Friday, April 17, 2020

बंद असलेली रिक्षा



                                                   बंद असलेली रिक्षा


चालकाच्या संसाराचा गाडा चालवणारी मी ’रिक्षा’ काही दिवस मीटर टाकून व अंगावर कव्हर घालून इतर रिक्षांच्या रांगेत उभी आहे.चालक तीन चार दिवसांनी येतो.माझ्या भोवती एक फेरी मारुन पुन्हा निघून जातो.रोज मला स्वच्छ करुन नंतर देवाची पुजा करुन मला बाहेर काढणा-या चालकाचे काय झालय काहीचं कळत नाही.बाजुच्या रिक्षांकडूनही कोणतीच माहीती मिळाली नाही.मी तीन पायांवर टकाटक उभी आहे.तीनही चाकात हवा आणि पोटात इंधन आहे.टेपही सुरु आहे.सर्वांना मागे टाकून वा-यावर पळण्याची माझी तयारी आहे.पण मला उभी करुन का ठेवली आहे?काय झालं असेलं? 

चालकाने मला कधीही रस्त्यावर काढली की मी कधीच कुरकुर केलेली आठवत नाही.तीनची परवानगी असून देखील वेळप्रसंगी चारपाच प्रवाशी बसल्यावर त्यांना ओढताना मी कधी नाराजी व्यक्त केली नाही.अपघातात कोणालाच व स्वत:हा कधीच जमखी झाले नाही. गल्ली बोळ असो,हायवे असो,नाका असो,पुल असो कि बोगदा असो मी दिवसरात्र पळत असते. खड्य़ातून वेगाने न जाता चालक मला सावकाश हाकतो.स्पिड ब्रेकर धीम्या गतीने पार करतो.हेडलाईट नसली तरीही अंघारातून मार्ग काढीत मी प्रवाशांना सुखरुप घरी पोहचते.चालक माझ्या तब्तेतीची नेहमीच काळजी घेत असतो.वाहतुकीच्या कोंडीत फसलो की चालक शांतपणे वाहतुकीचे कोडे सोडत मार्गक्रमण करीत मला बाहेर काढतो.पोलीसांच्या धाकाने मला सिग्नलला उभी करुन सिग्नल पडल्यानंतरच पुढे निघतो.पावसात साचलेल्या पाण्यात भिजत आणि उन्हाळ्यात दुपारच्या कडक उन्हात घाम गाळत चालक नेईल तिकडे मुकाट्याने जात असते.मी रस्त्यावर इमानेइतबारे धावते म्हणून चालकाच्या घरात अन्न शिजते. 

चालक आणि माझ्यातले संबध कायम मैत्रीचे आहेत.कधीतरी दारु पितो.पण कधी कधी इतर रिक्षावाल्यांच्या नादाने चालक वाईट वागतो. मागे रिक्षाची भाडेवाढ झाली तेव्हा गडी खूष होता. पण ओला व उबर आल्यावर नाराज दिसला होता.चालक वृध्दांना व आजारी प्रवाशांना रिक्षात बसून त्यांची काळजी घेतो.त्यांची भाडी तो कधीच नाकारत नाही.एखादी गरोदर बाई रस्त्यात उभी दिसली की हा मला लगेच तिच्या जवळ नेऊन तिला प्रथम रिक्षात घेऊन तीला कसलाच त्रास होणार अशा पध्द्तीने मला जपून हाकतो. त्यावेळी मला चालकाचा  खूप आदर वाटतो.रिक्षाभाडे नाकारणे, वाढीव पैसे घेणे, मुद्दाम लांबून रिक्षा घेऊन प्रवाशांना लुबाडणे, मीटरमधे फेरफार करून पैसे उकळणे हे सगळे करीत सामान्य माणसाला त्रास देण्याचे काम चालकाने केल्याचे आठवत नाही.मी कधी पंक्चर किंवा नादुरुस्त होऊन रस्त्यात कघीही न पडल्याने इतर चालकांना माझा हेवा वाटतो.चालक वाहतुकीचे नियम काठेकोरपणे पाळत असल्याने कधीही दंड भरण्याची वेळ आली नाही.चालकाला ग्राहकांचा केव्हाही फोन आल्यावर त्यांच्या सेवेत जाण्यास मी तत्पर असते.प्रवाशी रिक्षात वस्तू विसरला तर चालक ती वस्तू त्या प्रवाशाला नेवून देतो. रिक्षावाल्यांच्या अडचणी, समस्या कुणी फारसे समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत याचे माझ्या चालकाला खूप वाईट वाटते.दिवस असो किंवा रात्र, थंडी, ऊन, पाऊस, वारा या कशाचीही तमा न बाळगता प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचविण्याचे कार्य हे रिक्षावाले करतात याची कोणाला कदर नाही. माझ्या रिक्षा चालकांच्या अंगी प्रामाणिकपणा ठासून भरलेला आहे.रिक्षाचालक सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा घटक आहे
    
मला अशी उभी करुन चालकाला जमणार नव्हते.मला उभी करुन ठेवल्याने व त्याचे इतर उत्पन्न नसल्याने बॅंकांचे हप्ते चालक भरणार कसा? हा प्रश्न रिक्षाला त्रास देत होता.मी जाग्यावर  असल्याने कर्जबाजारी आणि ऊसनवारी होऊन चालकाला उदरनिर्वाह करावा लागत असेल असे वाटतयं. दररोज व्यवसाय करून आपले व कुंटुबाचे पोट भरणाऱ्या रिक्षाचालकांवर मोठं आर्थिक संकट आल्याने रिक्षा दु:खी झाली होती.कधी तरी दारु पिणा-या चालकाचे दारुचे प्रमाण वाढले असेल याची रिक्षाला खात्री होती.चालक यातून कसा निभावणार? या चिंतेत रिक्षा होती. 

चालकाचे कर्ज वाढत गेल्याने काही दिवसांनी चालकांनी मला दुस-याला खूप कमी पैशात विकली.जुना चालक माझ्याजवळ आला माझ्यावरुन हात फिरवला आणि रडला.मला खुप वाईत वाटले. पण मी त्याला काहीच मदत करु शकत नव्हते.तुला मी पुन्हा याच्याकडून विकत घेईन असे त्याचे म्हणणे मला त्याच्या कृतीतून कळत होते.   

आलेल्या संकटाने रिक्षा चालकाच्या कुंटुबाची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्याला त्याचे मिळकतीचे साधनच विकावे लगले.अशीच परिस्थिती आज राज्य,देश व जगाची झाली आहे.या आर्थिक संकटाची झळ सोसत यातून कसे बाहेर पडायचे हे सर्वांच्या समोर एक आव्हान उभे आहे.रिक्षाचालकाप्रमाणे पुन्हा पहिल्यापेक्षा मजबूतीने उभा राहण्याचे आव्हान स्विकारण्याची ताकद प्रत्येकाला मिळो.  




No comments: