Friday, May 1, 2020

वर्क फ्रॉम होम

                                                    वर्क फ्रॉम होम 

करोना विषाणूला आळा घालण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे.करोनाचा संसर्ग वाढू नये याकरीत  देशात लॉकडाउन घोषित झाला.   अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. 'वर्क फ्रॉम होम' म्हणजे घरूनच काम करणे,ही नवी संकल्पना रुजली आहे.'एक आभासी कार्यालय' ही संकल्पना आता नव्याने रूजू पाहत आहे. ऑफिसची कामे घरात बसून करण्याचा विचार मांडला असता तर सर्वांनी वेड्यात काढले असते.पण अनेक जण हल्ली घरातूनच त्यांच्या ऑफिसचं काम योग्यरित्या करीत आहेत.मोठ्या आयटी कंपन्यांचे ९० ते ९५ टक्के कर्मचारी घरून काम करीत आहेत. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे.टाटा कंपनीने मात्र अनोखी शक्कल लढवली आहे.त्यांनी आपल्या तब्बल अडीच लाख कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे.विशेष म्हणजे लॉकडाउन संपल्यावरही हे कर्मचारी कायमचं घरातूनच काम करणार आहेत.यात कंपनीची व कर्मचा-यांची चांगली सोय झाली आहे.घरून केलेले काम म्हणजे बदल्या 'वर्क कल्चर'चे एक पुढचे पाऊल म्हणायला हरकत नाही.

ऑफिसची कामे घरात बसून करण्याचा विचार मांडला असता तर वेड्यात काढले असते. 'वर्क फ्रॉम होम' सुरु झाल्यानंतर ऑफिसला जायाचं नसल्याने व बॉस दिसणार नसल्याने चांगलं वाटलं होतं.ऑफिसला जायाचं नसल्याने तयार व्हायची,डब्याची,धकाधकीच्या प्रवासाची गरज नसल्याने मजा वाटली.सगळं कसं निवांत,आपणच आपले बॉस.काय मस्त वाटतयं लेका.घरातच ऑफिस बनवत व बहुतांशी वेळ एकतर लॅपटॉपच्या समोर किंवा मोबाइल स्क्रीनसमोर घालवत वर्क फ्रॉम होम एन्जॉय करत आहेत.पण ऑफिस मध्ये जाऊन टाइम पास करायचे त्यांना आता घरच्यांना दाखवायला काम करावे लागते.इंटरनेटची मंदावलेली गती,घरातील लहानग्यांचा गोंधळ, जेष्टांना मदत व घरातील इतर कामे अशा अडथळ्यांवर मात करत करत तुम्ही काम संपवलेलेही असते. मात्र, दिवसाअखेर तुमच्या लक्षात येते की, काहीही असो, पण आपल्या कामाची गती काही अपवाद सोडले तर ऑफिससारखीच आहे.कर्मचाऱ्यांचा प्रवासातील वेळ वाचल्याने स्वखुशीने जास्त वेळ काम करणाऱ्यांचीही संख्या अधिक असल्याचेही  निदर्शनास आले.कार्यालयात न गेल्याने वेळ, पैसा, ऊर्जा आदी गोष्टींची बचत आपसूकच झालेली आहे. 

सुरुवातीचे नाविन्य संपल्यानंतर आता त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत.घरातून काम करताना त्यानी आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यायलाच हवी. मात्र घरुन काम करत असताना प्रत्येकाला काही ना काही समस्या निर्माण होतच असतात. त्यातली सगळ्या मोठी समस्या म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवणं. काही जणांना ऑफिसचे काम आणि घरातील जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागत असल्याने, थकवा जाणवत आहे. तर काही जणांना नोकरी टिकण्याचे टेन्शन असल्याने तणाव वाढत आहे.ऑफिसमध्ये असताना त्यांची मीटिंग व्हायची, एकमेकांशी संवाद व्हायचा आता मात्र सगळेच ऑनलाइन झाल्याने पाठदुखी वाढली आहे आणि डोकेदुखीही वारंवार डोके वर काढू लागली आहे.घरातून काम करताना काही 'हित' साधले जात असतेही,पण त्या व्यक्तीला 'गृहीत' धरले जाण्याचीच शक्यता अधिक वाढल्याची जाणीव होत आहे.


घरामध्ये मिळणारा इंटरनेटचा कमी वेग, लॅपटॉपच्या सुविधांमधला अभाव, पुरेशा ‘बँडविथ’ची कमतरता,या तांत्रिक अडचणी आहेतच, पण त्याहीपेक्षा जास्त अडचण म्हणजे कामाचा वाढलेला अतिरिक्त भार! पूर्वी निदान नोकरीच्या ठरावीक वेळात काम असायचं. आता तर काळ-वेळ उरलेलाच नाही. घरीच आहे म्हटल्यावर बॉसचा कधीही मेसेज येतो की ‘ऑनलाइन’ मीटिंगसाठी तयार राहा. मग कामाचा कीस पाडला जातो, सूचना केल्या जातात. नवीन ‘असाइन्मेंट्स’ दिल्या जातात.


करोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करताना सर्वात जास्त भरडल्या जातात त्या स्त्रिया! एकतर लॉकडाऊनमुळे घरकाम करायला कुणी मदतनीस नाही. त्यामुळे घरचा भारही ओढायचा आणि ‘वर्क फ्रॉम होम’ करायचं. नवरा आणि मुलं थोडीफार मदत करतात. पण जेवणखाणापासूनची वेळखाऊ कामं शेवटी त्यांच्यावरच पडतात. भाजीला फोडणी देत देत कामाचे फोन घ्यावे व करावे लागतात. म्हणजे घरकामही करा आणि ऑफिसची दिवसभरातली ‘टारगेट्स’ पूर्ण करा. 


करोनामुळे मिळालेला ‘वर्क फ्रॉम होम’ हा पर्याय अनेकांना सुखावह वाटण्यापेक्षा चिंतेत व ताणात भर घालणारा आहे.


No comments: