Sunday, April 26, 2020

मॉर्निंग वॉकची हौस

                                                       मॉर्निंग वॉकची हौस

सकाळी लवकरच दुध आणायला खाली उतरलो.समोरच बाजुच्या सोसायटीतले काका वय वर्षे ७०,तोंडाला रुमाल बांधून व  हातात काठी घेऊन मॉर्निंग वॉकला चालले होते.मी त्यांना पाहून आंचबित झालो.मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहून पुढे निघून गेलो.दुधासाठी सोसायटीच्या गेट ओलांडून रस्त्यावर जावे लागते.दुध घेऊन परतत होते तेव्हा रस्त्यावर बरीचशी व्यवस्कर मंडळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेली दिसली.सगळा प्रकार पाहून वाईट वाटले.ही व्यवस्कर मंडळी कशासाठी धोका पत्करत आहेत? यांची मला काळजी वाटली. कोण समजवणार यांना? तसेच हे समजवून घेणार आहेत का? घरातल्या मंडळीचं देखील हे का ऐकत नाहीत? या नागरिकांना आपल्या आरोग्याबाबत भीती वाटत नाही का? शासनाच्या आवाहनाचे उल्लंघन का करीत आहेत?असे अनेक गंभीर प्रश्न समोर आले.

करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना शहरातून सध्या मॉर्निंग वॉकची लाट आलेली दिसत आहे. ’वॉक’ मधल्या प्रकारातील ’मॉर्निंग वॉक’ हल्ली खूप गाजतोय. इतर कोणत्याही ’वॉक’ मध्ये फटके पडत नाहीत.पण हा वॉक करणा-यांना पहाटेलाच चांगले फटके पडत आहेत.पोलिसांनी अलीकडंच लॉकडाऊनचं उल्लंघन करून मॉर्निंग वॉक करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.शिवाय, त्यांना परेडही करायला लावली.व्यायामाची आवड असलेल्या नागरिकांकडून पोलिसांनी सूर्यनमस्कार व योगासनं करून घेतली.तसेच त्यांना रस्त्यातच दंड आणि बैठकाही मारायला लावल्या. काहींच्या हातात फलक देऊन त्यांचे फोटो काढून सोशल मिडियावर प्रसिध्द केले.तरीही ही मंडळी बाहेर पडतच आहेत.



नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करून लॉकडाऊनच्या काळात घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे.पोलीस यंत्रणा करोनाचा प्रसार वाढू नये या करीता लोकांनी घरात राहण्यासाठी रस्त्यावर अहोरात्र पहारा देत आहेत.सकाळी फिरायला जाणा-यांची संख्या पोलिसांपुढे चिंतेचा विषय झाला आहे. देशाचे पंतप्रधान,राज्याचे मुख्यंमत्री,राजकिय नेते मंडळी,सिनेकलाकार लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करत आहेत.सुजाण नागरिक लॉकडाऊनच्या काळात घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमूल्य योगदान देत आहेत.घरच्या घरात व्यायाम,प्राणायाम,ध्यानघारणा करत आहेत.करोन  व्हायरसपासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी घरातच राहणं हा सुरक्षेचा एकमेव पर्याय आहे.डॉक्टरांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मॉर्निंग वॉकला जाण्याची आवश्यक असल्याचे सांगितले आहे.मॉर्निंग वॉक हा वॉक तब्तेतीसाठी चांगलाच आहे.पण आता परिस्थिती वेगळी असताना हा वॉक केलाच पाहिजे का? राजकारणातल्या व सोसायटीतल्या गोष्टिंवर टिका व वाद घातला नाही तर जेवण घश्याखाली उतरणार नाही का? व्यवस्कर मंडळींनी हा वॉक घेतला नाही तर ही मंडळी आजारी पडणार नाही.पण या  विषाणूची लागण झाली तर मात्र आपण व आपल्या कुंटुबाला मोठी संकटात टाकाल.या करीता पर्याय शोधा.  

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी शारीरिक व्यायाम खूपच गरजेचा आहे.घराच्या बाहेर न पडता घरातल्या घरात   मॉर्निंग वॉक करु शकता.घरच्या घरी चालायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर घरात एकाच पद्धतीने फक्त चालण्याचा सराव करायचा. ज्यांच्या घरी ट्रेडमील असेल ते त्यावर चालण्याचा सराव करू शकतात. ज्यांचे घर मोठे आहे ते घरात, निरनिराळ्या खोल्यांमधून, बाल्कनी, टेरेस, घरातील बागेतून फिरून चालण्याचा व्यायाम करू शकतात. जर तुमच्या घरात निरनिराळे मजले असतील तर जिन्यांवरून वर -खाली चढत उतरत तुम्ही व्यायाम करू शकता. मात्र ज्यांचे घर अगदी लहान आहे त्यांनी फक्त एकाच ठिकाणी उभं राहून चालण्याचा फक्त सराव केला तरी त्यांना नक्कीच फायदा मिळू शकतो. याचाच अर्थ असा की, आपण घराबाहेर अथवा रस्त्यावरून चालत आहोत अशा प्रकारची शारीरिक हालचाल करायची. थोडेसे पुढे गेल्यावर पुन्हा मागे येत चालण्याचा सराव करायचा. चालण्याचा व्यायाम करताना कंटाळा येऊ नये यासाठी घरात एखादं आवडीचं संगीत लावा आणि फक्त घरात चालण्याचा सराव करत राहा. 

हा संकटाचा काळ नक्कीच निघून जाईल आणि देश कोरोनामुक्त झाल्यावर घराबाहेर पडून तुम्ही पुन्हा मुक्त संचार करून तुमचा ’मॉर्निंग वॉक’ नियमित करू शकाल. 

No comments: