पक्षांची किलबिल
हल्ली पहाटेच्या शांतवेळी विविध पक्षांची किलबिल ऐकली का? हल्ली पहाटेच्या वेळीच का संपूर्ण दिवसभर पक्षांची किलबिल सुरु असते.पक्षांचे सुमधूर संगीत ऐकताना आंनद मिळतो.माणसांचा कोलाहल नाही व वातावरण शुध्द व निमर्ल असल्याने पक्षी मुक्त संचार करीत आहेत.शांततेचा पक्षीच जणू मनमुराद आनंद लुटत असल्याचे चित्र दिसते.असं वाटतं कोठे होते हे सुंदर पक्षी व त्याचं संगीत? शांतता असल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट व चिवचिवाट स्पष्ट ऐकू येत असतो.ही पक्ष्यांची किलबील ऐकायचीच असेल तर बागेत, जंगलात किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जावे लागते.थंड हवेच्या ठिकाणी अशी पक्षांची किलबिल ऐकलेली होती.मनुष्य प्राण्याचा निसर्गातला वावर नसल्याने पक्षी व प्राणी निसर्गात आंनदात मनमुराद बागडताना दिसत आहेत.पक्षी निरीक्षणाला जंगलात जाण्याची गरज नाही पक्षीच आपल्या अगदी जवळ आले आहेत.निसर्गाने मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केलीय.’किलबिल किलबिल पक्षी बोलती’ या कवितेची आठवण झाली.
या पक्ष्यांची किलबिल इतकी सुखद असते की, सतत ऐकत रहावं असं प्रत्येकाला वाटायला लागेल.मात्र काही पक्षी हे खूप लहान असतात तर काही पक्षी झाडाच्या एकदम वर कुठेतरी पानांत लपलेले असतात.त्यामुळे कोणता आवाज कोणाचा आहे हेच मुळी कळत नाही.तसेच आपल्या आसपास अनेक पक्षी असतात. मात्र आपल्या पक्षी अज्ञानामुळे आपल्याला त्यांना ओळखता येत नाही आणि त्याची कधी आपल्याला गरजच वाटली नाही.एखाद्या पक्ष्यांची किलबिल,एखाद्याची शीळ,एखाद्याचा वेगळा आवाज ऐकू आला की,आपली नजर फांद्या-फांद्यांवरून भिरभिरत त्या पक्ष्यांला शोधत राहते.निसर्गाला सुंदर बनवण्यामागे पक्षांच्या आवाजाचं फार मोठं योगदान आहे.
मनुष्य प्राण्याच्या निसर्गातल्या वावराबद्दल पक्षांमध्ये नाराजी आहे.गेल्या काही वर्षांत या शहरात सिमेंटची जंगले उभी राहिल्याने निसर्ग संपदा नष्ट होत आहे.भल्या सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे उघडणारी झोप बरेचदा वाहनांच्या कर्णकर्कश्श हॉर्न किंवा मोबाइलमधील अलार्ममुळे उघडते. या सर्व गोंधळात सकाळी असणारा पक्ष्यांचा किलबिलाट कुठेतरी हरवून गेलेला असतो. जसजसा दिवसाचा प्रहर पुढे सरकतो तसा वाहनांच्या रस्त्यावरील गर्दी व हॉर्नमुळे तर पक्ष्यांचा मधुर किलबिलाट यात पूर्णपणे दबून जातो.शहरात सर्वत्र सिमेंट-काँक्रिटच्या उंच उंच इमारती उभ्या राहिल्या अन् झाडांची संख्या कमी झाली. जिथे पक्ष्यांची घरटी होती, त्याठिकाणी माणसांनी घरोबा केला. त्यामुळे किलबिलाट तसाही कानांपासून दूर गेला होता.हवेतील प्रदुषण वाढल्याने या पक्षांना त्रास जाणवत असल्याने ती शहरातून लांब जंगलात जात आहेत. हल्लीच्या शहरीकरणामुळे पक्षी नाहीसे होत आहेत ही एक चिंतेची बाब आहे.पक्षांना विविध वायूमुळे आणि ध्वनींमुळे अनेक आजार होतात.पक्षांची स्थिती मानवापेक्षा अतीनाजूक असते.त्यांची श्रवण क्षमता आणि गंध घेण्याची तीव्रता मानवापेक्षा कित्येक पटीने जास्त असते.फटाक्यांच्या आवाजाचा व धुराचा मानवाला त्रास होतो.त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात या पक्षांना त्रास सहन करावा लागतो.बेसुमार वृक्षतोड, वाढते प्रदूषण, कचर्याच्या समस्या, असंतुलीत पर्जन्यमान अशा अनेक कारणांमुळे आपला निसर्ग धोक्यात येत असतो.निसर्ग संपत्तीचे रक्षण करण्याऐवजी आपण त्यावरच प्रहार करत आहोत.प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा समतोल बिघडवण्याचे जे काही उद्योग चालवले आहेत त्यावर सक्तीचे निर्बंध आणावे लागतील.
शहरातील कावळा, पोपट व मोरांचे व्हिडीयो व्हायरल झाले आहेत.माणसं मोठ्या संख्येने बाहेर दिसत नसल्याने या पक्षांना माणसाची भिती वाटत नाही.अनेक रस्त्यांवर जंगली प्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. आपण पक्षांसाठी घरटी बांधून त्याच्यासाठी पाणी व खाऊची सोय करुन त्याच्यांशी जवळीक साधू शकतो.
जेव्हा निसर्ग जपला जाईल तेव्हाच या समृद्ध वसुंधरेचा खरा मान राखला जाईल.आपण निसर्ग जपला,तर निसर्ग त्याचा समतोल राखत आपल्याला जपणार आहे.निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे.निसर्गाची जपणूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने ओळखली पाहिजे.
निसर्गाला जपा तरच निसर्ग आपल्याला जपेल.
No comments:
Post a Comment