Monday, July 1, 2024

सुखद क्षणांसाठी ’गझिबो’

                                             

                                                                                      


                                                                                                      सुखद क्षणांसाठी ’गझिबो’

      

कोकणात सुंदर कौलारु घर बांधलं. छोटीशी बाग फुलवली.सारखं काहीतरी कमी वाटत होतं. मुंबईत बंगल्याच्या बाजूला एक गझिबो असतो तसा आपल्या घराच्या बाजुला एकही भिंत नसलेला गझिबो बांधला.घराची शोभा आणखी वाढली.झाडांच्या सावलीत व मोकळ्या हवेच्या ठिकाणी असलेल्या हा गझिबो सगळ्यांना तेथे रमायला खुनवत असतो.


घराएवढाच वेळ माझा गझिबोत जातो.गझिबोत सकाळच्या प्रसन्न वेळी पक्षांचे मधूर संगीत ऐकतो तर दुपारी दाट सावलीत पुस्तक वाचताना खुर्चीत कधी झोप लागते तेच कळत नाही. संध्याकाळी गप्पा मारायला गावक-यांना आमचा गझिबो खूपच आवडीचा वाटतो. 


गझिबोच्या बाजूला सुंदर फुलांची झाडे लावली आहेत. व वेली गझिबोवर सोडल्या आहेत.या फुलांवर फुलपाखरं बागडताना पाहण्याचा आंनद अवर्णनीय आहे.गझिबोच्या समोर भागात गवताचे लॉन लावणार आहे.पावसात पाण्याचे तुषार अंगावर झेलत बसून पावसात भिजत राहतो. रात्री काजव्याच्यासह आकाशातले तारेतारका पाहत जागत राहतो.दिवाळीत दिव्यांनी गझिबो सजवतो.एकूणच मनात भरभरून चैतन्य निर्माण करणारे क्षण. 


गझिबोत मी संगीत ऐकतो,शांतपणे लिखाण करतो,वाचन करतो,गप्पा मारतो, निसर्गातली फोटोग्राफी करतो व बाजूच्या झाडांची निगराणी करताना किती वेळ जातो तेच कळत नाही.

’गझिबो’, माझ्या घरातले माझ्या आवडीचे ठिकाण झाले आहे.


जिथे कोवळ्या स्वप्नांना नवं क्षितिज दिसावं,कितीही खचलो कधी तरी नवीन उमेद मिळावी,मित्रमैत्रिणींच्या गप्पांची गाठोडी बांधली जावीत,कडवट आठवणी विसरून नवीन वाट दिसावी,बाहेरच्या कोलाहलापासून दूर माझा गझिबो ही माझी एक हक्काची जागा झाली आहे.घरातला असा एकतरी कोपरा असतो की जो नुसता घराचा कोपरा नाही तर आपल्या मनाचा कोपरा असतो.. 

Tuesday, July 25, 2023

थरार अनुभवला


’थरार अनुभवला’ हा लेख महाराष्ट्र टाईम्स (०६.०७.२०२३) या वृतपत्राच्या पुरवणीत प्रसिध्द झाला आहे. 


रिव्हर राफ्टिंगचा थरार 

जीवनात आपल्या सर्वांची वैशिष्ट्येपूर्ण अशी ध्येय असतात, काही मनात इच्छा आकांक्षा असतात. कागदावर वर जरी आपण ही लिस्ट ,यादी लिहलेले नसली तरी मनात मात्र कुठं तरी ती खोल दडलेली असते आणि वेळोवेळी आपल्या आठवण करून देत असते. अशीच माझी बकेट लिस्ट मोठी आहे. ती पूर्ण करण्यासाठी ची माझा प्रयत्न सुरु आहे. या बकेट लिस्ट मध्ये रिव्हर राफ्टिंग करण्याची इच्छा लिहून ठेवली आहे. मनात राहून गेलेल्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे. पाहिलेली स्वप्न जेव्हा पूर्ण होतात तेव्हा होणारा आनंद काही निराळाच असतो.

रिव्हर राफ्टिंग चे साहस करण्याची संधी मिळाली होती पण पाण्याच्या भितीने माझ्या कडून राफ्टिंग करण्याचे धाडस झाले नाही. आम्ही कॉलेजमधले मित्र ३० मार्च २०२३ रोजी  कोलाड जवळील सुतारवाडी या गावातील एका मित्रांच्या फार्म हाउस गेलो होतो. तेथे रिव्हर राफ्टिंग करण्याची पुन्हा संधी चालून आली. सगळ्या मित्रांनी साठी गाठलेली असली तरीही  काही मित्र रिव्हर राफ्टिंग करण्यास  पटकन तयार झाले  पण काही  मित्र भितीने राफ्टिंगच्या सुरक्षेची चौकशी करु लागले. संध्याकाळी रिव्हर राफ्टिंगबद्दलची योग्य माहिती देण्यासाठी व जाण्याचे नक्की करण्यासाठी मंडळी भेटून गेली. राफ्टिंगची माहीती मिळाल्याने थोडा धीर आला. सुरक्षेबद्दलच्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाल्यावर व सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिल्याने सगळ्यांनी राफ्टिंग जाण्याची तयारी केली.आम्ही आयुष्यातला पहिलाच रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेण्याचे ठरवले.

सकाळी साडेसात वाजता गावातून राफ्ट जीपवर चढवून ’कुंडलिका’ नदीच्या दिशेने निघालो. रोज सकाळी भिरा धरणातून एका गेटमधून ’कुंडलिका’ नदीत पाणी सोडले जाते. या नदीतील धरणातून सोडलेल्या पाण्याच्या वेगावर राफ्टिंग केले जाते. त्या दिवशी धरणातून दोन गेटमधून नदीत पाणी सोडल्याने पाण्याला वेग होता. जीपवरुन राफ्ट उतरवून नदीत सोडला. लाईफ़ जॅकेट चढवली व वल्हे घेतली. प्रशिक्षकाने राफ्टमध्ये बसण्याची सुचना केल्यावर आम्ही सगळे देवाचे नाव घेऊन  राफ्ट्मध्ये पहिल्यांदा बसलो. पाण्यात जाईपर्यंत सगळेच शूरवीर होतो, पण ते दूरवर पसरलेलं पाणी बघून मनामधे हळूहळू भीती जमा होऊ लागली होती. प्रशिक्षक राफ्टमध्ये कसे बसायचे यापासून वल्हे कसे मारायचे याची माहीती देत होता.अपघात झाला तर न धाबरता शांत रहा .मी तुम्हाला पुन्हा राफ्ट्मध्ये घेणार याची खात्री मिळाल्यावर आमची थोडी भिती कमी झाली.

राफ्टने नदीचा किनारा सोडला. पाण्याच्या वेगाने राफ्ट वेगात पुढे जाऊ लागला. प्रशिक्षक  सुचना देत होता. नदीचा प्रवाह वळणा वळणाने  फेसाळत खडकातून मार्ग काढत वाहत होता. संथ पाण्यावर राफ्ट सरळ तरंगत पुढे जात होता. पण खडकाळ भागात पाण्याला वेग असल्याने राफ्ट देखील वेगात पाण्याच्या प्रवाहातून आपला मार्ग शोधून काढत असतो. त्यावेळी राफ्टींग किती साहसी खेळ असलेल्याची जाणीव असते. खळखळत्या प्रवाहातून जाताना राफ्ट खाली वर होतो. पाणी राफ्टमधे येते आपण पूर्ण  भिजून जातो. त्यावेळी खूप भीती वाटते. रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला. या राफ्टींग मध्ये चार (रॅपिड्स) ठिकाणी पाण्याचा प्रवाह आपली परीक्षा घेतो.  प्रशिक्षकाने  दिलेल्या सुचनेचे  योग्य पालन केल्याने त्या परीक्षेत आम्ही सगळे मित्र पास झालो. आम्ही जेष्ठ असूनही आमच्या कामगिरीवर प्रशिक्षकखुष झाला. पुढे पाण्याचा प्रवाह शांत झाल्यावर आमच्या कडून प्रशिक्षकाने  वेगवेगळे प्रकार करुन घेतल्याने मजा आली. पाणी संथ वाहत असल्याने राफ्ट शांतपणे प्रवाहात पुढे जात होता. आम्हाला पाण्यात पोहण्यास सांगितले. राफ्ट किना-याला घेत त्यांनी आम्हाला राफ्ट मधून सुरक्षित खाली उतरवले. राफ्टिंगचा आनंद घेतल्याने सर्व मित्रांनी प्रशिक्षकाचे आभार मानले. आमची सफर मस्त पार पडली.

माझ्या बकेट लिस्टमधली एक गोष्ट पूर्ण झाल्याने आनंद झाला. छोट्या छोट्या गोष्टींनी का होईना पण अजून ही माझी बकेट लिस्ट अजून भरलेलीच आहे. बकेट लिस्टमधली उरलेली स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. 

 

Monday, June 19, 2023

गावपण अनुभवण्यासाठी

 

०६.०६.२०२३  रोजी हा लेख महाराष्ट्र टाइम्स  या वॄतपत्रास ’पहिल्या घराची गोष्ट’ या सदरात  प्रसिध्द झाला आहे 

पहिल्या घराची गोष्ट 


कौलारू घराची स्वप्नपूर्ती  शहरात राहिल्याने गडबड गोंधळाचा कंटाळा आलेला असतो. मोकळी शुद्ध हवा श्वासात भरून घ्यावीशी वाटते. कारण काहीही असू दे, गावामधले घर कौलारू प्रत्येक संवेदनक्षम माणसाला साद घालत राहते.  हे कौलारू घर म्हणजे सकारात्मक उर्जेचा स्त्रोत आहे. कोकणातल्या पाऊलवाटा नष्ट झाल्या. दिव्याचे कंदील इतिहासात जमा झाले, विहीरीला पंप बसले, लालमातीची धूळ खाली बसून त्यावर डांबरीकरण झाले, पण कौलारू घराची सय जात नाही.  शहरात सर्व असताना व ग्रामीण जनता मुंबईकडे मोठय़ा संख्येने आकर्षित होत असताना गावाचे आकर्षण मनाला का वाटत असावे? कदाचित गावाकडची माती साद देत असते. गावाच्या आठवणीने स्वप्ने होती सुरू खेडय़ामधले घर कौलारू


ठाणे शहरात माझे स्वत:चे घर आहे. गावाला आमचे घर नव्हते. एक छानसे सुंदर, टुमदार घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येकाने आपल्या मनात आपल्या घराविषयी काहीतरी कल्पना रचलेल्या असतातच. कोकणाची ओढ असल्याने सेवानिवृत्त होण्यापूर्वी गावाला स्वत:चे कौलारू घर बांधायचे स्वप्न होते. ठाण्याहून दापोलीला जाऊन घर  उभारण्यास खूप मेहनत घ्यावी लागली. कर्ज घ्यावे लागले. पुणे, दापोली व ठाणे असा सारखा प्रवास सुरु होता. त्यावेळी ’घर पाहावे बांधून’ याची प्रचिती आली होती. माझे घराचे स्वप्न सेवानिवृत झाल्यावर पूर्ण झाले. दापोलीजवळ एक गृहसंकुल म्हणजेच छोटेसे गाव उभे राहत आहे. त्या गृहसंकुलात छोट्याश्या जागेवर छोटेसे घर बांधले आहे. माझे नवे घर पारंपारिक पध्दतीने म्हणजेच जांभ्या दगडांच्या भिंतीचं आणि कौलारू छपराचं आहे. कोकणात प्रामुख्याने मुबलक प्रमाणात जांभा दगड मिळत असल्याने इथली घरे जांभ्या दगडाची म्हणजेच चिर्‍याची आणि पावसामुळे उतरत्या कौलारू छपराची असतात. प्रत्येकाची आपल्या घराची कल्पना वेगळी असते, आपलं घर इतरांहून वेगळं असावं, वेगळं दिसावं या अनुषंगाने मी पण माझ्या घरात माझ्या भावना जपल्या आहेत. घर जास्त मोठे नसावे पण निसर्गात विलीन होणारे असावे. उजेड पुरेपूर असावा. घरात मानवनिर्मित ऊर्जेचा वापर कमीत कमी असावा,असेच माझं घर आहे. गृहसंकुलात शहरातील सगळ्या सुविधा असल्यातरी जांभ्या दगडांच्या व कौलारू घरानं गावपण अनुभवायास मिळत आहे. घरात गेल्यावर सुख व समाधान मिळते.घरात राहिल्याने आनंद मिळतो. 


घर हा शब्द जरी दोन अक्षरांचा छोटा शब्द वाटत असला तरी देखील त्या शब्दाच्या मागे भावनिक आधार फार मोठा आहे. माझे घर आकाराने खूप मोठे ही नाही आणि छोटे की नाही पण अगदी टुमदार आहे. घराच्या अवतीभोवती सुंदर बाग केलेली आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे कोवळे ऊन घरात शेवटपर्यंत पडते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कोवळ्या उन्हाचा आनंद फारच मजेशीर वाटतो. संध्याकाळी सुर्यास्त होत असताना देखील घरातून पाहता येते.


माझे नातेवाईक व मित्रमंडळी माझ्या नव्या घरी येऊन राहिल्यावर खुष होऊन परत येण्याची इच्छा व्यक्त करून शहराकडे परततात. Friday, November 25, 2022

नव्या दोस्तांसह सजली मैफल

 

                                               नवी दोस्ती दापोलीच्यापुढे दाभोळ रस्त्यावर २० किलोमीटरवर आगरवायंगणी या गावाजवळ ’कोकण ट्रेल’ नावाचे मोठे गॄहसंकुल विकसित होत आहे. येथील परिसर व हवामान खूपच छान असल्याने येथे मुंबई व पूण्यामधील निसर्गप्रेमींनी घरे घेतली आहे. काही घरे तयार झाल्याने त्या घराचा ताबा मालकांना दिला आहे. तर काही घरे लवकरच पूर्ण होणार आहेत.


नव्या घरात दिवाळी साजरी करण्यासाठी काही कुंटुंब येथे राहण्यास आली होती. मुंबईतले श्री.बिपीन छेडा, ठाण्य़ातून मी आणि पूण्यातून श्री.शिरीष लिमये व श्री.सचिन शेटे अशी चार कुंटुंब दिवाळीच्या पहिल्या दिवशी तेथे गॄहसंकुलात राहणार होती. अदल्या दिवशी मी व पत्नीने आमच्या गॄहसंकुलाच्या स्वागतकक्षात ’दिवाळी पहाट’ कार्यक्रम करण्याचा बेत आखला. चार कुंटुंबात काय दिवाळी पहाट करणार? पण या वर्षी सुरुवात तर करुया असे आम्ही ठरवले. मी व पत्नीने इतर तीन कुंटुंबाना फोन वरुन दिवाळी पहाटची संकल्पना सांगितली. उद्या सकाळी आठ वाजता स्वागतकक्षात पारंपारीक गणवेषात आपल्या कुंटुंबातल्या सर्व सदस्यासह जमावयचे आहे. गाणी,विनोद, नकला, नाच जे जमेल ते करायचे आहे. शेवटी दिवाळी फराळ फस्त करायचा.असा एक दिड तासाचा कार्यक्रम ठरला. बाजुच्या गावातून स्पिकरची सोय झाली. कार्यक्रम ठरला पण उद्या मडंळी जमतील की नाही याची भिती वाटत होती.


दिवाळीचा पहिला दिवस उजाडला. आम्ही पहिली आंधोळ करून देवाची पुजा करून फराळ घेऊन स्वागतकक्षात पोहचलो. तेथे कोणीच आले नव्हते.प्रथम श्री.बिपीन छेडा पत्नीसह आले नंतर श्री.शिरीष लिमये व श्री.सचिने शेटे कुंटुंबासह जमले. आता आपण छोटासा कार्यक्रम करु  शकतो याची  मला खात्री पटली. सर्वांनी एकामेकांना दिवाळीच्या शुभेछा दिल्या. श्री प्रतिभा लिमये यांनी प्रथम      ’स्वच्छंद निर्मळ वाहतो निर्झर’ हे  गाणं गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. दिवाळीच्या पहाटे थंड वातावरणात प्रसन्न वाटत होते. प्रत्येकाने करमणूक करायचे ठरले. नंतर पत्नीने ’अच्युतम केशवम’ हे भजन घेतले. कुमारी स्मेरा शेटे हिने छान नाच केला आणि माहोल बदलून टाकला. सर्वांना वाटू लागले आपणही काय तरी केले पाहिजे.’जगी ज्यास कोणी नाही’,’आनंदाच्या डोही आनंद तरंग’ अशी बरीच मराठी गाणी झाली. श्रीमती मिनल शेटे यांनी आपल्या मुलीसह सुंदर नाच केला. सर्वांना नाच खूप आवडला. छेडा कुंटुंबियांनी गुजरातीत एक गाणे गायले. श्री.शिरीष लिमये यांनी देखील हिंदीत गाणे गायले. सगळ्याचा उत्साह वाढला होता. आम्ही चार पुरुषांनी ’ये दोस्ती नही तोडेंगे’ हे गाणे गायले. गरबा केला. नंतर मी पत्नीसह ’महाराष्ट्र गीत’ घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. गॄहसंकुलात कामाला आलेले गावकरी आमच्या कार्यक्रमाचे प्रेक्षक झाले होते. फराळ व चहापाणी करून आम्ही आंनदाने आपापल्या घरी परतलो. कार्यक्रमाचे फोटो व व्हिडियो पाठवल्यावर सगळी मंडळी खूष झाली. अगोदर काहीच तयारी नसताना कार्यक्रम छान झाला. 


दिवाळीनंतर एक मोठे ’गेट टुगेदर’ ठरले होते. दिवाळी आपल्या घरी साजरी करून या कार्यक्रमाला श्री.सागर,श्री.दिक्षीत,श्री.दिवेकर व श्री.पार्ले ही कुंटुंब सामील झाली होती. गेम व हौझी झाले. पाणी पुरी,रगडा पॅटीस,शेव पुरी व भेळ असे पदार्थ ठेवले होते.सगळ्यांनी ताव मारुन मजा केली. गेममधली बक्षीस वाटली.       


या दोन्ही कार्यक्रमाने आम्ही सगळे घरमालक व कुंटुंब एकत्र आले. नव्याने ओळखी झाल्या. नवे दोस्त मिळाले. नवी दोस्ती सुरु झाली.  या वर्षाच्या अखेरीस परत भेटण्याची उत्सुकता सगळ्यांनी दाखवली आहे. 


Tuesday, July 19, 2022

आजी आजोबांच्या सहवासातील सुंदर क्षण

 


जिव्हाळ्याचे गाव


मुंबई गोवा या महामार्गावर इंदापूर नंतर तीन किलोमीटर वर ’विघवली’ या गावाचा फाटा लागतो. तेथून आत दिड किलोमीटरवर ’विघवली’ हे गाव डोंगराच्या कुशीत असून गर्द वृक्षराजीत वसलेले आहे. कौलारू घरांचे सुंदर  गाव आहे.निसर्गमय आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहून नक्कीच कोणीही गावाच्या प्रेमात पडेल असा आहे. गावातील निसर्ग हाच तर खरा खजिना आहे. फाट्याहून  गावात जाण्याच्या रस्त्याच्या दुतर्फा भातशेती आहे.गावकरी भातशेतीवर आपला उदरनिर्वाह करीत असत. गावात शाळा, तीन देवळे व तीन विहिरी  आणि एक सुंदर तळे आहे. होळी, गणपती, दहीहंडी व पालखी असे उत्सव आनंदात साजरे होतात. अशा या आजोळी मी लहानपणी सुट्टीत कायम यायचो. माझ्या बालपणाच्या इतिहासातील काही सोनेरी पाने. बालपणी आजोळाला एक अनन्यसाधारण स्थान असते. आजोळाचे गाव म्हणजे एक आठवणी देणारं रम्य ठिकाण. 


आजोबाआजी,मामामामी व मावश्याकाका असे मोठे कुटुंब एका मोठ्या घरात एकत्र राहायचो. घराच्या समोर अंगण, त्यावर गवताचा मांडव, ओटी, देवघर, माजघर, स्वयंपाकघर, पडवी आणि मागे परस आहे. गावात घराला लागून घर  आहेत. त्या काळात गावात वीज नव्हती. रात्रीच्या अंधारात दिवे मिनमिनत असत. 


कोंबड्याच्या आरवण्याने व जात्यावर दळण्याचे आवाज आणि परसातील झाडांवरील पक्ष्यांचे किलबिलाटाने पहाटे जाग येत असे. गोठ्यातील गाई-म्हशीचे हंबरणे ऐकू येत असे. सकाळी दूध काढत असू. गुरांना चरायला सोडायचो. आजीच्या हातचा खमंग पदार्थ यामुळे न्याहारीला लज्जत येते. आजीने केलेली साधी भाजी-भाकरीही चवदार लागते. घराच्या मागील डोंगरावरील रानात स्वछंदी भटकायचो. बैलगाडीत बसून शहरात जात असू. घरातली सर्व मंडळी शेतावर काम करण्यास जात असत. शेतावरचे जेवण खूपच चविष्ट लागायचे. शेतावरील पेरणी,लावणी,कापणी व झोडपणीची कामे करताना मजा यायची. नांगर धरायचो. कालव्यात पोहून मग घरी येत असू. निरांजनातील वातीच्या उजेडात शुंभकरोती झाल्याशिवाय जेवण मिळत नसे. कंदीलाच्या प्रकाशात जेवण व्हायचे. भूक लागलेली असल्याने जेवण जास्त जात असे.वीज नव्हती तरी काहीही अडत नव्ह्ते. रात्री काही वेळ गोष्टी ऐकताना व आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण सुरु असताना कधी झोप लागायची हेच कळायचे नाही. मला माझे आजोळ अजूनही अतिशय प्रिय आहे. 


गावातील कालव्यात डुंबत राहण्यात, बैलगाडी पळवण्यात, मासे मारण्यात, गुरांशी खेळण्यात, रानोमाळी आंबे,जांभळे व करवंदे गोळा करण्यात आणि स्वच्छंद भटकण्यात सुट्टी कधी संपते ते समजत नव्हते. अशा या मंतरलेल्या वातावरणातून परतण्याचा दिवस उगवायचा. गावातून आणलेल्या सामानात आजीने दिलेल्या डांग-मेतकुटाची भर असे आणि आजी-आजोबांच्या सहवासातील अमृतमधुर आठवणी मनात रुंजी घालत असायची. उन्हाळ्यातील दोन महिने व दिवाळीतील पंधरा दिवस सुट्टीत मजा करून मुंबईला परतत असू. गावातल्या आजोबाआजीला पत्र पाठवित असू. लहानपणीच्या रम्य आठवणी आाताही आजच घडल्याप्रमाणे आठवतात. कायमच्या स्मरणात राहिल्या आहेत. गाव तसाच राहिला आहे पण आवडीची माणसं राहिलेली नाहीत. आजोळाची ओढ मनात एक खास जागा घेऊन राहली आहे. 

 

आजोळ म्हंटलं की मनात असंख्य आठवणी दाटतात, सुरकुतलेल्या हातांचा मायेचा स्पर्श आठवतो. प्रत्येकाच्या मनातल्या एका कप्प्यात आजी आजोबांसोबतच्या क्षणांचा खजिना दडलेला असतो.  कितीही मोठे झालो व शहरात राहिले तरी गावात येऊन तेथील निसर्गाचा अनुभव आपल्याला नेहमी चांगली ऊर्जा आणि काहीतरी नवीन शिकवण देण्याचे काम करत असतो. Wednesday, March 30, 2022

तारुण्यातील सोबती

                                   १५.०३.२०२२ रोजी महाराष्ट्र टाईम्स या वृतपत्रात प्रसिध्द झालेला लेख 
            तरुणाईतील सोबती   (गाडी माझी भारी)

मी कॉलेज पूर्ण करुन नोकरीला लागलो होतो. पैसे जमवायचे आणि आवडेल तशी बाइक घ्यायची,असे स्वप्न पाहू लागलो. १९८३ च्या काळात मोटर सायकल आता सारख्या दुकानात जाऊन खरेदी करता येत नव्हत्या. कंपनीमध्ये काही रक्कम भरून मोटर सायकल बुक करावी लागत असे. घरात कोणाला न सांगता मी ’सुझुकी’ या कंपनीच्या जाहिराती प्रमाणे पैसे भरून मोटर सायकल बुक केली. गाडीची वाट पाहता पाहता एक वर्ष गेले. एका दिवशी कंपनीचे पत्र आले.आपली गाडी उपलब्ध आहे पैसे भरुन दुचाकी घेऊन जाणे. घरात ही बातमी दिल्यानंतर घरातून गाडी घ्यायला विरोध झाला. मी सर्वाना विश्वासात घेतले पण काही उपयोग झाला नाही. दुचाकीचे खूपच अपघात होतात या भितीमुळे गाडीसाठी विरोध होत होता.शेवटी मी हट्टच केला. तेव्हा बाबांनी रागाने मला बॅकेचे पासबुक आणून दिले. तुला काय करायचे ते तु कर. आम्हाला काही विचारू नकोस.

मी पैसे भरले व घाबरत घाबरत गाडी घरी घेऊन आलो. आमच्या कुंटुबातील ही पहिलीच गाडी पाहिल्या नंतर सर्वांनी तिचे स्वागत केले.बाबांनी दुचाकी सावकाश चालव व सुरक्षित चालव असा मोलाचा सल्ला दिला.मी गाडी चालवण्यास शिकलेलो होतो.पण गाडी चालवण्याचा परवाना नसल्याने मोठ्या रस्त्यावर गाडी चालवण्यास जात नव्ह्तो.काही महिन्यानंतर मित्रासोबत जाऊन परीक्षा देऊन परवाना मिळवला आणि सुसाट निघालो.  

काही दिवसांनी रोज ऑफिसला दुचाकी घेऊन जाऊ लागल्याने सोयीचे वाटले. येताना जाताना सर्वांची कामे करू लागलो. मित्रांकडे अशी गाडी नसल्याने जरा भाव खाऊ लागलो.त्यांना घेऊन लांब लांब फिरण्यास जाऊ लागलो.घरात कोण आजारी असले तर त्याला गाडीवरून दवाखान्य़ात नेत होतो.बाजारहाट करायचो.गाडी असल्याने घरच्यांची व शेजा-यांची कामे करीत असे.


मी गाडीला खूप जपत होतो. रोज साफ करीत गाडी स्वच्छ ठेवत असे.तिच्या प्रेम जडले होते.एकादा चरा पडला तर वाईट वाटायचे. मित्रांसोबत मोटर सायकलहून लांबलांबच्या मोहिमा यशस्वी केल्या. भावाला घेऊन गावाला जात असे. जसे मी गाडीला जपले त्याच प्रमाणे गाडीनेही मला जपले कोठे अपघात झाला नाही व कधीच कसला त्रास दिला नाही.

लग्न ठरल्यानंतर होणा-या बायकोला गाडीवरून खूप फिरवले.तिला गाडीवरून फिरायला आवडायचे पण मी गाडीवरचे प्रेम दर्शवले की ती नाराज होत असे. लग्नाच्या गडबडीत तर गाडीला दम खायला वेळ मिळाला नाही. लग्नाच्या धामधुमीत आमंत्रणापासून खरेदीपर्यत सर्व कामे गाडीच्या मदतीने केली. तिची मला कायम सोबत मिळाली.

माझी लाडकी दुचाकी गाडी काही वर्षानंतर म्हातारी झाली. काय करायचे काही ठरत नव्हते. शेवटी एका सामाजिक संस्थेला त्यांना ग्रामीण भागातील त्यांच्या कार्यासाठी वापरण्यासाठी दिली. भंगारात टाकण्यापेक्षा कोणच्या तरी काही कालावधी तरी उपयोगात येईल, असा विचार करीत गाडीचा निरोप घेतला. रोजच्या सवयीमुळे काही दिवस मला गाडीची खूप आठवण येत होती. तिच्या सारखीच दुसरी दुचाकी घरी आणली.      

Wednesday, August 4, 2021

मृत्यूची झुंज अपयशी ठरली


वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्लुअर अॅट्रॉफी म्हणजेच एमएमए टाइप वन हा दूर्मिळ आजारा झाला होता. या आजारावर मात करण्यासाठी वेदिकाला १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज होती.वेदिकाला जून महिन्यात १६ कोटी रुपयांचं झोलगेन्स्मा इंजेक्शन देण्यात आलं होतं. लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शनची व्यवस्था केल्यानंतरही पुण्यातील वेदिका शिंदे या चिमुकलीचं निधन झालं आहे.खूप वाईट वाटले.

पुण्यातील भोसरी येथील सौरभ शिंदे यांची ११ महिन्यांची चिमुकली वेदिका शिंदे.वेदिकाला हा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिचे आईवडील चांगलेच हादरले होते. मात्र, नंतर हिम्मत न हारता त्यांनी वेदिकावर उपचार करण्याचे ठरवले. वेदिकाला देण्यात येणारे इंजेक्शन बाहेरील देशातून मागवावे लाग्णार असल्याने वेदिकाच्या कुंटुबीयांनी मदतीचे आवाहन काही महिन्यांपूर्वी केले होते.त्यांच्या आवाहनाला साद देत जनतेनी भरभरुन प्रतिसाद दिला व सर्वच थरातून तिला मदातीचा ओघ सुरु होता.केंद्र सरकारने इंजेक्शनचे सहा कोटी रुपयांचे आयात शुल्क माफ केले होते. वेदिकाला इंजेक्शन दिल्यानंतर वेदिका पूर्ण बरी होऊन घरी आली होती.तेव्हापासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.एवढे सारे प्रयत्न करुनही वेदिकाचे प्राण वाचू शकले नाहीत.


मुलगी गेल्याचं दु:ख असतानाही वेदिकाच्या वडिलांनी सामाजिक बांधिकली जपल्याचं पाहायला मिळत आहे. वेदिकाचा मृत्यू इंजेक्शन दिल्यानंतरही कसा झाला, असा चुकीचा प्रश्न उपस्थित करु नका, असं आवाहन सौरभ शिंदे यांनी केलं आहे.    


गेली सहा महिने तिच्या जगण्याचा संघर्ष सुरू होता, मात्र तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.तिच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


हे औषध भारतात उपलब्ध करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असं पालकांचं म्हणणं आहे.हे औषध बनवणा-या कंपन्या त्यांच्याकडून काही बाळांना ही इंजेक्शन्स मोफत देतात. पण ती फार बाळांना मिळू शकत नाहीत.जे पालक पैसे उभे करून इंजेक्शन घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी किंमती कमी केल्या जात नाहीत. अशावेळी आपल्या सरकारनेच जर या कंपन्यांना भारतात औषध उपलब्ध करून द्यायला सांगितलं, तर या कंपन्यांना तसं करावंच लागेल. या आजारातल्या लहान बालकांना वाचवले  पाहिजे.


’वेदिका’चा हसरा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही. आईवडीलांसाठी हे मोठे दु:ख आहे. 

Monday, July 19, 2021

दहावीचा निकाल

 राज्यातील शिक्षण मंडळाने दहावीचा अंतर्गत एकूण निकाल (मुल्यमापनाच्या आधारे) ९९.९५ टक्के लावला आहे.यावर्षी करोनाच्या संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. दहावीची परीक्षाच झाली नसताना शिक्षण मंडळाची निकाल लावण्याची ही पहीलीच वेळ होती. यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम, अभ्यास व निकाल सर्वच ऑनलाईन होते.राज्यातील सगळ्या विभागांचा निकाल ९९ टक्के लागला आहे. २०२१च्या दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.सरसकट पास न करता प्रत्येक विद्यार्थ्यांला मुल्यमापनाच्या आधारे गुण मिळाले आहेत.


यावर्षी दहावीच्या परीक्षेच्या निकालाला फारसे महत्व मिळाले नाही.निकाल कधी लागून गेला तेही कळलं नाही. दरवर्षी निकालाच्या तारखा आधी जाहीर व्हायच्या.निकालाचा दिवस जसा जवळ येऊ लागला की विद्यार्थ्यांची व पालकांची धास्ती वाढत असायची. निकालच्या रात्रीला विद्यार्थ्यांना झोपही लागत नसे.निकालाच्या दिवशी घाबरत घाबरत शाळेत जाऊन गुणपत्रिका घेऊन प्रथम गुण पाहिले जात.गुण किती मिळालेत यावर आंनद कसा साजरा करायचा ठरायचं. नातेवाईकांचे फोन येऊ लागलेले असायचे. अपेक्षेप्रमाणे 

गुण मिळाले असतील पालक खूष नाहीतर ’जरा जास्त अभ्यास केला असतास तर त्याच्या ऐवढे गुण मिळाले असते’ यासारखी वाक्य ऐकायला लागत होती. निकालानंतर दुस-या दिवशी वृतपत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे फोटो व मुलाखती प्रसिध्द होत असत. शाळा  व  खासगी क्लासवाले या विद्यार्थ्यांच्या नावाने जाहीरात करत असत.जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार होत असत.ते हुशार विद्यार्थ्यी शाळेत व चाळीत पेढे वाटायचे. कमी गुण मिळालेले विद्यार्थ्यी मात्र नाराज होत. यावर्षी जो विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाल्याचं व्हॉट्सअ‍ॅपवर कळतं त्या विद्यार्थ्यांच्या नावाने शुभेच्छा देण्यात येत आहे. यावर्षी शंभर गुण मिळालेल्या विद्यार्थ्यींना देखील मान मिळाला नाही. 


यावर्षी दहावीची परीक्षा देऊन असे गुण मिळवले असते तर विद्यार्थ्यीं जास्त आनंदी झाले असते. हुशार विद्यार्थ्यांचे या प्रकाराने मोठे नुकसान झाल्याने ते नाराज झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ’करोना’ हा शेरा न मिळाल्याने सर्व विद्यार्थ्यी व पालक खूष झाले आहेत. दहावीच्या विद्यार्थींना अकरावीच्या प्रवेशात प्राधान्य मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे.


दहावीची परीक्षा हा उज्ज्वल भविष्याचा पाया मानला जातो. यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा !

Monday, July 5, 2021

MPSC

 MPSC


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणानं आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. राज्यभरात  स्वप्निलने केलेल्या आत्महत्येचे पडसाद उमटले.


एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आहेत.पुणे     हे अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र बनलेलं आहे.या परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यी कर्ज घेतात. परीक्षा किंवा नोकरी मिळण्यास काही अडचणी आल्या की कर्ज वाढत गेल्याने विद्यार्थ्यी खचतात. नकारात्मकता वाढत गेल्यावर मनाने खंबीर नसलेले विद्यार्थ्यी आत्महत्या निर्णय घेतात.


स्वप्निलने आत्महत्त्येला कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसल्याचे लिहून ठेवले आहे. तर मग यास कोण जबाबदार आहे? आरक्षणावर तोडगा काढण्यात हतबल ठरलेले प्रशासन की कोविडची साथ की नैराश्यात गेलेला विद्यार्थ्यी?  


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. ३१ जुलै २०२१पर्यंत सर्व रिक्त पदे भरण्यात येतील, असं आश्वासन दिलं आहे. हे आश्वासन अगोदर का दिले नाही? एक जीव तरी वाचला असता.पण स्वप्निलने केलेल्या आत्महत्येने इतर विद्यार्थांना नोक-या मिळतील.कोणाचा तर जीव गेल्याशिवाय शासनाला जाण का येत नाही? कोणाचा तरी बळी पाहिजे असतो का? अशा प्रकारच्या घटना नियमित घडत असतात. अपघात झाल्यानंतर शहरातले रस्त्ये नवीन होतात.


न्यायालयाने एमपीएससी परीक्षा झाल्यानंतर त्याला ठराविक  दिवसात / महिन्यात  नोकरी मिळाली पाहिजे. असा कालावधी ठरवून दिला पाहिजे. या परिक्षेच्या जाहीतीतच हा कालावधी नमूद करण्यात यावा. जर प्रशासनाला हा कालावधी वाढवायचा असल्यास त्याला न्यायालयाची परवानगी घेतली पाहिजे.


निवड झालेल्या उमेदवारांचे भवितव्य अधांतरी ठेवू नका.


Wednesday, June 16, 2021

शाळा भरल्याच नाही.


यावर्षीही करोनामुळे शाळा भरल्याच नाही. यंदाही शाळेची घंटा वाजलीच नाही.कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू झाल्या आहेत. तिस-या लाटेमुळे राज्यातील शाळा सुरु करण्याची धाई करु नये.


उन्‍हाळी सुटी संपली की शाळेचे वेध लागायचे. शाळेसाठी विद्यार्थ्यांची तयारी झालेली असायची. नवे दप्तर, गणवेश, पुस्तक व वह्या, डबा व रेनकोट काय मजा असायची. नवा वर्ग व नवे मित्र मैत्रीणी भेट व्हायची. नवे शिक्षक व त्यांची भिती असायची. पहिला दिवस तर खासच असायचा.पहिल्यांदा शाळेत जाणा-या लहान मुलांचे रडणे व बालगोपाळांचा किलबिलाट मजेशीर असायचा.यावर्षी लहान मुलांच्या शाळेची लगबग दिसली नाही. 


"अरे उठ लवकर शाळेला उशीर होतोय्‌’’ इथपासून ते शाळेतील प्रार्थनेने सुरुवात व्हायची ती आपल्या शालेय दिवसांची! त्यानंतर वेगवेगळे तास आणि वेगवेगळे शिक्षक त्यात काही आवडीचे, तर काही नावडीचे. लहानपणी ते शाळेचे सहा तास कधी संपतात, असं वाटायचं आणि त्यात असणारी ती मधली सुट्टी तिची वाट पाहण्याची मजाच काही और होती. शाळेत जितके विषय तितकेच शिक्षक, त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धती आणि स्वभाव यामुळे नकळतच काही विषय आवडीचे झाले, तर काही नावडीचे.. पण, प्रत्येक विषयाच्या तासाची मजा ही वेगवेगळी होती. शाळेत दंगामस्ती करायची व शिक्षाही भोगायची असा दिनक्रम असायचा.शाळेतील दिवस व मजा हवीहवीशी वाटायची.आपल्या जिगरी मित्रासोबत आवडीचा बेंच पकडण्याची लढाई लढायला ही फार मजा यायची.शाळेच्या पहिल्या दिवशी जाण्याची उत्सुकता फार जास्त असायची.  परीक्षा न होताच यंदा उन्‍हाळी सुट्टी लागली. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर या वर्षीही शाळा ऑनलाईन सुरु झाल्याने बच्चे कंपनी बरीच नाराज झाली आहेत. लॅपटॉपच्या सोबतीने सुरु झालेली शाळा, विद्यार्थ्यी नाकारत आहेत.हजारोंचा स्मार्ट फोन किंवा लॅपटॉपच्या समोर बसून शाळा शिकायचे दिवस आले आहेत.शाळा म्हटलं की, युनिफॉर्म घालून, बसची वाट पाहत, किंचित कंटाळलेल्या चेहऱ्यांनी जाणारी लहान मुलं दिसायची. तीच मुलं आता लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर बसलेली दिसतात. शालेय शिक्षणाबरोबर लहान मुलांना मोबाईल, टॅब व लॅपटॉप चांगल्या प्रकारे हाताळायाला येऊ लागले आहेत. शाळेतल्या शिक्षणातील मजा डिजिटल शिक्षणपद्धतीत नाही. ही एक तात्पुरती सोय आहे. लॉकडाऊनच्या काळात डिजिटल शाळेची एक नवी पद्धत समाजाने अंगीकारली खरी. पण ती प्रत्यक्ष शाळेला पर्याय ठरेल का या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच ठरवेल. हे संकट दूर होऊ शाळा लवकरच सुरु होतील अशी आशा करूया. 


प्रत्येकाच्या जीवनात शाळा खूप महत्वाची असते.


Monday, June 14, 2021

नर्सचे समर्पण

 नर्सचे समर्पण 


गेल्या वर्षापासून डॉक्टर व नर्स रात्रंदिवस अथक रुग्णांची सेवा करत करोनाच्या ससंर्गाशी लढत आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांवर प्रचंड कामाचा ताण आहे.रुग्णांच्या आरोग्य सेवेसह चाचण्या घेणे व लस देणे ही कामेही सुरु आहेत. आपले कर्तव्य बजावताना कित्येक डॉक्टर व नर्सेचा मृत्यु झाला आहे.सीमेवरील सैनिकाप्रमाणे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत. 


छत्तीसगडच्या काबीरधाम जिल्ह्यातील लिमोमधून एक घटना समोर आली आहे.  एक नर्स आपल्या आयुष्याची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत होती. ९ महिन्यांची गर्भवती असूनही, ती कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करत होती. परंतु याच काळात तिला करोनाचा संसर्ग झाला. एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला.खूप वाईट झाले. 


या नर्सने तिचा नवरा सांगत असताना देखील सुट्टी का घेतली नाही? ९ महिन्यांच्या गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये का ड्यूटी करत होती? गर्भवती  असल्याने दोन जीवाना धोका होता ते तिला कळले नसेल का? तिने हा धोका का पत्करला असेल? करोनापासून रुग्णांना वाचवत होती पण स्व:तला वाचवू शकली नाही. तिच्या मुलीला आता आई दिसणार नव्हती.त्या मुलीला आईची माया मिळणार नव्हती. नवजात बालकाची आई त्याला कायमची सोडून गेल्याचे मोठे दु:ख आहे. 


कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती, या लाटेत अनेकांनी आपले आप्त तर गमावलेच, पण काही मातांना त्यांची जन्माला न आलेली बाळंही गमवावी लागली. गरोदरपणाच्या काळात आई जर कोरोना पॉझिटीव्ह निघाली तर आरोग्यविषयक अनेक समस्या उभ्या राहू शकतात.  कोव्हिडच्या काळात नऊ महिन्यांचा काळ काढणं त्या महिलेसाठी, तिच्या घरच्यांच्यासाठी आणि तिच्या डॉक्टरांसाठी सगळ्यांसाठी सत्वपरिक्षेचा काळ आहे.


गर्भवती असताना देखील आयुष्याची पर्वा न करता परिचारिका रुग्णांसाठी काम करीत आहेत याचे कौतुक आहे.त्या जसं पोटातल्या बाळाशी कनेक्ट होतात,तसंच रुग्णांशीही कनेक्ट झालेल्या असतात. गर्भवती असताना पीपीई किटमध्ये राहून करोना रुग्णांची सेवा करणे किती कठीण आहे.आरोग्य विभागाने गर्भवती असलेल्या परिचारिकांना रुग्ण सेवा देणे बंद केले पाहिजे. 


चहाची तलफ

 


चहाची तलफ


" चहाला वेळ नसते .... पण वेळेला चहाच लागतो "  


पाणी, चहा पावडर, साखर व थोडेसे दुध यांना उकळल्यानंतर बनतो ’चहा’  


चहाची वेळ नसते हो.... चहाची तलफ असते..... मग येताय ना तुमची चहाची तलफ भागवायला.


वाफाळत्या गरमागरम अशा चहाचे तुम्ही दिवाने असालच!  दिवसाची सुरवातच एका मस्त चहाने होत असेल. दिवसभरातही अध्येमध्ये चहाचा आस्वाद घेऊन तुम्ही तुमचा कंटाळा आणि मूड ठिक करत असाल. सकाळी सकाळी गरमागरम चहा कपात घेऊन फुरकी मारत वर्तमानपत्र चाळणे म्हणजे स्वर्गानंद घेण्यासारखे आहे.  बाहेर मस्त मुसळधार कोसळणारा पाऊस, जोडीला धुक्याची अलवार पखरण अशा वातावरणात हमखास आठवणारं पेय म्हणजे ग्लासातला चहा. 


आज चहा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे.चहा म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखं असतं. चहाविना जगणे अशक्य होईल अनेक लोकांना इतकी सवय असते.आपण चहा आपल्या ताणतणावाला कमी करण्यासाठी पीत असतो. बरेच लोक थंडीच्या काळात आपली थंडी पळवण्यासाठी चहाचा वापर करत असतात. दिवसाच्या कुठल्याही वेळी आणि कुठेही अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या चहाचे हमखास ठिकाण म्हणजे गल्लीतील टपरी.घरी आलेल्या पाहुण्यांना चहापान देऊन संतुष्ट केल्यावर पुढची बोलणी वा सोपस्कार पटकन पार पडतात. चहाचा अतिरेक आरोग्याला हानीकारकही आहे.
चहा म्हणजे दोन मनांना एकत्र आणणारा दुवा होतो कधी कधी.समोरच्यासोबत चहा पिता पिता आपण खूप साऱ्या गप्पा मारतो. एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी भेटली कि " चल , कुठेतरी बसून मस्त चहा पिऊ आणि गप्पा मारू. " हे वाक्य अगदी ठरलेले असते. चहा फक्त बहाणा असतो , तो  वेळ असतो जो आपल्याला समोरच्यासोबत घालवायचा असतो. लहानथोर, गरीब व श्रीमंत अशा सगळ्यांनी आपलंसं केलेला, माणसं जोडणारा, भूक भागवणारा, कधी भूक मारणाराही, नेहमीच्या टपरीवाल्याकडे कटिंग बनून येणारा आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नजाकतीने ’कस्टमर’ समोर ‘प्रेझेंट’ होणारा... हे समस्त गुणविशेष मिरवणारा चहा हे जगात पाण्याच्या खालोखाल प्यालं जाणारं पेय आहे.अनेक ठिकाणी खेडेगावांमध्ये गुळाचा चहा करतात, तो खमंग लागतो.तो पेल्यातून दिला जातो.  ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या बागेत तुम्हाला गवती चहा ही औषधी वनस्पती सापडेल.गवती चहा  औषधी समजला जातो. गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो, ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. मागे रेल्वेच्या प्रवासात कुल्लड्मध्ये चहा दिला जात होता.त्या चहाला भाजलेल्या मातीचा स्वाद येत होता. 


चुलीवरचा धुरकटलेला चहा, कमी दुधाचा किंवा बिगरदुधाचा काळा चहा, गुळाचा किंवा कमी साखरेचा कमी गोड चहा! साखरेचा चहा अभावानेच मिळे. बहुदा गुळाचाच चहा घ्यावा लागे, पण त्या चहात प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा गोडवा भरपूर असे. सुटाबुटातील पाहुण्याने आपल्या घरचा घोटभर चहा घेतला तरी गावाकडील माणसे कृतकृत्य होत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.


आधुनिक काळात ग्रीन टी, लेमन टी असे चहाचे कितीतरी प्रकार आढळतात. गरम पाणी वा दुधात चहापत्तीचे छोटे पॅकेट बुडवून (डीप करून) झटपट चहा बनवला जातो. चहा-कॉफीची यंत्रेही आली आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या चहाची चवच न्यारी!


दैनदिन जीवनात चहाचं महत्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जगभर २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात आहे.


तर चला मग चहाचा अस्वाद घेत आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करुया ,येताय ना !

Tuesday, May 18, 2021

निखळ तिचे हास्य

 

    


मुलीचं सहजसुंदर निखळ हास्य मी पाहताच तीचे फोटो काढत राहिलो. निखळ व निरागस हास्य किती गोड दिसतं याचा मला त्यावेळी प्रत्यय आला. तिचे मोहक, लोभस हास्य. जशी हवेची मंद झुळूकच. सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक सुंदर, निरागस व मनमोहक मुलगी आंनदात झोपाळ्यावर बसून  हळुवार झोके घेत  होती. चेह-यावर हलकसं स्मित उमटल्याने सुंदरता अधिक वाढली होती.चेहर्‍यावरील हास्य ही निसर्गाने मानवाला दिलेली एक अनमोल व सुंदर देणगी आहे,याचा प्रत्यय आला. लहान मुलांना झोका घ्यायला खूप आवडते. तेथे आजुबाजुला दुसरी कोणी दुसरी मुलं नसल्याने ती शांतपणे झोका घेत स्व:तात रमली होती. बाकीच्या जगाचा जणू तिला  विसर पडला होता. झोका घेताना ती स्वत: आंनदात दिसत होती. ती तिच्या खुशीत रमली होती. थंडगार हवेची झुळूक अंगावर घेत झोका घेण्यात सुखावली होती. तेव्हा तेथील वातावरण देखील प्रसन्न वाटले होते. बोलक्या डोळ्यांनी मोकळ्या मनाचे हितगुज साधत होती. जणुकाय स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी. तिच्यात अवखळपणा दिसत नव्हता. प्रत्येक झोक्यासह तीचे हास्य फुलत होतं. तिचे गोड स्मित बघत राहावेसे वाटत होतं. तिचे ते  बोलके हास्य व चेह-यावरती कोमलता पाहून ती फुलांसारखी नित्य उमलावी व स्वच्छंदी बागेत बागडावी असे  वाटलं. तीचे ते बालपणीचे सुंदर क्षण डोळ्यात साठवूनी  ठेवावेत असे झालं होतं. तिला त्यावेळी पाहून कवीला नक्कीच कविता सुचली असती. 


निखळ,निर्मळ हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. हास्य हा मनाचा आरसा आहे. चेहऱ्यावर निखळ हास्य हीच तर आहे खऱ्या  माणसाची ओळख असते.हसणारे चेहरे स्वत:सह इतरांचे चेहरेदेखील हसरे करून जातात, मने हलकी करून जातात.एका हास्याने समोरच्याचे हृदय जिंकता येते, मनातील मळभ दूर करता येते, मैत्रीचा हात पुढे करता येतो, शत्रूशी वैर संपविता येते, मनावरील ताण हलका करता येतो, अनेक मानसिक आजारांना दूर पळवून लावता येते अशी हास्याची महिमा सांगणारे गुण सर्वपरिचित आहेत. कदाचित म्हणूनच सर्वांनी हसलं पाहिजे.हसल्याने आयुष्य वाढत असल्याने कायम हसत रहा.  


Monday, March 22, 2021

‘जनता कर्फ्यू’

     ‘जनता कर्फ्यू’वाऱ्याच्या वेगानं पसरत चाललेल्या करोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली, त्या दिवसाला आज वर्ष पूर्ण झालंय. २२ मार्च २०२०! कसं गेलं एक वर्ष ? करोनापासून केव्हा मुक्ती या प्रतिक्षेत की प्रादुवार्भाच्या भीतीत? एक वर्षानंतरही करोनाची भिती दूर झालेली नाही. करोनाविरुध्दची लढाई सुरुच आहे.


पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्याच दिवशी ५ वाजून ५ मिनिटांनी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं.या वर्षपूर्तीनिमित्ताने जनता कर्फ्यूला उजाळा दिला जात आहे.पंतप्रधानांच्या एका आवाहनावर देश थांबला होता.करोनाची धास्ती नवीन असल्याने नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने या आवाहनाला प्रतिसाद दिला होता.त्यावेळी वाटले नव्हते करोनाविरोधात मोठी लढाई लढावी लागणार आहे.   


गेल्या वर्षी २२ मार्चला देशात ३३० रुग्ण बाधीत होते. आता देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १६ लाख इतकी झाली आहे.तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५९ हजार इतकी आहे. सध्या देशात ३ लाख ३४ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात करोनाने हाहाकार माजवला आहे.किती दिवस घरात राहून जीवन जगणार? लोकांनी करोनाबद्द्ल सरकारने दिलेले सर्व नियमांचे पालन करीत जीवन जगण्यास सुरुवात केली आहे.काही भागात व लोकांमध्ये गांभीर्य दिसत नाही.


विषाणू प्रतिबंधक लस निर्माण करण्यात यश आले.देशात लसीकरण वेगाने सुरु आहे. या लसीकरणावरच करोनाचे नियत्रंण अवलंबून आहे. लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या ४ कोटी ५० लाख झाली आहे.लसीकरण सुरु असल्याने करोनावर आपण नक्की मात करु असा दावाही काही तज्ज्ञांकडून आत्मविश्वासाने केला जातोय. मात्र लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागेल, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.    


आता देशात जनता करोनाच्या दुस-या लाटेला सामोरे जात आहे. पहिली लाट मागच्या वर्षात स्थिरावली होती.देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे.


परिस्थिती बदलण्याची वाट पाहावी लागणार आहे.

Friday, March 5, 2021

’अतुल’ तु जाऊ नकोस.

मित्राचा सकाळीच फोन आला. आज सकाळी आपला मित्र ’अतुल’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मी ’काय’ असे मोठ्याने ओरडलो. क्षणभर काहीच कळले नाही. अत्यंत धक्कादायक बातमीने काहीच सुचत नव्हते. फोन सारखा वाजू लागला. बातमी खरी आहेत का? अशी विचारणा होत होती. कोणाला विश्वास बसत नव्हता. 


अतुल हा माझा मित्र. मी वडाळ्याला कॉलनीत राहायला होतो तेव्हापासूनची आमची ओळख. मस्त देखणा व रुबाबदार व्यक्तिमत्व. अतुल, मुंबई पोर्ट ट्रस्टला माझ्या नंतर नोकरीला लागल्यावर आमची मैत्री आणखी वाढत गेली.त्यानंतर त्याचा लहान भाऊ ’अभय’शी ओळख झाली. दोघेही उंच व भारदस्त शरीरयष्‍टीचे मोटर सायकलने कामावर यायचे. या दोघांची आई देखील मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये काम करीत होत्या. त्यामुळे या दोघांची सर्वांशी लवकर ओळख झाली. कामात दोघेही हुशार होते. आई सेवानिवृत झाल्यावर कॉलनीतून अभय दादरला व अतुल ठाण्याला राहायला गेला. अतुल ठाण्याला आल्यानंतर रेल्वेत नेहमी भेट होत गेली. अतुल बरोबर काही सहली झाल्या.  


लहान भाऊ अभयचे आजारात निधन झाल्यावर त्यांच्या कुंटुंबावर मोठे संकट कोसळले.अभय नंतर अतुल व त्यांचा लहान भाऊ अनिकेत यांनी कुटुंबाला सावरले. काही दिवसाने आई आजारी झाली.अतुलने आईला ठाण्याला आणले होते.अतुल ऑफिसला गेल्यावर अतुलची पत्नी व आई दोघी घरी असायच्या.   


अतुल च्या निधनाची बातमी ऑफिसमध्ये गेल्यावर जवळच्या मित्रांनी ठाण्याच्या दिशेने धाव घेतली.सर्वांना दु:ख झाले होते.अंतिम दर्शनासाठी नातेवाईक जमत होते. घरी जाऊन त्याच्या भावाला व अतुलच्या पत्नीला भेटलो.त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. सांत्वन करणे शक्य नव्हते. सर्व कुंटुंबीय कालच रात्रीच सहलीहून परतले होते. सहलीत मजा करून घरी परतले होते आणि लगेच दु:खात गेले.   


सर्व नातेवाईक जमल्यावर अंतिम तयारीला वयस्कर मंडळी लागली. अतुल पार्थिव देहाला खाली आणण्यात आले.विधी झाल्यावर सगळ्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी अतुलची आई गॅलरीतून सर्व पाहत होती. प्रेतयात्रा सुरु झाली. त्यावेळी ती ’अतुल तु जाऊ नकोस’ अशी म्हणत होती. काय वाटले असेल त्यावेळी त्या माऊलीला? माझा अतुल मला आता परत दिसणार नव्हता. माझी दोन्ही मुलं मला सोडून गेली, हे दु:ख तिला सहन करणे कठीण होतं.   

Wednesday, January 20, 2021

विश्वचषक जिंकल्याचा आंनद

 


अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा आंनद झाला. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून मालिका जिंकणे हा पराक्रम विश्वचषक जिंकल्याचा आंनद देतो. नवोदितांनी प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिळवलेला हा विजय ऐतिहासिक आहे. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत संघाला नवख्या खेळाडूंनी दिलेल्या लढ्याने विजय संपादन केले हे विशेष आहे. भारतीय संघाने नवोदित खेळाडू आणि दुखापतींचे आव्हान पेलत हा मालिका विजयाचा अध्याय लिहिला.

एकामागून एक येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरं जात त्यांनी ही मालिका जिंकून दाखवली आहे.भारतीय संघाने या मालिकेत संपूर्ण ताकदीनं उतरलेल्या मुरब्बी यजमानांना धूळ चारल्याने हा विजय अविस्मरणीय ठरला.  


ऑस्ट्रेलियाने कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की त्यांचा असा पराभव करीत चांगली जिरवली आहे.ऑस्ट्रेलियाच्या जेष्ठ खेळांडूची भाकित चुकीची ठरली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची लाज काढली होती.भारताच्या युवा संघानं त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केल्याने भारतीय संघाचे कौतुक होत आहे.


भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक केल्याने ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे.ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंसह संपूर्ण मालिका खेळूनदेखील ऑस्ट्रेलियाला पराभव पत्कारावा लागल्यानं खेळांडूना धक्का बसला आहे. कसोटीतील सर्व निर्णायक क्षणाला भारतीय खेळाडूंनी आपला खेळ उंचावला, जे ऑस्ट्रेलियाला जमलं नाही. दोन्ही संघात फक्त हाच फरक होता.भारतीय संघाने कधी ३२८ धावा केशा केल्या ? हा प्रश्न सतावत आहे. 


तशी ही मालिका गाजली. ३६ धावात भारतीय संघ गारद झाल्याने पराभव, भारतीय संघाचे ९ खेळाडू दुखापतग्रस्त, बदली कर्णधाराचे   कुशल व कल्पक नेतृत्व, पुजाराची झुंजार वृत्ती, नवोदीत गोलंदाजांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं, चौथ्या कसोटी सामन्यात संघाचा सांघिक व सकारात्मक खेळ व अनेक विक्रम नोंदवले गेले, नॅथन लायनला भारतीय संघातील खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली संघाची जर्सी खास भेट.


ऑस्ट्रेलियाच्या तीन वेगवान गोलंदाजांनी सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला.स्वत:ची विकेट वाचवताना एक चेंडू पुजाराच्या खांद्याजवळ येऊन आदळला. एक चेंडू तर अतिशय जोरदार उसळी घेऊन थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला. पण अनेकविध फटके अंगावर झेलून पुजाराने अतिशय शांतपणे फलंदाजी सुरू ठेवली. एखाद्या भिंतीप्रमाणे अभेद्य असा तो यजमान संघापुढे उभा राहिला. त्याच्या याच गुणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 


पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतर लढाऊ वृत्ती दाखवत भारताने केलेल्या या पुनरागमनाचे कौतुक अनेक दिग्गजांनी केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इत्यादींनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाला ५ कोटी रुपयांचा बोनस देखील जाहीर करण्यात आला आहे.


 

विजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व नोंदवलेला विजय अविस्मरणीय ठरला आहे .भारतीय युवा संघाने सामना  वाचवायचा नाही तर तो जिंकून मालिकेचा शेवट धडाकेबाज करायचा बेत आखाला आणि सिध्द करुन दाखवले आहे​. याकरीता ’सलाम’ या युवा संघाला.


Friday, January 8, 2021

लसीकरण मोहीम

 

लस कधी येणार याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. ती लस उपलब्ध होत आहे. सामान्यांना केव्हा मिळणार? लस आली पण अनेक प्रश्न घेऊन आली. लस घ्यायची की नाही यावर चर्चा सुरु आहे. शरीरावर लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात. लसीकरण ऐच्छिक केले आहे. मोफत देणार का? असे प्रश्न समोर येत आहेत.खोट्या बातम्या आणि गैरसमज यांचे पेव संपूर्ण जगभर फुटलेले आहे याचा परिणाम लस आणि लसीकरणाबाबत झालेला दिसून येत आहे.

लसीबाबत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. लसीबाबतची उदासिनता हे जगातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आव्हान आहे. कोविड१९ सारख्या वैश्विक महामारीचा एका देशातून दुसर्‍या देशात संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने संपूर्ण जगातील नागरिकांनी ही लस टोचून घेणे परिणामकारक आहे. यासाठी प्रत्येक देशाने प्रभावी नियोजन करून भविष्यात उद्भवणार्‍या आव्हानांना सामोरे जाणे गरजेचे आहे.   


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ’कोविन’ नावाच्या कुठल्याही अ‍ॅपला बळी पडू नका, असा सावधानतेचा इशारा दिला आहे.लस नोंदणीसाठी अद्याप कोणतेही अ‍ॅप सुरू करण्यात आलेले नाही. ’कोविन’ या अॅपवर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका, असा सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.लसीकरणासाठी प्रत्येकाला सरकारकडे आपली नोंदणी करावी लागणार आहे.फक्त  नोंदणी केलेल्या लोकांनाच लसीकरण केंद्रावर लस दिली जाईल.मुंबईतील कोव्हिड सेंटरचे जम्बो लसीकरण केंद्रात रुपांतर करणार आहेत.जम्बो कोव्हिड सेंटर्समध्ये फारसे रुग्ण नाहीत. त्यामुळे त्या सेंटरचा वापर लसीकरण केंद्रांसाठी केला जात आहेत.केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस देण्याची योजना आखली आहे.


गेले काही दिवस लसीच्या चाचण्या व मंजुरी मध्ये गेले. प्रत्येक देश लस निर्मिती करण्यास लागला. आपली लस किती प्रभावी व दुस-या लसीचे दुष्परिणाम दाखवले जाऊ लागले. लसीला जगात मोठा बाजार असल्याने लस निर्मिती जोरात सुरु आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतील नागरिकांना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर जगातील इतर देश या लशीची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


लसीकरण मोहीम कशी राबवायची यासाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे. आरोग्य कर्मचारी,राज्य आणि केंद्रीय पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, ५० वर्षावरचे लोक व ५० वर्षाखालील आजारी  अशी क्रमवारी लावली आहे. वाहतुक, शितगृहे व प्रशिक्षणाची तयारी सुरु आहे. ड्राय रन घेण्यात आले. नागरिकांना लसीकरणादरम्यान कुठल्याही अडचणी येऊ नये आणि लसीकरण प्रक्रिया सहजरित्या पूर्ण व्हावी, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. लस घेतल्यानंतर होणा-या दुष्परिणामावर उपाय करणार आहेत.


लशींना मान्यता मिळाल्यापासूनच्या दहा दिवसांत म्हणजे पुढच्या आठवडय़ापर्यंत लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे.देशात करोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीत आणि मृतांच्या संख्येत घट होत आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटत आहे. तेव्हा प्रादुर्भाव असे पर्यत लसीकरण सुरु व्हावे. नाहीतर लस कोणी घेणार नाही. 


२०२१ मध्ये ही वैश्विक महामारी थांबवणे हे संपूर्ण जगासमोरील मोठे आव्हान असणार आहे. लस टोचून घेतलेल्या माणसाला जसा लसीचा फायदा होतो, त्याचप्रमाणे लसीमुळे रोगप्रसार मंदावल्याने, ती न घेतलेल्यांनासुद्धा लसीचे अप्रत्यक्ष फायदे मिळतात. याच कारणास्तव कोरोनासारख्या रोगावरील लस ही मानवतेच्या हिताची आहे.सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी किती प्रमाणात लसीकरण व्हायला हवे.


एक बरं झालं ही लस नव्या करोना स्ट्रेनवर देखील प्रभावी ठरणार आहे. नाहीतर नव्या लसीची निर्मिती करावी लागली असती.


रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण करणे, आत्यंतिक गरजेचे आहे.

Thursday, January 7, 2021

मैत्रीचं नातं

’मदतीला धावून येणारा सखा’ हा माझा लेख महाराष्ट्र टाईम्स यावृतपत्रात दिनांक ०७ जानेवारी २०२१ रोजी प्रसिध्द झाला आहे.  

 मैत्रीचं नातं

मुंबई पोर्ट ट्रस्ट मधला माझा एक जवळचा सहकारी "एकनाथ मराठे". अत्यंत साधे राहणीमान,तल्लख बुद्धी व स्पष्टवक्ता अशी एकनाथ मराठेची ओळख. बराच काळ आम्ही एकाच कार्यालयात एकत्र काम केल्याने आम्ही केव्हा मैत्रीच्या नात्यात गुंतलो ते कळचेच नाही. मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये प्रथम संगणक आणल्यापासून आम्हाला त्यावर काम करण्याची संधी मिळाली. संगणकातली कोणालाच काहीच माहीती नसल्याने आमच्यावर मोठी जबाबदारी होती. आम्हाला त्यातली माहीती घेऊन नंतर आमच्या कर्मचा-यांना शिकवून कामात संगणकाचा उपयोग करुन घेण्याचे काम आम्ही यशस्वीरित्या पार पाडले होते. त्यावेळी संगणकातील समस्यांचे निराकरण करीत कर्मचा-यांना कामात दिवसरात्र मदत करावी लागली.        


एकनाथ, कामात एकदम तत्पर आणि संगणक वापरात पारंगत असल्याने त्याच्यावर बरेच अवलंबून असत. त्याने संगणकीय प्रणालीत सोयीचे बरेच बदल केल्याने संगणक वापरणा-यांना सोयीचे झाले. नंतर तो वेगवेगळ्या प्रणालीवर कामे करु लागला व व्यवस्थापननेला मदत करु लागला. त्याची कामातली हुशारी पाहून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांच्या वैयक्तिक सचिव यापदावर त्याची नियुक्ती झाली.तेथेही कामे करुन अध्यक्षांची शाबासकी मिळवली. त्याच्या कार्यकाळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे तीन अध्यक्ष बदलले.सर्व अध्यक्षांनी त्याच्या कामाची वाहवा केली.


हल्ली कोविडच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी घरात राहून खुपजणांना मदत केली. तो व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या मधला दुवा ठरला होता. कर्मच्या-यांना घराजवळील औषधांच्या दुकानातून औषधं मिळण्याची सोय केली. कोविड झालेल्यांना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल करून घेणे. डॉक्टर व मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिका-यांशी संपर्कात राहून त्यांना कामात येणा-या अडचणी दूर केल्या. दिवस रात्र घरातून तो फोनवरून सर्वांना मदत करत होता. घरातून कामे करणे कठीण होऊ लागल्यावर आठवड्यातून चार दिवस कार्यालयात येऊन कामे करु लागला. या काळात त्याच्यावर कामाचा ताण बराच वाढला होता. त्यावेळी घरी जाण्याच्या व येण्याच्या त्रासामुळे अध्यक्षांनी त्याची मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय केल्याने त्याला कार्यालयातील कामावर लक्ष केंदीत करणे सोयीचे झाले. नेहमीच व्यवस्थापनच्या लोकोपयोगी उपक्रमाला सुचना देत असतो.ब-याच कर्मचा-यांची अडलेली काम निरपेक्ष वृत्तीने केली आहेत. कोणालाही मदत करण्यास तो नेहमीच तप्तर असतो. मी सेवानिवृत झालो तेव्हा त्याने पुढाकार घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य दक्षता अधिकारी यांच्या हस्ते छोट्याश्या सोहळ्यात मला सन्मानित केले होते.


असा हा माझा मित्र ट्रेकिंग, ब्लॉगींग, वृतपत्रलेखन करीत स्वच्छंदी जीवनात रमला आहे. ब-याच ट्रेकना आम्ही दोघे एकत्र असतो. ’ब्लॉगींग’ मी त्याच्याकडून शिकलो.लोकांना कामात मदत करणा-या या माझ्या मित्राची सर्वांशी मैत्री आहे. पण आमच्यात मैत्रीचं एक आगळंवेगळं नातं जुळलं आहे. त्याच्या हातून निस्वार्थ भावनेने जनसेवा घडावी, हीच सदिच्छा.


Tuesday, December 29, 2020

विवाह सोहळ्यांच्या नवा साज

 विवाह सोहळ्यांच्या नवा साज 


हल्ली लग्नसोहळ्यात बराच बदल झाला आहे. यजमान्यांना मोजक्याच नातेवाईक व पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळे पार पाडावे लागत आहेत. अनलॉक झाल्यानंतर आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर रेशीमगाठ बांधतांना करोनाच्या नियमावलीचे स्वागत करत त्यातूनही नवा ट्रेंड लग्नसराईत आता रुळण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या काही दशकात समृद्धीमुळे वाढलेल्या लग्नसमारंभातील थाटामाटाच्या आणि डामडौली देखाव्याच्या पद्धतींनाही आळा बसला आहे. साध्या व सोप्या पद्धतीने लग्नकार्य पार पडत आहेत. असे छोटेखानी विवाहसोहळे समाजानेही स्वीकारले आहेत.तर नोंदणी पद्धतीने विवाह सोहळ्यांना अपरिहार्य म्हणून का होईना समाजाची स्वीकृती मिळाली आहे.  


देशातील लॉकडाऊनचा लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टवर परिणाम झाला आहे. कोणी आहे त्या परिस्थीतीत लग्न उरकून घेत आहे. ज्यांना साग्रसंगीत लग्न करायचं आहे त्यांनी मात्र आपले विवाह पुढे ढकलले आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेल्या या लग्नांची चांगलीच चर्चा रंगली. पण या कोरोनाने लग्नाचा फॉरमॅट बदलला हे नक्की. शाही लग्नसोहळ्याचा थाटच बदलला आहे. कोरोनाने लग्नाचे पॅकेजच बदललं आहे.लग्न लावणा-या कुंटुबांची लाखो रुपयांची बचत झाली आहे. लग्नसराईतल्या संपूर्ण खरेदीत आणि ग्लॅमरस इव्हेंटमध्ये मास्कची फॅशन आता स्पष्टपणे दिसू लागली आहे.'मास्क' शिवाय लग्नसोहळे नाहीत, असे कधी कोणी स्वप्नातही पाहिले नसेल. वरवधूंच्या डिझायनर कपड्यांना साजेसे मास्क शिवण्यासह वऱ्हाडी मंडळांनीही खास मास्क परिधान करत आहेत. 


हॉल,  कॅटरिंग,  फ्लॉवर डेकोरेशन, फोटो, व्हिडिओ, फ्लोरल रंगोली डेकोरेशन, ब्रायडल मेकअप अँड ज्वेलरी, पुष्पहार, पंडित इथपर्यंत मर्यादीत असलेल्या पॅकेजमध्ये आता आणखी भर पडली आहे. आता कोरोनामुळे थर्मल स्क्रिनिंग, यूव्ही हँड सॅनिटायझेशन, एन-९५ मास्कची भर वेडिंग पॅकेजमध्ये पडली आहे. त्यामुळे कोरोनाने शाही लग्नसोहळ्याचा थाटच बदलला आहे.


लग्नांचे आमंत्रण व्हाटसॅप मिळते. पूर्वी लग्नाच्या हॉलमध्ये गेल्यावर गुलाबाचे फुल व पेढा देऊन अंगावर अत्तर शिंपडले जायचे. हल्ली हँड सॅनिटायझर व मास्क देऊन थर्मल स्क्रिनिंग केले जाते.हॉलमध्ये शांतता असते.गोंगाट नसतो. समईचौघडा नसतो. हॉलमध्ये खुर्च्या लांब लांब ठेवलेल्या असतात. जेवणाला रांग नसते. काही जण तर जेवतही नाहीत. भेटवस्तू स्विकारल्या जात नाहीत. वरात नसते.


हजारो लोकांच्या जेवणाचा खर्च, लग्नसमारंभातील गाजावाजा,ध्वनीप्रदूषणही नाही.एवढेच नव्हे तर रुसवे-फुगवे,मानापमानाचे प्रसंग नाही.शारीरिक, मानसिक, आर्थिक ताण नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे, लग्नात गर्दी होत नसल्याने व-हाडी मंडळीची गैरसोयही टळत आहे. गरीब कुंटुब कर्जबाजारी होणार नाहीत. या बदलामुळे काही व्यवसाय मात्र बंद होतील.     


वाईटातून चांगले घडते या धड्याचा कोरोना महामारीने सुद्धा प्रत्यय दिला आहे. कोरोनामुळे होणारे हे बदल समाजात पुढेही चालू राहिले तर डामडौल आणि थाटामाटाच्या देखाव्याचे आकर्षण संपुष्टात येईल, निरर्थक थाटमाट थंडावेल ही अपेक्षा करावी का?


करोनाने जसे शारीरिक स्वच्छतेचे धडे दिले तसेच जुनाट सामाजिक प्रथांना अव्हेरून नवे बदल स्वीकारण्याची संधी दिली आहे. 
Saturday, December 19, 2020

रिकव्हरी रेट

 रिकव्हरी रेट


भारताचा करोना रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हा जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. जगाचा एकत्रित रिकव्हरी रेट हा ७०.२७ टक्के इतका आहे. यामध्ये भारताचा रिकव्हरी रेट हा ९५.३१ टक्के आहे. राज्यात करोना रुग्णांच्या तुलनेत करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यात चांगलेच यश येताना दिसत आहे. 


देशात रिकव्हरी रेट वाढण्याची कारणे कोणती असतील? योग्य औषध व उपचार पध्दती, बाधितांची रोगप्रतिकारक शक्ती व लढाऊ वृत्तीत वाढ, डॉक्टर व नर्सेस यांचे अथक प्रयत्न इत्यादी... की करोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आखलेली स्पष्ट रणनीती, सक्रियता तसेच आखले गेलेले कडक निकष याचा हा परिणाम.आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. 


लस येण्या अगोदरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. भारतात कोरोना रिकव्हरी रेट वाढत असताना लसीकरणाने संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे.   


कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आरोग्य खात्यातील परिचारिका डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांची ही निस्वार्थ सेवा इतिहासात नोंदली जाईल आणि कायम स्मरणात राहील. संपूर्ण भारतभरात  परिचारिका अनेकांचे जीव वाचवण्यास मदत करण्यासाठी चोवीस तास अथक प्रयत्न करत आहेत. कोविड१९ विषाणूविरुद्ध देशाच्या संरक्षण फळीत त्या फ्रंटलाईन सोल्जर ठरल्या आहेत. आरोग्य खात्यातील प्रत्येकाचे अथक परीश्रम, सेवाभावी वृत्ती, त्याग व  निस्वार्थ सेवेमुळे रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत.


कोरोना झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढला आहे, तर लोकांना वाटू लागले आहे की हा विषाणू काही बाधा पोहोचवत नाही, हा तर कमकुवत झाला आहे. बरेचसे लोक असाही विचार करू लागले आहेत की जर आपण आजारी जरी पडलो तरी देखील बरे होऊ शकतो. याच  कारणामुळे बेजबाबदारपणा  ही वाढला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने लोकांमधली भिती कमी झाली आहे. निष्काळजीपणा वाढला आहे. हा बेजबाबदारपणा चिंता वाढवणारा आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे जगातील काही राष्ट्रात पुन्हा करोना रुग्णांची संख्या झपाट्यांने वाढत आहे.संक्रमणाला रोखण्यासाठी लोकांना मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन व सतत हात धुण्याची सवय अजून काही दिवस ठेवावी लागेल. रिकव्हरी रेट वाढल्याने धोका टळलेला नाही.याकरिता प्रत्येकाने सतर्क व सुरक्षित राहणे गरजेचे आहे. रिकव्हरी रेट बरोबर नव्या बाधितांचा रेट कमी व्हावा.

Friday, November 20, 2020

देवाची भेट

 देवाची भेट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खुली करण्यात आली.आपल्या लाडक्या देवाची भेट घेण्यासाठी भाविक अधीर झाले होते. राज्यातील मंदिरे उघडल्यानंतर भाविकांनी मंदिरांत दर्शनासाठी धाव घेतल्याचं पहायला मिळत आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने काही ठराविक संख्येत भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.संकेत स्थळावर नोंदणी केलेल्या पास धारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षापर्यंतच्या मुलांना, गर्भवती, गंभीर आजारी नागरिकांना मंदिर प्रवेशास व दर्शनासाठी बंदी असणार आहे. 


पूर्वी देवाच्या दर्शनाला रांगा लावाव्या लागत होत्या.आता देवाला भेटण्याची नियोजित वेळ ठरवली जाणार आहे.देवाला भेटण्यास व दर्शनासाठी केव्हाही जाता येणार नाही. वेळ ठरवूनच जावे लागेल. भक्ताला देवाला भेटण्याची ओढ आहे तशी देवालाही आपल्या भक्ताला भेटण्याची ओढ आहे.पण ठराविक वेळेतच भेट होणार आहे. देवाला भेटण्यास इच्छा झाली आणि मी निघालो असे होणार नाही.   


मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पूर्वी मंदिरात देवाच्या दर्शनाला जाताना हातपाय धुऊन स्वच्छ होऊन जात होतो. भाविक मंदीरात जाताना स्वच्छता राखत नव्हते, असे वाटते. 

मंदिरात दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाणार असल्याने देवळात ढकलाढकली होणार नाही. भाविकांना शांतपणे देवाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.भाविकांच्या गर्दीला देव कंटाळलेला होता, असे वाटते. 


भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आल्याने भक्तांनी देवाकडे कोणतेही मागणे करू नये,असे देवाचे म्हणणे असवे, असे वाटते.


मंदीरातील देवाची मूर्ती भाविकांना स्पर्श करता येणार नाही.देवाने भाविकांना दोन हात दूरच ठेवले आहे, असे वाटते.


मंदीर परिसराची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी.मंदीर परिसरात खूप अस्वच्छता वाढलेली आहे, असे वाटते.


मंदिर समितीने हे निर्णय कायम ठेवावेत. भाविकांच्या गर्दीच व्यवस्थापन केले तरच लोकांचे दर्शन वेळेत व शांततेत होईल.पण दानपेटी भरण्यास वेळ लागणार आहे.तेव्हा दानपेटीवर लक्ष ठेवून निर्णयात मंदिर समितीने शिथिलता आणू नये.विठू माझा लेकुरवाळा...संगे भक्तांचा मेळा या अभंगा प्रमाणे देवाला भक्ताची आणि भक्ताला देवाची भेट हि आनंद द्विगुणीत करणारी ठरेल जेव्हा भक्तगण सर्व नियमांचे पालन करतील तेव्हाच. भक्तांनी देवाच्या मनात काय ते ओळखावे. आणि तसे वागावे.


देवाने भाविकांना शिस्त लावली आहे. भाविकांनी शिस्त पाळली तरच देवाचे आशिवार्द मिळतील.Saturday, November 14, 2020

मुलांनी बनविलेले किल्ले.

 मुलांनी बनविलेले किल्ले. 


आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. इतिहासकालीन पराक्रम आणि संघर्षाची गडकिल्ले प्रतीके आहेत. दिवालीच्या सुट्टीत लहान मुलांनी  किल्ले बनविणे ही आपल्या महाराष्ट्राची परंपराच आहे.दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे.या परंपरेतूनच आमचे गडकोटांविषयी प्रेम वाढते. पुढे दुर्गभ्रमंतीची आवड जडते. कल्पक निर्मितीसोबत शौर्याच्या कथांची उजळणी करणं, हीच तर खरी गंमत असते दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या किल्ल्यांची.गडकिल्ल्यांचा इतिहास मुलांना खरोखर समजवायचा असेल तर दगड-मातीचे किल्ले बनवणे ही उत्तम पर्याय आहे.


मातीचे किल्ले आणि दिवाळी हे एक अतुट नातं आपल्याकडे दिसून येतं. दिवाळीच्या दिवसात आपल्या परिसरात फेरफटका मारल्यास प्रत्येक सोसायटी एक लहानसा किल्ला हा असतोच. मातीचा किल्ला बनविण्याची मजा काही औरच असते. बरेचदा या कामात आपल्या बच्चे कंपनीला सोसायटीतल्या मोठ्यांची मदत होत असते. फराळ, फटाके, रांगोळी आणि नव्या कपडय़ांबरोबरच दिवाळीचा अविभाज्य घटक म्हणजे घराबाहेर मुलांनी बनविलेले मातीचे किल्ले. लहान मुले इतिहासाच्या पुस्तकात असणारे किल्ले दिवाळीच्या सुट्टीत जशाच तशा स्वरूपात माती, दगड व वीटांनी बनवत आहेत. त्यांची हुबेहुब किल्ले बनविण्याची कला मोठयांना चकित व आचंबीत करणारी असते. आजची बच्चे कंपनी महाराष्ट्राचा मराठमोळया इतिहास संस्कृतीची आठवण दिवाळीच्या किल्ल्यांच्या स्वरूपात ताजी करत आहेत. किल्ल्याची ओळख करून देणारे छोटे माहितीपत्रक लावण्याबरोबरच या विद्यार्थ्यांनी येथे येणाऱ्या प्रत्येकाला किल्ल्याची परिपूर्ण माहिती देण्याचीही व्यवस्था केलेली असते.

आजची बच्चे कंपनी तरूणाच्या चंगळवादी, पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍या तरूण पिढीला मात देत बच्चे कंपनी आपली परंपरा, संस्कृती व आपला इतिहास दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना आठवण करूण देत आहेत. किल्ला बनविण्यासाठी लहान मुलं दगड,माती, विटा, पाणी लाकडे मिळवण्यासाठी दुपारी उन्हा-तान्हात फिरत असतात. एरवी मोबाईल व संगणकीय पडद्यावर ऑनलाइन विश्वात दंग असणारी मुले किल्ले बनविण्याच्या निमित्ताने का होईना मातीत हात घालतात. विशेष म्हणजे विविध  संस्थांच्या माध्यमातून किल्ले स्पर्धाचे आयोजन केले जात असल्याने आणि त्यात पारितोषिके मिळवण्यासाठी काल्पनिक आणि रेडिमेड किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्यांची छोटी प्रतिकृती बनवण्याकडेच मुलांचा अधिक कल दिसून येत आहे. लहान मुलं किल्ल्यावर  जाऊन न आल्याने त्या किल्ल्यांची माहिती गुगल मॅप आणि इमेजेसच्या साहाय्याने मिळवत किल्ला अधिक रेखीव कसा होईल यासाठी बच्चे कंपनीकडून प्रयत्न होत असतो. लहानमुलांना किल्ले बनविण्यात मोठयांनी मदत केल्यास मुलांचा आंनद वाढेल. देखणा किल्ला साकारल्यानतंर मुलांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे असते.


महाराष्ट्राच्या गतवैभवाची साक्ष देणारे किल्ले शासकीय दुर्लक्षिततेमुळे ढासळू लागले असताना लहान मुलांच्या दिवाळीत किल्ले बनवण्याचा उपक्रमाला महत्व आले आहे. किल्ले बनवण्याचा उद्देश केवळ मनोरंजन किंवा खेळ नसून त्यामुळे आपल्यातील प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळतो आहे. त्या माध्यमातून अनेक नवनवीन क्लृप्त्या आपल्या डोक्यात येत असतात. या मुलांना शाबासकी देऊन कौतुक केल्यास ही मंडळी आनंदी होतात.


Monday, November 9, 2020

यंदाची दिवाळी साधेपणात

                                                  यंदाची दिवाळी साधेपणात 


दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा​. दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे.भारतात साज-या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळी हा दीपोत्सव भारतातील उत्सवांमधील एक अतिशय महत्वाचा आणि अत्यंत सुंदर व आंनदाचा सण आहे. रोषणाई हे या सणाचं खास वैशिष्ट्य. सर्व प्रकारचे अंधकार दूर करून मनामनात आशेचे, सकारात्मकतेचे दीप उजळवण्याची प्रेरणा हा सण देतो.यावर्षी राज्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह सर्वधर्मियांचे सण यावर्षी साधेपणाने साजरे केले आहेत. त्यामुळेच येणारा दिवाळी सणही तशाच पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आधीच राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.राज्य सरकारने दिवाळी सणासाठी मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जारी केल्या आहेत.दिपावली सण पूर्ण खबरदारी घेऊन साधेपणाने साजरा करावा. नागरिकांनी गर्दी टाळावी, एकत्र येऊ नये, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे.फटाके फोडणे टाळावे.दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करावी. सार्वजनिक उत्सव वा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करण्यात येऊ नयेत. आरोग्य विषयक उपक्रम-शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे,या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत यावर्षी दिवाळी साजरी करावी लागणार. संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे.


दिवाळी सुरू होण्यापूर्वी लगबग सुरू होते ती खरेदीची. कंदीलापासून ते फटाक्यांपर्यंत विविध वस्तू विकत घेणासाठी ग्राहक गर्दी करतात आणि बाजारपेठा गजबजू लागतात. नवीन कपडे घालून एकमेकांना भेटून शुभेच्छा देत सणाला सुरुवात होते.दिवाळीत रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. दिवाळीच्या उत्साहात खऱ्या अर्थानं रंग भरते ती रंगबिरंगी रांगोळी. दारासमोरच्या रांगोळीमुळं सणाचं मांगल्य व पावित्र्य वाढते. दिवाळीत खरा उत्साह निर्माण होतो तो फटाक्यांच्या आतषबाजीनं. फुलबाज्या, पाऊस, भुईचक्रापासून ते अगदी लवंगी माळ, रस्सी बॉम्बसारख्या फटाक्यांनी आनंद द्विगुणित होतो. दिवाळी दरम्यान गोड पदार्थांची रेलचेल असते. सणाचं निमित्त पुढं करून सगळेच मिठाईवर ताव मारतात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. शुभेच्छा व भेट वस्तूंची देवाणघेवाण होते. आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस साजरा होतो. आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी साजरी होते. आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी साजरा केला जातो.आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन होते.कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो.तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज होते.दिवाळी आंनदात व उत्साहात साजरी होते.दिवाळी तोंडावर आली की जिथे व्यावसायिकांना दुपारच्या जेवणाचीही उसंत नसते, अशी खास दिवाळीनिमित्त झगमगणारी बाजारपेठ यंदा टाळेबंदी आणि करोनाच्या झळा सोसत आहे. विजेवर चालणाऱ्या माळा, पणत्या, रांगोळी आदींचे विक्रेते यंदा ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीला केवळ दहा दिवस शिल्लक असतानाही अद्याप म्हणावा तसा ग्राहक फिरकत नसल्याने दुकानदारांची निराशा झाली आहे.या वर्षी दिवाळी सण साजरा करताना नेहमीच सारखी खुषी व उत्साह नसणार आहे.कोण कोणाला भेटणार नाही की कोणाच्या घरी मिठाई घेऊन जाणार नाही. फक्त मोबाईल एकमेकांना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी होणार आहे. फटाके नसल्याने लहान मुलं खूपच नाराज झाली आहे. तरीही दिवाळी सण साजरा व्हायलाच पाहिजे आणि तो साजरा होणारच पण साधेपणाने.हा दिवाळीचा सण तुमच्यासाठी मंगलमय व आरोग्यमय असो. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि तुमचे आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीने जावो.

Saturday, October 24, 2020

अनलॉक

 अनलॉक 


अनलॉकच्या नव्या नियमावल्या जाहीर होत आहेत. नियमांमध्ये थिथिलता आणत काही बाबींना मान्यता दिली जात आहे.काही गोष्टी सशर्त सुरु झाल्यात तर काही अजून सुरु व्हायच्या आहेत.निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवताना व प्रत्येक निर्बंध मागे घेताना कमालीची सावधानता बाळगली जात आहे. थांबलेले आपले व्यवहार पुन्हा नव्याने सुरु होत आहे. अनलॉक मध्ये कसे जगायचे याची जबाबदारी  तुमच्यावर आहे. अनलॉक झाले पण आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी वाढलेली आहे.  जीवन पूर्वपदावर येत आहे.


लोकांना एका नव्या आणि तितक्याच सकारात्मक पर्वाची सुरुवात करण्याची हाक दिली. हाकेला साद देत बराच काळ घरात अडकलेली माणसं घरातून बाहेर पडू लागली आहेत. घराबाहेरचे जग ते प्रथमच पाहत आहेत.सतत बाहेर पडण्याची,फिरण्याची सवय असणा-यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे.या परिस्थितीची वाट पाहणारे सुखावले आहेत.पण नियमांचे पालन करीत आपण आपली कामे करायची आहेत.अनलॉक झाले पण पूर्वीचे स्वातंत्र्य अजून मिळालेले नाही.मुखपट्टी लावूनच सर्व व्यवहार करायचे आहेत.


'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व व्यवहार, दैनंदिन जीवन हळूहळू रुळावर येते आहे; पण म्हणून गेल्या चार महिन्यांत शिकलेल्या गोष्टी विसरून चालणार नाही. परीक्षा संपल्यावर अभ्यास विसरला, तर काय उपयोग? करोनाने आपल्या आधुनिक समाजाच्या मूल्यव्यवस्थेला लखलखीत आरसा दाखवला आहे आणि वेळ निघून जाण्यापूर्वीच या मूल्यव्यवस्थेची पुनर्रचना होणे किती आवश्यक आहे हेही सांगितले. प्रत्येकाने आत्मकेंद्रित मनोवृत्तीकडून सामाजिक भानाकडे, स्पर्धाशीलतेकडून सहकार्याकडे, आक्रमकतेकडून क्षमाशीलतेकडे आणि ऐहिक सुखांकडून ते अर्थपूर्ण आनंदाकडे जावे. तसेच निसर्गाला समृद्ध करीत जीव सृष्टीला सांभाळले पाहिजे.


देश आर्थिक संकटात असल्याने देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु करणे गरजेचे झाले होते. लोकांचे जीव वाचवणे किंवा सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था टिकवणे अशी दोन आव्हानं होती. पाश्चात्य देशांना अनलॉक प्रक्रिया राबवताना तितकीशी अडचण आली नाही कारण त्यांची कमी लोकसंख्या,राहणीमान आणि मुख्य म्हणजे नियम हे पाळण्यासाठीच असतात अशी तिथल्या जनतेची धारणा. आपल्याकडे तसे नसल्याने टप्याटप्याने अनलॉक करावे लागले."नियम हे मोडण्यासाठीच असतात" असं मानून तो नियम खरोखरच मोडणाऱ्या भल्यामोठ्या जनसंख्येला तितकीच समर्थ साथ मिळते ती "माझ्या एकट्याने नियम पाळून काय होणार आहे" अशा पळवाटी, दोषी विचारांच्या जनतेची. बधितांच्या आकड्यांचा "मेळ" साधत अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे.सर्वांनी नियमांचे पालन केले तर अनलॉक ची प्रक्रिया यशस्वी झाली असे म्हणता येईल. पण नियमांचे उल्लंघन केल्यास पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.  

 

नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पूर्ण अनलॉक होणार अपेक्षा करू शकतो.पण जेव्हा तोडांवरची मुखपट्टी निघेल तेव्हाच पूर्ण अनलॉक होईल.
Saturday, October 10, 2020

टपाल दिन

 टपाल दिन 

दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. हा खरंतर टपाल विभागाचे अधिकारी आणि पोस्टमन यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे. कुठलाही ऋतू असो त्याचा सामना करीत टपाल कर्मचाऱ्यांनी निष्ठापूर्वक सेवा दिली आहे व देत आहेत. इंटरनेटच्या काळात आजही लोक टपालसेवेचा वापर करताना दिसतात. हा टपालसेवेवरचा विश्वास आहे.टपाल पाठवण्याचं सर्वात सोपं व स्वस्त साधन आहे ते म्हणजे टपाल सेवा. आज पत्रांची जागा ई-मेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे.मात्र बदलत्या काळाबरोबरच आणि तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल,सोशल मीडियामुळे क्षणात कोणाशीही संवाद साधता येत असल्याने टपाल सेवेचे महत्व कमी झालेले आहे.तीही संवाद माध्यमे शोधलीत तरी पत्राची किंवा एकंदरितच लिखाण माध्यमाची गोडी इतर कशालाही नाही हे बाकी खरचं. 


आजच्या युवा पिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटिंगचे महत्त्व हवे तेवढे वाटत नाही. एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजेच सर्वकाही असे. एक काळ असो होता जेव्हा लोक दिवस-रात्र पत्रांची वाट पाहत असे. लोक लांब असले तरीही पत्राद्वारे प्रेम व्यक्त करत असत. मात्र आज लोक आधुनिक तर होत असून मानसिकदृष्ट्या एकमेंकांपासून लांब जात आहेत. जेव्हा एखादे टेलीग्राम यायचे तेव्हा एक संकेत असायचा की, काहीतरी वाईट घडले आहे आणि जेव्हा एखादे पत्र यायचे तेव्हा लोक समजून जायचे की, काहीतरी आनंदाची बातमी आहे.


कधी आनंदवार्ता यायची तर, कधी मनाला रुखरुख लावणारी, व्यथित करणारी बातमीही. कधी परीक्षेचा रिझल्टही कळायचा. तर कधी कुणाच्या तरी घरी नव्याने आगमन झालेल्या पाहुण्याबद्दल समजायचं. अनेक भावभावना तुझ्या एकाच रुपातून आमच्यापर्यंत पोहोचायच्या. त्यात पोस्टमन काकांशीही तुझ्यामुळे निर्माण झालेलं एक नातं.अविरतपणे चालणारे, न थकता. त्यांचा तो टिपिकल खाकी ड्रेस, खांद्याला ती त्यांची नेहमीची खाकी रंग असलेलीच बॅग, त्यातून प्रत्येक पत्र अगदी अचूक पत्त्यावर पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याला मनापासून नमस्कार. मला यावेळी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आठवतं. डाकियाँ डाक लाया....खुशी का पयाम कही....

जुन्या काळातील पोस्ट ऑफिस आणि सध्याचे पोस्ट ऑफिस मधे अमुलाग्र बदल झाल्याचे अनुभवण्यास मिळते.इतर सेवां सोबत पोस्टाची बँकिंग सेवा सुद्धा चांगली आहे.आजही सुरक्षित ठेव ठेवायची असेल तर पोस्टासारखा उत्तम पर्याय नाही असे जाणकार आणि तज्ञ मंडळीचे मत आहे आणि ते खरेही आहे.कोरोना महामारीच्या काळातही ग्राहकांनी पोस्टाच्या विविध सेवांचा लाभ घेतला. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमध्ये पोस्टाच्या माध्यमातून अडीचशे कोटी रुपये इतर बँकेच्या आपल्या खात्यातून उलाढाल केली. टपाल खात्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येथील प्रत्येक कर्मचारी कटिबद्ध आहे आणि तो तितक्याच  प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपले योगदान देत आहे! त्यामुळे आधुनिकतेची कास धरत माहीती तंत्रज्ञानाच्या युगात टपाल खातेसुद्धा तितक्याच समर्थपणे वाटचाल करीत आहे.जागतिक टपाल दिनाच्या पोस्टमन काकांच्या अथक सेवेला गाठोड्यासारख्या गाठोडभरुन शुभेच्छा.


Friday, October 9, 2020

प्रामाणिकपणाचा धडा

                 १० ऑक्टोंबरच्या महाराष्ट्र टाईम्सच्या पुरवणी मध्ये प्रसिध्द झालेला माझा लेख. 

आज सकाळी घरात काम करणा-या बाई खूप दिवसांनी आम्हाला भेटण्यास आल्या. ’मला बिनकामाचे पैसे देऊ नका’ असे त्या स्पष्ट सांगू लागल्या. घरातले आम्ही आश्चर्यचकीत झालो. आम्हाला वाटले आमचं काहीतरी चुकलं. ’मी आपल्याकडे मार्च महिन्यापासून काम करीत नाही तरीही तुम्ही मला सप्टेंबर महिन्यापर्यत दर महिन्याला पगार देत आहात. मी आता ब-याच जणांकडे काम सुरु केले आहे.  त्यामुळे माझ्या पैशाचा प्रश्न सुटला आहे. आता मला काम न करता पैसे घेणे पटत नाही. मी जेव्हा तुमच्याकडे काम सुरु करेन तेव्हापासून मला पगार द्या.’ असे तिचे म्हणणे होते. त्यांच्या या विचाराने आम्ही प्रभावित झालो.

माझी कामे बंद झाल्यावर काहीनी मला दोन तीन महिने पगार दिला नंतर त्यांनी पगार देणे बंद केले. त्यावेळी मला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. मला तुमच्याच पगाराचा फक्त आधार होता. ही मदत मी कधीच विसरणार नाही. मिस्टरांचे काम देखील बंद पडल्याने पगार येत नव्हता. दोन मोठी मुलं अशा कुटुंबाचा भार माझ्यावर एकटीवर होता.घराबाहेर पडण्यास भीती व पोलिसांचा धाक होता. कोणतीच कामे करु शकत नव्हते. मोठ्या अडचणीत सापडली होते. देवाच्य कृपेने आता माझे कुटुंब स्थिरावले आहे. त्यांचा संकटाकाळातील प्रवास ऐकून सत्यनिष्ठ, प्रामाणिक माणसं कामाच्या ओझ्याने दबून जात नाही,याचा प्रत्यय आला.

घरात काम करणा-या सामान्य बाई, गरीब असून देखील त्यांना स्वाभिमान आहे. बिनकामाचे पैसे कसे घ्यायचे? त्यांना हे चुकीचं वाटत होते. त्यांनी जर ही विनंती केली नसती तर आम्ही नियमित पैसे देत त्यांना मदत करीत राहीलो असतो.आम्ही केलेल्या मदतीचा गैरफायदा न घेण्याच्या त्यांच्या मानसिकतेने भारावून गेलो. या विंनतीच्या मागे त्यांचा चांगला हेतू दिसला. समाजात गरीब माणसं आहेत पण प्रामाणिक देखील आहेत. सकारात्मक विचारसरणीने त्यांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वेडेवाकडे वळण समर्थपणे पार करण्याची ताकद मिळत असेल.          

करोनाच्या संकटात त्यांना आमच्या मदतीची गरज असेल या करीता त्यांच्याकडून कोणत्याही मदतीच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता  निस्वार्थ भावाने आम्ही त्यांना मदत करीत होतो. आपण लावलेल्या छोट्याशा हातभाराने इतरांची अडचण दूर होऊ शकली, हे समाधानही फार मोठे असते. त्यांच्या प्रामाणिक विचारामुळे आमचे समाधान दुरावले गेले.  

कोरोनाच्या काळात एका सामान्य बाईकडून चांगली शिकवण मिळाली.सकारात्मक विचारांमुळे माणसाच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन होऊ शकते.सकारात्मक विचारांचा पाया असणारी व्यक्ती स्वत:बद्दल कायम जागृत असते. स्वत:च्या गुण-दोषांबद्दल तिला जाणीव असते. स्वत:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी महत्त्वाची असते. सकारात्मक विचारांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारसरणी असणारी सृजनशील माणसे समाजात आपले योगदान प्रभावीपणे देऊ  शकतात.

आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांचा स्वाभिमान न दुखवता त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले.