना अन्न पुरवीत आहेत.याची जाणीव यांनी ठेवली पाहिजे होती.खादाड मंडळींनी सर्व अन्न खाल्ले तर या गरीबांना देण्यासाठी अन्न शिल्लक राहील का?
     
चमचमीत पदार्थ खाऊन खादाडांच्या पोटाचा घेर वाढला आहे.तर काहींना पोटाचे विकार सुरु झाले आहेत.पण खाण्याच्या वृत्तीमध्ये बदल होत नाही.यांनी खाण्याबरोबर घरातील साफसपाईची कामे, मुलांचे संगोपन व घरातील वयस्करांना सांभाळले असते तर महिलांची चिडचिड झाली नसती.घरात महिलांच्या बाजूने कोणीच उभे न राहील्याने त्या एकट्याच पडल्या आहेत.समाजातील एका वर्गाची होणारी छळवणूक अशी सहन केली जाणार नाही.हा प्रश्न गंभीर असल्याने महिला एकत्र येऊन या खादाडवृतीच्या विरोधात आंदोलन करण्याचा विचार करत होत्या पण लॉकडाउन असल्याने त्यांना काहीच करता येत नाही.      



महिलेने आता ठरविले आहे.तिला शक्य होईल तेच अन्न घरात शिजवले जातील.ज्यांना आवडले त्यांनी ते अन्न खावे अन्यथा उपासी राहावे.घरातील परिथिती बिघडण्याअगोदर घरातील सर्व मंडळीनी घरातील महिलेला देखील लॉकडाउन मध्ये सामिल करुन घ्यावे. महिलेच्या प्रकृतीचा व मनाचा आदर केला तरच घरातला लॉकडाऊन यशस्वी होईल यात शंका नाही.       

No comments: