विशेष काय ?
काय रे सारखा विचारतो.काय विशेष? माझ्या कडे काहीच विशेष नाही.तुझ्याकडे काही विशेष असेल तर सांग न पटकन.प्रत्येकाच्या जीवनात विशेष गोष्टी घडल्याच पाहिजेत.असा संवाद असायचा.
’काय विशेष?’ किंवा ’विशेष काय?’ असे विचारण्याची एक पध्दत आहे.पण हे शब्द हल्ली कानावर पडत नाहीत.विशेष हा शब्दच विसरलो आहोत.हल्ली विशेष गोष्टीची विचारणा होत नाही.पूर्वी फोनवर बोलताना याचा सारखा उल्लेख होत असे.हल्ली विशेष काही राहीलेले नाही.रोज उठल्यापासून झोपेपर्यत त्याच त्याच गोष्टी घडत आहेत.नवीन काहीच घडतच नाही.तेव्हा काय विशेष असणार प्रत्येकाकडे?तोच तोच पणा आला आहे.सगळीकडे एकच विषय, काय करतायं? दिवस कसा जातो? कोणता छंद जोपासताय? याचीच चर्चा असते.हल्ली विशेष हा शब्दच हरवला आहे.
पूर्वी रोज काहीतरी विशेष घडत असायचे.काही नाहीतर ट्रेनमध्ये इतर प्रवाशासह जागेवरुन वाद व्हायचा.मुलांच्या शिक्षणांची प्रगती, आईबाबांची काळजी व समस्या, घरातील नवीन खरेदी, पत्नीच्या मागण्या,कामवालीच्या तक्रारी, नातेवाईकांचे आंमत्रण,गावाकडच्या गोष्टी,सहलीचे आयोजन,शेजा-यांच्या सलोखा, सोसाय़टीची मिटिंग व वाद विवाद, मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण,मित्राला पैशाची मदत,मित्रांची लफडी,स्वत:ची खरेदी,नवीन मोबाईल किंवा बॅग,एखादा सिनेमा किंवा नाटक,मॉलमधली विशेष ऑफर,ट्रेकची तयारी किंवा फोटोग्राफीची सफर,ऑफिसमधले वाढलेले काम व कमी असलेले वेतन, प्रमोशन, बॉसची फायरिंग किंवा शाबसकी,एखादी पार्टी,बदली,नवीन मित्रमैत्रीणी,संगीताची मैफिल,रोजचा प्रवास व साजरे होणारे उत्सव,जेवणातील खास पदार्थ अशा असंख्य गोष्टी दैनंदिन जीवनात घडत असायच्या त्या विशेष होत्या.गोष्टी छोट्याशा होत्या पण प्रत्येकासाठी ती गोष्ट विशेष असायची.त्यातच त्याला आंनद मिळायचा.
बाधितांची संख्या,भाज्या व फळांची गाडी,दुधाची गाडी, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे जनतेला संभोदित भाषण,थाळी वाजवून व दिवे लावून करोनाविरुध्द लढणा-यांचे मानलेले आभार,डॉक्टर व नर्सेसची वैद्यकीय सेवेत मोलाची कामगिरी,पोलिसांची दहशत ,करोनाचे झोन व कधी करोनामुक्ती याच विशेष गोष्टी झाल्या आहेत.मित्रांसह फोनाफोनी किंवा ग्रुपमध्ये ऑनलाईन गप्पा,वर्क फॉर्म होम,मिटिंग याच विशेष गोष्टी घडत आहेत.आठवणीतल्या विशेष गोष्टी आठवत उजळणी करीत आहेत.
’लॉकडाऊन’ या एका विशेष गोष्टीची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती.आपण सर्वजण या विशेष गोष्टीचा अनुभव घेत आहोत.लॉकडाऊनचे दिवस कधी संपणार या चिंतेत आपण आहेत.सगळेजण पूर्वीचे दिवस आठवत त्यात रमत आहेत.पूर्वीचे दिवस लवकरच येतील.थोडा धीर धरा.संयम राखा.मग प्रत्येकाच्या जीवनात रोजच विशेष घटना घडतील आणि आनंदाचे विशेष क्षणही येतील.
No comments:
Post a Comment