Sunday, April 12, 2020

हितगुज





धान्य  निवडत  एक शेजारी  गॅलरीत उभी  होती.  त्याच वेळी दुस-या गॅलरीत चहाचा कप घेऊन दुसरी शेजारी गॅलरीत आली आणि त्या दोघींच्या नेहमीप्रमाणे गप्पा सुरु झाल्या......


पहिली शेजारी  :  अगं ऐकलस ना, लॉकडाऊन ३ मेपर्यत   वाढवला म्हणे. वाटच लागली ना. अगं महिन्याभरात काहीच शॉपिंग नाही झालं. कसं होणार आता ? असं  यापूर्वी कधी झालं नव्हतं.

दुसरी शेजारी  : हो ना, साध्या टिकल्याही घेता आल्या नाहीत हो, फार वाईट वाटतयं. घरातून बाहेरही  पडता येत नाही.

पहिली  : पालिकेने नवीन पत्रक काढले आहे.घरातून बाहेर पडताना तोडांवर ’मास्क’ लावलाच पाहिजे. काय गं, मास्क लावला तर आपलं सौंदर्य कोण पाहणार? त्यापेक्षा बुरखा घातलेला बरा. आणि कोणत्या  रंगाची लिपस्टिक व नाकात कोणता दागीना घातला आहे तो समोरच्याला कसा दिसणार? त्यापेक्षा न 
वापरलेलेच बरं.

दुसरी : अगं, आपल्या सुरक्षेसाठी व रोगाचा प्रार्दुभाव होऊ नये,याकरीता मास्क लावणे सक्तीचे केले आहे.    

पहिली :  माझ्या पसंतीची एक चांगली साडी दुकानात बघून ठेवली होती. खरेदीला जाणार होते पण त्याच दिवशी मेली ही संचारबंदी सुरु झाली आणि ती साडी मला काही घेता आली नाही. नाराज झाले. संचारबंदी 
उठल्यानंतर ती मिळेल का?

दुसरी : जाऊ द्या, ती नाही मिळाली तर दुसरी घ्या. संचारबंदी संपल्यानंतर तीच साडी तुम्हाला किंमत  कमी करुनही घेता येईल.    

पहीली : अगं,किती दिवसात बाहेर न पडल्याने काहीच नटापटा पण करता आला नाही.कधी संपणार हे  दिवस?

दुसरी : हो गं, घरातून बाहेर जायचं नाही व बाहेरुन कोणी घरात येणार नसल्याने साधे व जूने कपडे  वापरून वीट आला आहे.

पहिली : घरातल्या नित्याच्या कामात वेळ कसा जातो तेच  कळत नाही.

दुसरी : हो गं , स्वत:कडे पाहण्यास वेळही मिळत नाही.

पहिली : कामवाली नसल्याने सगळीच कामे वाढली आहेत.कामे करुन पार थकून गेले आहे.

दुसरी : आमच्याकडे मी काही कामे मुलांना व नव-याकडे सोपवली आहेत.घरातील कामाची विभागणी केल्याने 
बराच मोकळा वेळ मिळतो. आपल्याला आपलीही कामे करता येतात.     

पहिली : परवा गॅस संपला व आज सकाळी गॅस सिलेंडर आला.गॅसवाला जास्त पैसे मागत होता.मी त्याला जास्त पैसे दिले नाहीत.

दुसरी : अगं, काही ठिकाणी गॅसचा सिलेंडर पोहचवण्यासाठी शंभर रुपये जास्त घेणार, असे वाचले होते.पण त्या गॅसवाल्यांना जास्तीचे पैसे देत जावे.मेहनतीचे काम करतात. आपण हॉटेलमध्ये वेटरला चांगली टिप देतो.तो काय काम करतो? मी तरी या गॅसवाल्यांना जास्त पैसे देते. बिचारे खुष होतात.उन असो,पाउस असो नियमित सिलेंडर घरी पोहचवत असतात.     

पहिली : ट्रेनमधल्या मैत्रिणींची खूप आठवण येते आणि मग मी त्यांना फोन करते.एकमेकींना आम्ही खूप मिस करतो.

दुसरी : आम्ही मैत्रीणी ग्रुप बनवून ऑनलाईन मस्त गप्पा मारतो.गाडीत जसे गाणी म्हणतो तशीच गाणी ऑनलाईन म्हणतो.मजा करतो.रोज ऑनलाईन भेटल्याने रेल्वेप्रवासाचा फिल येतो.तू पण बोल ना सर्व मैत्रिणीशी एकाच वेळी, मजा येईल.      

पहिली : नेहमी त्रास देणारी माझी बॉस मला फोन करीत होती. पण मी तिचा फोन घेतलाच नाही.काहीतरी कामाला लावेल.नाहीतर कामावर बोलवेल. याची भिती वाटत होती.

दुसरी : अगं तू तिचा फोन घ्यायला पाहिजे होतास.कदाचित संचारबंदीत ती तुझी चौकशी करीत असेल.आता तू तिला फोन करुन विचार काय काम होतं.

पहिली : सगळी दुकान बंद असल्याने घरातले सामान काही मिळत नाही.घरातलं खुपसं सामान संपत आले आहे.

दुसरी : अगं ऑनलाईन मागवं ना. वेब साईटवर जाऊन सामानाची ऑर्डर बुक करायची. पैसे नेटबॅकींगने भरायचे,सामान आपल्या सोसायटीच्या गेटवर आणून देतात.खरच चांगली सोय आहे.

पहिली : बरं झालं तू आज भेटलीस. तुझ्याकडून खुपशा गोष्टी कळल्या.तुझा वेळ कसा जातो?

दुसरी : सकाळी योगा करते,काम करता करता गाणी ऐकते. दुपारी वाचन करुन थोडी विश्रांती. नंतर नातेवाईक किंवा मैत्रिणीशी फोनवर गप्पा. संध्याकाळी ध्यानधारणा व नामस्मरण. एखादी मालिका पाहत लवकरच झोपते.      

पहिली : लॉकडाऊनमध्ये आणखी किती दिवस जाणार? 

दुसरी : करोनाचा संकट कमी होत नाही तोपर्यत लॉकडाऊनमधून सुटका नाही.घरातच राहून सतत सकारात्मक विचार करीत दिवसभर आपली ठरलेली कामे केली व मन प्रफुलित ठेवल्यास आपल्याला कसलाच त्रास होत नाही. डॉक्टर,नर्सेस व पोलीस हे सगळे त्याच्या कुंटुबापासून दूर राहून  आपले रक्षण करीत  आहेत.  आपण मात्र कुंटुबासह राहून शॉपिंगच्या गोष्टी करीत आहोत.तेव्हा आपण सर्वांनी डॉक्टर,नर्सेस व पोलीस हे सुरक्षित राहोत यासाठी प्रार्थना करुया आणि त्यांच्या कुंटुबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया.   


चल ग जाते. गॅसवर कुकर ठेवला........    

No comments: