Thursday, April 9, 2020

धीर सुटत आहे.



                                                           धीर सुटत आहे.


पंधरा दिवस झाले घरातच बंदीस्त आहोत.दिवस उजाडतो आणि दिवस मावळतो.रोज त्याच त्याच गोष्टी करुन आता कंटाळा आला आहे.आपण सारेच जण दैनंदिन जीवनाच्या रगाड्यात अडकून पडलो आहोत. टि.व्हीच्या बातम्या ऐकून वीट आला आहे.चार भिंतीत आयुष्याचे असे किती दिवस काढावे लागणार याची कल्पना येत नसल्याने आता मनाला आवर घालणे कठीण जात आहे.बाहेरचे जग दिसत नाही व पाहता येत नाही.जसे वाटत आपण वेगळ्याच जगात एकटेच जगत आहोत.वातावरणातल्या हालचालीशिवाय इतर गोष्टी स्थिर झाल्या आहेत.जग थांबले आहे. 

लहान मुलांना शाळा नसताना घरात डांबून ठेवणे कठीण झाले आहे.सख्ये शेजारी दिसत नाहीत.नातेवाईकांकडे गप्पा संपल्या आहेत.मित्रांकडचे विषय संपले आहेत.चित्रपट,नाटक व वेबसीरिज पाहायला मजा येत नाही.मालिकांचे पूर्नप्रसारण पाहवत नाही.घरात राहून वयस्कर बैचेन आहेत.कोणाला प्रत्यक्षात भेटता येत नसल्याने सर्वांची नाराजी वाढली आहे.कॅरम,पत्ते,पटावरील खेळ,व्यापार व बुद्धिबळ किती दिवस खेळायचे? व्यायाम करुन दमलो आहे.घरात बसून उत्सव साजरे करायला लागल्याने नाराजी आहे.आर्थिक संकटाची धास्ती वाढली आहे.   

गायकांची गायकी संपली,लेखकांचे लेख कमी झाले,गृहीणी रीसेपी दाखवून थकल्या,लोकांचे सल्ले दिसत नाहीत.छायाचित्रकार दमले. ऑनलाईन रम्मीत पैसे संपले.लाईक व शेअर करण्यात नावीन्य उरले नाही.मोबाईलकडे पाहवत नाही.छंद जोपासने संपले आहेत.वाचनात गोडी लागत नाही.    

घरातले रोज रोज तेच तेच अन्न खाऊन खाऊन बाहेरच्या चटपटीत पदार्थांची गरज भासत आहे.नाक्यावरच्या कटींग प्याविशी वाटते.किती दिवसात बाहेर रत्स्यावरचे वडापाव, दाबेली,इडली डोसा व भाजीपाव असे पदार्थ खायाला न मिळाल्याने अशक्त झालो आहे.केस व दाढी वाढली आहे.झोपही लागत नाही.फिटनेस राहीला नाही.    

सिगारेट पिणा-यांचा व बसणा-यांचा स्टॉक संपल्याने बेचैनी वाढली आहे.मित्रांकडे चौकश्या वाढल्या.घरात वाद वाढले आहेत. वर्क फॉंर्म होम करणा-यांना ऑफिसचा फिल येत नसल्याने ऑफिसची ओढ लागली आहे.ऑफिसमधल्या इतरांच्या डब्यातील पदार्थांची भूक लागली आहे.ऑफिसमधल्या मित्रांची आठवण येत आहे.

कमालीचा त्रास सहन करूनही लोक शांत आहेत. पण काही मुंबईकर घराबाहेर पडायचे थांबेनात.ज़ीवनात नावीन्य उरले नसल्याने घरात पाय टिकत नाहीत.तरीही येणारे दिवस अत्यंत कसोटीचे आहेत.विषाणूच्या विरोधातील युद्ध अटीतटीच्या वळणावर आलं आहे.थोडा धीर घरा.सर्व काही पूर्वीसारखं होईल.

घराबाहेर पडून आपले जीवन तर आपण धोक्यात घालतच आहात.पण आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे ही जीवन धोक्यात घालत आहात ह्याचे भान ठेवून किती ही धीर सुटला तरीही घरातच रहा.ही माझी विनंती

No comments: