ओढ गावाची
बंदिस्तच्या काळात अचानक मला गावाची आठवण झाली.गावाला जावसं वाटू लागलं.सगळं गाव नजरेसमोर उभं राहिलं,गावाचं वातावरण वेगळचं,आपलसं करणारं.
डोंगराच्या वळणदार कुशीत असलेले पाच-पन्नास घरांचे गाव. लाल रंगाच्या कलांनी नटलेली जवळ जवळ असणारी घरे.त्याच गावात टूमदार कौलारु घर,घरापुढे सारवलेले अंगण व अंगणात तुळशीचे वृदांवन,घराच्या मागे परसवनात आंबा,केळी, शेवगा,काजू, नारळ व फणसाच्या झाडांची गर्दी,भाज्यांची अळी,मागे गुरांच्या वाड्यात वासरं व शेतीची अवजारे व कुंपणीला फुलांच्या वेली.
गावात छोटसं देऊळ,ग्रामपंचायत कार्यालय,मोठमोठी झाडे, हिरवेगार शेतं, गुरं आणि गावातून जाणारा छोटासा रस्ता,रस्त्याच्या दोन्ही बाजूने घरं, गावातली गोड माणसं ,तिथला निसर्ग आणि लाल माती मन मोहून टाकते. घरात ओटी,माजघर,माळा व पडवी अशी रचना. त्यात चूल, जातं, कोयता, हांडा व कळशी,व्हाईन, माळ्यावर चढण्यासाठी निसरण (शिडी) आणि भिंतीत देवळी, खिडकीत आरसा या वस्तू त्याच जाण्यावर दिसतील.
कोंबड्याच्या आरवण्याने होणारी गावातली पहाट तर गुरांना पाणी पाजून आणि चुल विझवून होणारी रात्र.सुर्याची किरणं पडायच्या आत दुध काढायचं,अंगण झाडायचं,पाणी भरायचं,गुरं वाड्याबाहेर गेली की वाडा साफ करायचं व पेज आणि चहा पिवून बैल घेऊन शेतावर जायचं.गावातल्या शाळेत केलेली दंगामस्ती,गोट्यांचा तो मांडलेला डाव,विटीदांडूची मारलेली मजल, नदीतले पोहणे व मासे पकडणे, बैलगाडीशी स्पर्धा, सापासोबतची मस्ती,सायकलवरुन केलेला लांबचा दौरा,गपचूप तालुक्याला जाऊन पाहिलेले सिनेमे, शेतीची कामे, आंबे व काकडयांची चोरी आणि होळी व गणपतीच्या सणाला केलेली घमाल तर कधीच विसरूच शकत नाही.
झाडांच्या पानांची सळसळ, पक्षांची किलबिल, कोंबडयाची बांग,वासराचं हंबरणं, रहाटाचा खडखडाट, दुधाची धार काढताना होणारा, देवळातील घंटेचा ,वहाळातील वाहत्या पाण्याचा,बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा, नारळ किंवा आंबा पडल्यावर होणारा ,एसटीची घंटा व नंतर खाडकन लावलेल्या दाराचा व मंदिरातील भजन व कीर्तनांचा आवाज कानात घर करुन आहेत. तर शेणाने सारवलेल्या अंगणाचा,शेतातील पिकलेल्या पिकाचा, गुरांच्या शेणाचा,आंबा वा काजूच्या मोहोराचा व चूलीच्याचा धूराचा,सुकट भाकरीचा वास नाकात भरलेला आहे.
गावात नेमकीच दहा बारा लहान पोरं आणि उरलेली म्हातारी माणसं.गावाकडली माणसं हि साधीभोळी आणि निरागस.मातीवर प्रेम करणारी अन आभाळाला देव मानणारी ही माणसं स्वाभिमानी.एकामेकाच्या नात्यात गुंतलेली. पैशानी गरीब बिचारी असतील पण जे हृदयात इतरांप्रती प्रेम आहे,त्यांचा गवगवा ही गावखेड्याची माणसं कधी करत नाही. इतरांना मदत करणं, प्राणिमात्रावर जीवापाड प्रेम करणं हे त्यांना कोणी शिकवलेलं नसतंच मुळी, जे येत ते अगदी अंतरंगातून येत.गावात दोन मोठे सण साजरे होतात, एक गणपती व दुसरा होळी.या सणात प्रत्येक घर पाहुणांनी भरलेली असतात.गणपतीत भजने व आरती आणि विसर्जनाची मिरवणुक खासच असते. होळीनंतर पालखीला गावकरी जमतात.सर्व सण सगळे मिळून साजरे करतात. एखाद्याच्या घरातील मंगलकार्यात अख्खा गाव मदतील येतो तसाच सुतकात दु:खीही होतो.
अनाहूतपणे गावापासून दूर गेल्यामुळे कित्येक आठवणी आपल्याला सुख-दु:खात आंनद देत राहतात.हल्ली आपला गाव बरा असा सूर सगळीकडे उमटत आहे.गावाची खुप आठवण येते आहे.काय करावे? तडक निघून जावे गावाला असे सारखे वाटते आहे. मित्रांना निवांतपणे भेटता येईल, निसर्गाचा आनंद लुटता येईल व गप्पागोष्टी करीत आनंदाचे क्षण मनमुराद लुटता येईल.कृत्रिम जग सोडून पुन्हा गावाच्या वाटेला यावं आणि गावात रमून जावे.गावची मजा काय असते ती अनुभवल्याशिवाय कळणार नाही.गाव म्हणजे गाव असते.
गड्या आपुला गाव बरा.......
No comments:
Post a Comment