Wednesday, April 1, 2020

पादत्राणे चिंतेत

                                                         पादत्राणे चिंतेत 


घरातील पायताणांचा वापर हल्ली होत नसल्याने शुबॉक्स मधली समस्त मंडळी चिंतेत होती. मालकाने आपला वापर का बरं बंद केला असेल? असा भला मोठा प्रश्न सॅन्डल,बूट,चप्पल व स्पोर्ट्स शुज यांना पडला होता. आणि प्रत्येकाला असं वाटतं होते की,एक तर ते आजारी पडले असतील किंवा त्यांनी नवी कोरी पादत्राणे आणल्यामुळे आपल्याला बाजुला सारले असावे.मग त्यांची शुबॉक्स
मध्येच एकमेकांशी चर्चा सुरु झाली.

सॅन्डल : काय रे बुटा काही दिवसात तुला बाहेर नेले होता का मालकांनी?
बुट : नाही गं. जाम कंटाळा आला आहे घरातच पडून आहे.बाहेरची हवा व धुळ खायला नाही मिळाली ब-याच दिवसात.
सॅडल : तुला काय कळलं का? काय चाललं आहे मालकांच?
बुट : काही समजलं नाही व अंदाजही येतं नाही.
सॅन्डल : काय गं,चप्पल तुला तरी नेले होतं का त्यांनी?
चप्पल : नाही.का गं ? काय झालं?
सॅन्डल : काय रे, स्पोर्ट्स शुजा हल्ली मॉनिंग वॉकला मालकाबरोबर जातोस की नाही?
स्पोर्ट्स शुज : नाही रे, २२ मार्च पासून मी बाहेर पडलोच नाही.अस वाटतं कोणीच विचारत नाही आपल्याला.
         
प्रत्येकांला असं वाटू लागलं की,आम्ही मालकांच्या उपयोगाचे राहिलो नाही व आता त्यांना आमची काहीच गरज उरली नाही. 

    मध्येच थोडी शांतता पसरली.थोड्याच वेळापूर्वी जवळ येऊन पडलेल्या स्लिपर कडे सर्वांचे लक्ष गेले.

सॅन्डल :काय गं, स्लिपर ,मालक तुझा वापर करतात का?
स्लिपर : होय , मी दिवसभर मालकांच्या पायातच असते.
बुट : अस होयं म्हणजे हल्ली तूझे लाड सुरु आहेत वाटतं.
स्लिपर : नाही रे, उलट दिवसभर पायात राहून आता मला कंटाळा आला आहे.मालकाच्या पायाला सतत
        घाम येत असल्याने मला त्याचा त्रास होतो.आणि ते मला बाहेरही नेत नाहीत.
सॅन्डल : असं काय, मालक मला बाहेर नेतील तेव्हा मी त्यांना चावेन. त्यांना चावून राग व्यक्त करेन.
बुट : वैतागून,मी पण मालकाच्या पायांना घट्ट बसणार.
स्पोर्ट्स शुज : कंटाळून,मालक मला जेव्हा बाहेर काढतील तेव्हा मी त्यांना धावताना पाडणार.जखमी
            झाले तरी चालतील.
चप्पल: नाराजी व्यक्त करीत, मी मालकाच्या पायातच राहणार नाही.त्यांना चालताच येणार नाही. 
स्लिपर : मित्रहो, का बरं तुम्ही असं रागावत आहात मालकांवर? मी बोलतो मालकाशी.

दुस-या दिवशी मालकांनी शुबॉक्स व्यवस्थित साफ केला. सर्व चप्पला स्वच्छ केल्या.

शुबॉक्स मधले सगळे जण खुष झाले.सगळ्यांचा राग गेला.चला आता एकेक दिवस मालक
आपल्याला बाहेर घेऊन जातील या कल्पनेने ते सगळे आंनदात होते.त्यां सर्वांना वाटलं स्लिपर मालकांशी
आपल्याबद्द्ल बालल्याने हा बदल झालेला दिसतो.

पुढचे दोन दिवस मात्र असेच गेले.कसलीच हालचाल झाली नाही.
तिस-या दिवशी मालकांनी शुबॉक्सचे दार उघडले. कोणाला तरी बाहेर फिरण्याची संधी मिळणार असल्याने
शुबॉक्समधले सर्व जण खुष झाले.पण मालकांनी शुबॉक्सचे दार अर्धवट लावून ते तिथून निधून गेले.
त्यामुळे शुबॉक्समधील सगळे जण पून्हा नाराज झाले.

शुबॉक्सच्या अर्धवट असलेल्या दारातून त्यांनी रात्री टि.व्हि.वरील बातम्या ऐकल्या तेव्हा मालक आपल्याला
बाहेर का नेत नाही याचा त्यांना उलगडा झाला.आणि त्यांना मालकांबद्द्ल काळजी वाटू लागली.मग प्रत्येकांनी 
असं ठरवलं

सॅन्डल : मी त्यांना चावणार नाही.
बुट   : मी त्यांना त्रास देणार नाही.
स्पोर्ट्स शुज : मी त्यांना पाडणार नाही.
चप्पल : मी त्यांचा पायात व्यवस्थित राहीन.

पण मालक सुरक्षित राहण्यासाठी आपण काय बरं करावं या चिंतेत सर्वजण होते. अखेर त्यांनी ठरवलं की,
काहीही झाले तरी मालकांना सध्या घरातून बाहेर पडूच द्यायचं नाही.त्यांना सुरक्षित ठेवायचे.  

No comments: