Tuesday, May 12, 2020

बालक पालक


                                                               बालक पालक 


ज्या पालकांची मुलं लहान आहेत.त्यांना लॉकडाऊनच्या काळात घरात बंदिस्त करुन संगोपन करणे कठिण काम आहे.अशा पालकांना माझा सलाम. थोरामोठ्यांना परिथितीचे गांभीर्य आहे.ते समजू शकतात.पण लहान मुलांना घरात डांबून ठेवणे म्हणजे त्यांना शिक्षा दिल्या सारखीच आहे.मुलांना शाळा नसून सुट्टी असल्याचा आंनद घरातच राहून घ्यावा लागत आहे.बाहेर फिरण्यास जाता येत नाही.मित्रमंडळींबरोबर खेळता येत नाही आणि नातेवाईकांना घरी बोलवता येत नाही.अशा कचाट्यात पालक सापडले आहेत.मुलांना घरातच ठेवून जगाशी संबध न आणता सुरक्षित ठेवणे म्हणजे पालकांची तारेवरची कसरत आहे.मुलांची जीवनशैली आणि आहाराची काळजी घ्यावी लागत आहे.त्यांना आजारपणापासून दूर ठेवावे लागत आहे.या मुलांना घरात थोपवणे पालकांना खूप कठिण जात असेल.त्यातच सर्व दक्षता घ्यावी लागत आहे.सारखे हात धुवावे लागत आहेत.पण त्यातच काही शाळा ऑनलाईन शिकवण्यास सुरुवात करीत आहेत.हा नवा गोंधळ सुरु झाला आहे.

कधीतरी स्वतःचं लहानपण आठवतं, तेव्हा बरेचदा आठवतात ती मित्रमैत्रिणींची लुटूपुटुची भांडणं. 'कट्टी बट्टी बाल बट्टी बारा महिने बोलू नको लिंबाचा पाला तोडू नको' - असं अगदी तावातावाने एकमेकांना म्हणणारे पुढच्या काही मिनिटातच पुन्हा एकत्र येऊन खेळायलाही सुरुवात करायचो. आता हे सगळं आठवताना गंमत वाटते आणि मग उमगत जातं की, आपण इतर माणसांशिवाय राहू शकत नाही.मुलं मित्रमैत्रिणीशिवाय जगू शकत नाहीत. 

किती छंद जोपासणार,टि.व्ही पाहणार,गेम खेळणार,गोष्टी सांगणार,पुस्तकं वाचणार,पत्ते व सापसिडी खेळणार,फोनवर बोलणार?मस्ती  करण्याच्या वेळी हे खेळ खेळण्यास त्यांना आवडत नाही.मस्ती करायला व खेळायला मित्रांना भेटता येत नाही ही एक लहान मुलांनासाठी मोठी शिक्षाच आहे.देवानी ही शिक्षा आम्हां लहान मुलांना का दिली? असा प्रश्न ती विचारत आहेत.शाळेतून घरी आल्यावर दप्तर टाकून बाहेर पळणारी मुलं घरातून बाहेर न पडता शांतपणे एकटीच खेळत आहेत. खिडकीतून किंवा गॅलरीतून त्याचा दोस्ताना ठिकवत आहेत.यावर्षी गांव किंवा सहलीला जाता येणार नसल्याने छोटी मंडळी नाराज झाली आहेत.तसेच उन्हाळी शिबीर नसणार आहेत.धम्माल,मौज मजा,मस्ती करण्याची  ऊन्हाळ्याची सुट्टी घरात काढावी लागत आहे.या मुलांसाठी नवीन खेळणी आणता येत नाही.त्यांच्या आवडीचे पदार्थ घरात बनवून त्यांना खाण्य़ास देता येतात.पण पिझा,बर्गर,आईस्क्रिम बंद असल्याने ही मंडळी नाराज आहेत.’यारे या सारे या, मजा करुया,मजा करुया’ हे हल्ली म्हणता येत नाही. 
           
यावर्षी शाळेचा शेवटचा दिवस साजराच झाला नाही.त्यामुळे काही मुलांना आपल्याला सुट्टी लागली आहे याची कल्पना देखील नाही.     मार्च, एप्रिल महिने सुरू झाले की विद्यार्थ्यांना वेध लागतात ते उन्हाळी सुट्टीचे. तर या सुट्टीच्या कल्पनेनं पालकांच्या पोटात गोळा उभा राहतो. "सुट्टी सुरू झाली की, मी हे करणार, ते करणार, अजिबात लवकर उठणार नाही, अभ्यासाचं तर नावही काढणार नाही," असं म्हणणारी मुलं यावर्षी आईबाबांच्या कुशीत शांत पडून आहेत.खरतर अशी सुट्टी म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात नव्यानं नातं निर्माण करण्याची एक संधी असते. त्यांच्याशी संवाद फुलवण्याचा प्रयत्न जर आपण पालकांनी केला तर मुलांना ते हवंच असतं. पण नोकरी व्यवसायामुळे ते प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण यावर्षी ह्या संधीचा पालकांनी योग्य उपयोग करुन मुलांना कोमेजून देऊ नये.त्यांच्या सोबत कायम राहून त्याचा एकटेपणा दूर केला पाहिजे.कळत नकळत तुमच्यात जे बॉंडींग तयार  होतं ते इतर कोणत्याही आनंदापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं.आपल्याच माणसांकडून शिकण्याचा, त्यांच्याशी मनसोक्त संवाद करण्याचा आणि घरातल्या अनोख्या समर कॅम्पचा अनुभव मुलांच्या कायमचा स्मरणात राहील.मुलांना ही सुट्टी आयुष्यभर लक्षात राहील.


एक मात्र चांगलं झालं मुलांना आपल्या पालकांबरोबर भरपूर वेळ घालवण्याची संधी मिळाली.आईवडीलांना मुलांना वेळ देता आला. 



No comments: