Wednesday, April 22, 2020

मनाची ओढ

                                                             मनाची ओढ 



मी एक ट्रेकर लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त आहे.माझ्या घरातून पारसिक डोगरांच्या रांगांतील काही रांगा दिसतात.पावसाळ्यात या डोगरांवरील हिरवाईचा नजारा फारच सुंदर दिसतो.  या पारसिक डोगरांच्या पायथ्याशी  बैठ्या चाळी व झोपडपट्टी वसलेली आहे. लॉकडाऊनच्या काळात बाहेर कोठे फिरता येत नसल्याने या वस्तीतील काही तरुण मुलं या डोगरांच्या माथ्यावर दुपारच्या वेळेत वावरताना दिसतात.त्यांना पाहून माझी जळते,करपते व नाराजी येते.त्यावेळी ते द्दश्य मला दिसू नये करीता मी तर खिडकीच लावून घेतो.एखाद्या गोष्टीचं वेड लागलं की मग ते वेड स्वस्थ बसू देत नाही.

मी निसर्ग प्रेमी आहे अन सह्य वेडाहि.म्हणूनच सह्याद्रीत वारेमाप भटकताना मी स्वतःला विसरुन जातो.आम्हा ट्रेकरांना सह्याद्रीत गेलो नाहीतर करमत नाही.पूर्वी ट्रेकला जाण्यास वेळ मिळायचा नाही. पण आता भरपूर वेळ हाताशी असून देखील कोठेच जाता येत नसल्याने चलबिचल वाढली आहे.एकांतपणा आला आहे. अशा परिस्थितीत मला रोज मुलांचा डोगरांवरील संचार पहावा लागत आहे.किती वाईट गोष्ट आहे,माझ्यासाठी? ट्रेकला केव्हा जाण्यास मिळणार? याची ओढ लागली आहे. सह्याद्रीच्या कुशीतील भंटकतीत  स्वर्गसुख असते.

ट्रेक म्हटलं की केलेल्या ट्रेकच्या आठवणी जाग्या होतात.ट्रेकच ठिकाण,जाण्याची तयारी,प्रवास,ट्रेकचा अनुभव ,ट्रेकहून सुरक्षित घरी परतणे व फोटो शेअर करणे सर्व काही नजरेसमोरुन जातात.जिंदादिल मन, मनगट आणि मेंदू दणकट असणार्‍या तरुणाईनेच ट्रेकिंगचा नाद करावा..!  ज्यावरुन खाली केवळ पाण्याचा प्रवाहच उतरू शकतो आणि बेलाग कड्यावर जाण्याची हिंमत फक्त वार्‍यातच आहे, अशा सह्याद्री पर्वताच्या रांगा सळसळत्या तरुणाईला ट्रेकिंगसाठी आव्हान असते.घनदाट आणि निबीड जंगलात ट्रेकिंगचा थरार खरोखरच अनुभवायचा असेल व जीवघेणे धाडस करण्याची तयारी असेल तर सुसाट निघायचं सह्याद्रीच्या कुशीत.एक आवड, छंद म्हणून मन म्हणेल तेव्हा स्वतःचे सामान स्वतःच्या पाठीवर घेऊन सह्याद्रीत भटकंती करणारी जमात ही ट्रेकरची आहे.यांना सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातील सह्यकडे नेहमीच खुणावत असतात.तसेच सह्याद्रीत झालेली मैत्री म्हणजे अतुट नात निर्माण  होतं ते कधीच तुटत नाही हे विशेष आहे.सह्याद्रीला आपापल्या परीने समजुन घेण्यातच खरी मजा आहे,सह्याद्रितील चढ़-उतार आयुष्याच्या नव्या व्याख्या शिकवतात.इथला निसर्ग जगणे शिकवतो. इथले नदी नाले निरंतर आणि संकट काळातुन वाहण्याचा संदेश देतात. इथला रानवारा मनाला सुखावून जातो. इथे प्राणी-पक्षी-वन्यजीव नवनव्या संकल्पनेतुन धैर्य आणि वेळ प्रसंगी शांततेचे रूप घडवतात. खरच हा बेलाग आणि अफाट सहयगिरी मनमोहक आणि कधी कधी रौद्र भासवुन विविधतेच दर्शन घडवतो.हेच विविधतेच दर्शन घेण्यासाठी ट्रेकर नियमित ट्रेक करीत अस्तो. ट्रेक कधीच संपू नये असे वाटत असते पण ट्रेक जरी संपला तरी जमवलेल्या आठवणी आणि अनुभव आयुष्याच्या शिदोरीसाठी मनाच्या कुपीत कायमचे साठवलेले जाते.



हल्ली घरात बंदिस्त असल्याने ट्रेकबद्द्लच्या चर्चा,थरारक मोहीमा,सह्याद्रितल्या किल्यांच्या इतिहास,हिमालयातील मोहीमा,घाटवाटांच्या वाटा असे बरेच लाइव्ह कार्यक्रम  सोशल मिडीयावर पाहत ट्रेकिंगची मजा लुटत आहे.तसेच जुने फोटो,व्हिडियो पाहत आठवणी जाग्या करीत मित्रांना शेअर करीत आहे.तसे पाहिले तर एप्रिल,मे व जूनमध्ये उन्हाळा असल्याने ट्रेकला जाणे होत नसते.काही मंडळी नाईट ट्रेकला जातात.पण या दिवसात जलदुर्गांना भेटी देणे जास्त सोयीचं ठरतं





पाहुया पुढच्या ट्रेकसाठी बहुतेक आम्हाला पावसाची वाट पाहावी लागणार आहे.तोपर्यत आम्ही आमच्या सह्याद्रीला मिस करतो आहोत.

No comments: