Sunday, April 5, 2020

२१ दिवसांची कैद

                                                   २१ दिवसांची कैद

      अशा प्रकारची कैद होईल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते.ही कैद कोणत्या न्यायलयातील खटल्यात दोषी ठरल्याने न मिळता एका संकटावर मात करण्यासाठीची कैद आहे.मानवी समूहांनी स्वत:ला कैद करुन घेऊन एक लढाई लढत आहेत.स्वत:ला कैद करुन शत्रुला नामोहरण करण्याचे उद्दिष्ठय़े साध्य करीत आहेत. या लढाईत कैद हेच शस्त्र आहे.अशा प्रकारची लढाई इतिहासात देखील झाली नसावी.हे काही युध्दकैदी किंवा गुन्हा केलेले कैदी नाहीत.कैदेतून लढणारे लढवय्ये आहेत.मात्र या कैद्यांना कोठेही एकत्र येण्यास मनाई केली आहे.कैद ही कैद्यांना शिक्षा दिली नव्हती तर तो शत्रुशी लढण्याचा गनिमी कावा होता.शत्रूला कमकुवत करण्याची ही एक चाल आहे. 

सर्वजण कैद भोगत आहेत.ही कैद अंधाऱ्या पोलीस कोठड्यांमध्ये नाही तर आपल्याच घरातच असल्याने घरात कैदी काही करु शकत आहोत.तुरुंगातील कैद नाही.कैदेत फक्त बाहेरचे व्यवहार बंद आहेत.प्रत्यक्ष भेटीला परवानगी नाही पण संपर्क साधण्याची मूभा आहे.घरातल्या कैदेत देखील हल्ला होण्याची शक्यता असल्याने कैदींने आपले हात धुणे,खोकताना तोंडावर रुमाल धरणे व दोधामध्ये अंतर ठेवणे या गोष्टींचे पालन करावे लागत आहे.घरातल्या लहानथोर सर्व मंडळीला ही कैद झाली आहे.कोणाचीही यातून सुटका नाही. फक्त जीवनाश्यक वस्तू  आणण्यासाठी एकाला बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे.  तरीही बाहेर पडण्यासाठी नवेनवे डावपेच आखले जातात.पण यांना कल्पना नाही शत्रू बाहेर लपून बसलेला आहे.हा शत्रू दिसत नसल्याने भयंकर धोकादायक आहे.


काही कैद्यांनी ही कैद न समजता आपल्याला मिळालेली संधी समजून त्यावेळेचा चांगला उपयोग केला आहे.कैद होण्यापूर्वी घरातला प्रत्येकजण धावत होता.त्याला वेळच मिळत नव्हता.पण कैद मिळाल्यानंतर बंदिस्त असलेल्या कैद्यांनी आपल्या घरात पहिल्यांदा एवढा काळ एकत्र घालवला असेल.प्रत्येक कैदी एकामेकाला मदत करीत आहे व लहानथोरांना जपत आहे. परस्परांशी नाती जपत कैदेचा काळ  मजेत घालवत आहेत.ज्या कैद्यांना घरात बसण्याची सवय नव्हती ते मात्र कंटाळले आहेत.निराशेने दिवस मोजत स्वत:ला त्रास करून घेत आहेत.याचे परिणाम कैद्यांमध्ये वाद होत आहेत. 

या कैद्यांना कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दिवसरात्र पोलीसांचा जागता खडा पहारा आहे. शत्रू  पासून  बचाव करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.संवेदनशील भागात पोलीसांची अतिरीक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.कैद्यांच्या हालचालींवर त्यांची बारीक नजर असल्याने कैदी सुरक्षित आहेत.काही कैदी परदेशातून हल्लीच आले असल्याने त्यांना
बंदिस्त केले आहे.सरकारने एकच वेळी १३० करोड कैद्यांना कैद केल्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. या कैदेचा अनुभव घेतल्याने
समाजतले गुन्हे कमी होतील.काही देशात शत्रुने हाहाकार माजवला आहे.आपल्या देशात शत्रुच्या हालचालीवर कडी नजर ठेवल्याने आपण शत्रुला अजून पर्यत काबूत ठेवू शकलो आहोत. 
      

हे कैदी कैदेत असताना सोशलमिडियावर सक्रिय असल्याने इतर कैद्यांशी संर्पकात राहून विचारांची देवाणघेवाण करीत आहेत.तसेच त्यांना शत्रुच्या हालचालींबद्द्ल माहीती मिळत राहते.काही समाजद्रोही कैदी समाजात अफवा फैलावत परिसरात तणाव निर्माण करीत आहेत.सरकारने अशा समाजद्रोही कैद्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. बरेच कैदी दिवसरात्र मोबईल या यंत्राच्या मदतीने कैद व्यतीत आहेत.काही कैदी शत्रुला गाफिल ठेवून घरातूनच आपल्या ऑफिसची कामे करीत आहेत.

शत्रुच्या हल्ल्याने जखमी झालेल्या कैद्यांना रुग्णाल्यात डॉक्टर व नर्सेस उपाचार करीत आहेत.जास्त जखमी झालेले कैदी मरत आहेत.डॉक्टर व नर्सेस रात्रदिवसरात्र जखमी कैद्यांची सेवा करीत त्यांना बरे करुन घरी पाठवित आहेत.         


ज्या कैद्याने ही कैद आनंदाने स्विकारली त्याला कैद सुखदायी ठरली आहे. या कैदेने कैद्याला मानवी मूल्यांची चांगलीच शिकवण मिळाली आहे.कैद कधीच कोणाला आवडणारी नसते पण ही भोगलेली कैद कायम स्मरणात राहिल.   

शत्रुचे हल्ले वाढले आहेत.राज्यकर्त्याने कैद्यांना बाहेर न पडण्याची शक्त ताकीद दिली आहे.शत्रुशी लढाई सुरु असल्याने कैदी कैदेतच सुरक्षित राहून लढा देत आहेत... 

No comments: