Saturday, May 5, 2012

मुलांची सुट्टी

           शालेय शिक्षणात सुट्टीला मोठे महत्व आहे.शिक्षणासह विद्यार्थ्याना सुट्टीची गरज असते.त्या काळात मुले धमाळ,मजा,मस्ती करीत असतात.सुट्टी म्हटली की आराम, थोडासा आळस, धमाल-मस्ती, कधीतरी पिकनिक असा सगळा मसाला मारके माहोल असतो. परीक्षेनतंर पडलेली सुट्टी खुप आनंदाची असते.वर्षभर मुलं या मोठया सुट्टीची  आतुरतेने वाट पाहत असतात.मुलांच्या परीक्षा संपून मस्त सुट्टी चालू झाली असेल.एप्रिल-मे म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीचाच सीझन.आता शाळेला सुट्या म्हणजे दिवसभर घरात नुसता धुडगूस. मुलांना दीड-दोन महिन्यांच्या सुट्या म्हणजे पालकांना मोठं टेन्शन. मुलांच्या या लांबलचक सुट्टीत त्यांना सतत कशा ना कशात गुंतवून ठेवणं हे पालकांपुढचं मोठं चॅलेंज. एवढय़ा मोठया कालावधीत मुलांसाठी काय करायचं, त्यांना नक्की कशात गुंतवायचं, हा कालावधी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल या दृष्टीनं नियोजन कसं आखायचं, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास पूरक ठरेल असं मुलांना या सुट्टीत काय देता येईल हे बघणं या सगळ्या गोष्टी सगळ्याच पालकांच्या मनात घोळत असतात. पण त्यातही विशेष करून लहान मुलांच्या पालकांसमोर हे प्रश्न मोठय़ा प्रमाणावर असतात. साधारण तीन ते सात या वयोगटातल्या मुलांच्या पालकांसमोर मुलांची दोन-अडीच महिन्यांची सुट्टी म्हणजे त्यांची सत्त्वपरीक्षाच असते.


    सुट्टीत मुलांनी सतत काहीतरी केलं पाहिजे, शिकलं पाहिजे असं मुळीचच नाही. मुलांना लोळत पडायचं असेल, उशिरा उठायचं असेल तर ते त्यांना करू द्या. सुट्टी ही त्यांची आहे. ती सत्कारणी लागली पाहिजे हे बरोबरच; पण त्यासाठी त्यांच्या मागे लागण्याची किंवा सतत त्यांना कशा न कशाला जुंपण्याची गरज नाही. आपण काही शिकवलं नाही तरी या वयातली मुलं काही ना काही शिकतच असतात. त्यामुळे सुट्टीचा धस्का घेऊन त्यांच्या मागे हजार क्लासेसचं शेड्युल लावण्याची गरज नाही.

    वार्षिक परीक्षेच्या शेवटच्या पेपरची एवढी आश्चर्यकारक ओढ लागलेली असायची आणि कधी एकदा ती शेवटची उत्तर-पत्रिका देऊन टाकतेय असं झालेलं असायचं. कारण शेवटच्या पेपरचा दिवस हा परीक्षेत गणला जायचाच नाही. पुढच्या दोन महिन्याच्या पोटभर सुट्टीचा पहिला घास असायचा तो दिवस!

     गांवातली सुट्टीची वेगळेची मजा असते.लाल मातीत खेळणे,नदीत पोहणे,झाडांवर चढणे,आंबा,फणस व करवंद   खाणे,जंगलात फिरणे, बैलगाडीत बसणे,रात्री अंगणात चांदण्य़ा मोजत झोपणे हे अनुभवण्यासाठी सुट्टीत गांवाला जावे लागते. 

     या सुट्टीचा फायदा घेऊन ज्ञान आणि मनोरंजन अशा काही गोष्टी पाहवयास मिळाल्यातर आपण आणखीनच धम्माल करू शकतो.

     सुट्टीची मजा ही लहान मुलांसारखी मजेत घालवण्य़ास लहानच व्हावे लागेल.
    सुट्टी म्हणजे फक्त धमाळ .धमाळ ती कशी करायची हे मुलांपेक्षा कोणालाच माहीत नसते. पालकंनी  त्याना धमाळ  करण्य़ाची मुभा द्यावी.


    
    कलिंगडाच्या फोडीसारखी गोड आणि कैरीसारखी आंबट...
    उसाचा रस, कोकम सरबत आणि पन्ह्यासारखी तोंडाला पाणी आणणारी उन्हाळ्याची सुट्टी...
    कोकिळेच्या गोड गाण्यासारखी...
   सूर्यास्ताच्या रंगीबेरंगी पश्चिमेसारखी...
   काटे-सावरीच्या हातातून निसटणाऱ्या म्हातारीसारखी उन्हाळ्याची सुट्टी...
   'पुढल्या वर्षी लवकर ये' असे न सांगताही नियमित येणारी उन्हाळ्याची सुट्टी...

 लहान मुलांना सुट्टीच्या धमाळ शुभेच्छा.. 

No comments: