Tuesday, April 28, 2020

घड्याळ

                                                                     घड्याळ


दिवस जसा उजाडतोय  व तसा दिवस माळवतोय. हल्ली भिंतीवरील घड्याळाकडे कोणीच पाहत नाही. मनगटावर बांधलेल्या घड्याळातल्या काट्य़ावर धावणा-यांचे घड्याळ तर टेबलाच्या टॉवरमध्ये पडले आहे.घड्याळातली वेळ पुढे सरकत आहे.ती सरकती वेळ पाहण्य़ास कोणाकडे वेळच नाही. वेळेला महत्व राहीले नसल्याने तर घड्याळाचे महत्व संपले आहे.घड्याळ हे काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण आहे.हे उपकरण आता बिनकामाचे ठरले आहे.त्या वेळ दाखवणा-या घड्याळाची टिकटिकच जणु काय थांबली आहे.घड्याळाची टिक टिक टिक ज्या व्यक्ती चांगल्या अर्थाने घेतात,ते वेळेचा उपयोग करत बरचं काही मिळवतात आणि ज्यांना टिक टिक टिक ही किट कीट वाटते ते काहीच मिळवू शकत नाहीत.घड्याळ माणसाला वेळेचं महत्व पटवून देतं, प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याची शिस्त लावतो.जगभरातील बहुतांशी लोक हे या घड्याळाच्या तालावर आपलं आयुष्य जगत आहेत.      

मोबाईल आल्याने घड्याळाचे महत्व कमी झाले आहे.खुपजणांनी घड्याळाचा वापर कमी केला आहे.तरीही बाजारात एकापेक्षा एक महागडी घड्याळं विक्रीस उपलब्ध आहेत.आज घड्याळांची चोरी न होता मोबाईलच्या चो-या वाढल्या आहेत. 



जीवनात सर्वात महत्त्वपूर्ण स्थान असतं घड्याळाचं.केवळ घराच्या भिंतीवर घड्याळ लावून दिल्याने जीवनात यश मिळत नसून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.घड्याळ आपल्या मोजमाप संस्कृतीचे एक अविभाज्य अंग बनले आहे.घड्याळात  वेळ मोजता येते पण त्या वेळेचा आपण कसा सदुपयोग केला हे काही मोजायची सोय घड्याळात नाही.

घड्याळाच्या ’आलार्म’ ने दिवसाची सुरुवात होते ती अगदी रात्री झोपताना आलार्म लावण्यापर्यंत. उद्या सकाळी किती वाजता उठायचं याचं प्लॅनिंग करून आदल्या दिवशीच घड्याळावर आलार्म लावला जातो. म्हणजे रात्रीपासूनच घड्याळ आपल्या सोबतीला असते. दिवसभरात सारं काही घड्याळावर अवलंबून असतं.घडयाळातील वेळ स्वत:  पळत आपल्याला पळवत असते. जर कोणी दमला आणि थांबला तर घड्याळ त्याचासाठी कधीच थांबत नाही.वेळेला महत्व असल्याने वेळ पाळणारे पळत असतात.वेळ न पाळणारे कधीच वेळेवर येत नाहीत.कारण ते घड्याळच वापरत नाहीत.घड्याळ्याच्या काट्यावर कामे सुरु असायची.हल्ली घरातून बाहेर पडायचे नसल्याने घड्याळ पहाण्याची वेळच येत नाही.किती वाजले ते कळत नाहीत.मनाला वाटेल तसे जीवन जगत असल्याने घड्याळाची गरजच लागत नाही.पूर्वी वेळ पुरत नव्हता.आता तर वेळच वेळ आहे आणि हाताला व डोक्याला काम नसल्याने कसं शांत,प्रसन्न,ताजेतवानं व ताणतणाव नसल्याचे सुख अनुभवत आहेत.वेळेची बंधने नसल्याने सुखी, समाधानी,आनंदी जीवन जे पूर्वी कधी जगण्याची संधी मिळाली नव्हती असं जीवन जगत आहे.

आपल्यावर आलेले संकट दूर झाल्यावर पुन्हा पूर्वीसारखीच आपली कामे  सुरु होतील याची खात्री आहे.नव्याने मुंबईकर घड्याळाच्या काट्यावर स्वार होणार.पुन्हा गडबड व धावपळ सुरु होणार.मुलांना स्कूलबसवर सोडून ८.१० च्या गाडीने मस्टर पकडण्यासाठी पळत सुटणार.तीच रेल्वेतील गर्दी,तीच वाहतुक कोंडी,रिक्षांच्या घुसखोरी,बसची वाट पाहत व मग लटकत प्रवास करीत ऑफिसला पोहणार.ऑफिसमधली चहापाण्याची व जेवणाची वेळ न पाळता कामे आटपून संध्याकाळी ६:३० च्या गाडीने प्रवास करुन नंतर  बाजारहाट करुनच घरी पोहचणार.घरी मुलांची व जेष्ठांची विचारपूस करीत टि.व्ही पाहत जेवण करणार.उद्याची तयारी करुन आलार्म लावूनच झोपणार. दुस-या दिवशी सुट्टीची वाट पाहत पुन्हा ऑफसला निघणार.  
     
पून्हा घड्याळं सुरु होणार आणि मुंबईकर पळणार.

No comments: