Tuesday, December 29, 2020

विवाह सोहळ्यांच्या नवा साज

 विवाह सोहळ्यांच्या नवा साज 


हल्ली लग्नसोहळ्यात बराच बदल झाला आहे. यजमान्यांना मोजक्याच नातेवाईक व पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळे पार पाडावे लागत आहेत. अनलॉक झाल्यानंतर आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर रेशीमगाठ बांधतांना करोनाच्या नियमावलीचे स्वागत करत त्यातूनही नवा ट्रेंड लग्नसराईत आता रुळण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या काही दशकात समृद्धीमुळे वाढलेल्या लग्नसमारंभातील थाटामाटाच्या आणि डामडौली देखाव्याच्या पद्धतींनाही आळा बसला आहे. साध्या व सोप्या पद्धतीने लग्नकार्य पार पडत आहेत. असे छोटेखानी विवाहसोहळे समाजानेही स्वीकारले आहेत.तर नोंदणी पद्धतीने विवाह सोहळ्यांना अपरिहार्य म्हणून का होईना समाजाची स्वीकृती मिळाली आहे.  


देशातील लॉकडाऊनचा लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टवर परिणाम झाला आहे. कोणी आहे त्या परिस्थीतीत लग्न उरकून घेत आहे. ज्यांना साग्रसंगीत लग्न करायचं आहे त्यांनी मात्र आपले विवाह पुढे ढकलले आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेल्या या लग्नांची चांगलीच चर्चा रंगली. पण या कोरोनाने लग्नाचा फॉरमॅट बदलला हे नक्की. शाही लग्नसोहळ्याचा थाटच बदलला आहे. कोरोनाने लग्नाचे पॅकेजच बदललं आहे.लग्न लावणा-या कुंटुबांची लाखो रुपयांची बचत झाली आहे. 



लग्नसराईतल्या संपूर्ण खरेदीत आणि ग्लॅमरस इव्हेंटमध्ये मास्कची फॅशन आता स्पष्टपणे दिसू लागली आहे.'मास्क' शिवाय लग्नसोहळे नाहीत, असे कधी कोणी स्वप्नातही पाहिले नसेल. वरवधूंच्या डिझायनर कपड्यांना साजेसे मास्क शिवण्यासह वऱ्हाडी मंडळांनीही खास मास्क परिधान करत आहेत. 


हॉल,  कॅटरिंग,  फ्लॉवर डेकोरेशन, फोटो, व्हिडिओ, फ्लोरल रंगोली डेकोरेशन, ब्रायडल मेकअप अँड ज्वेलरी, पुष्पहार, पंडित इथपर्यंत मर्यादीत असलेल्या पॅकेजमध्ये आता आणखी भर पडली आहे. आता कोरोनामुळे थर्मल स्क्रिनिंग, यूव्ही हँड सॅनिटायझेशन, एन-९५ मास्कची भर वेडिंग पॅकेजमध्ये पडली आहे. त्यामुळे कोरोनाने शाही लग्नसोहळ्याचा थाटच बदलला आहे.


लग्नांचे आमंत्रण व्हाटसॅप मिळते. पूर्वी लग्नाच्या हॉलमध्ये गेल्यावर गुलाबाचे फुल व पेढा देऊन अंगावर अत्तर शिंपडले जायचे. हल्ली हँड सॅनिटायझर व मास्क देऊन थर्मल स्क्रिनिंग केले जाते.हॉलमध्ये शांतता असते.गोंगाट नसतो. समईचौघडा नसतो. हॉलमध्ये खुर्च्या लांब लांब ठेवलेल्या असतात. जेवणाला रांग नसते. काही जण तर जेवतही नाहीत. भेटवस्तू स्विकारल्या जात नाहीत. वरात नसते.


हजारो लोकांच्या जेवणाचा खर्च, लग्नसमारंभातील गाजावाजा,ध्वनीप्रदूषणही नाही.एवढेच नव्हे तर रुसवे-फुगवे,मानापमानाचे प्रसंग नाही.शारीरिक, मानसिक, आर्थिक ताण नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे, लग्नात गर्दी होत नसल्याने व-हाडी मंडळीची गैरसोयही टळत आहे. गरीब कुंटुब कर्जबाजारी होणार नाहीत. या बदलामुळे काही व्यवसाय मात्र बंद होतील.     


वाईटातून चांगले घडते या धड्याचा कोरोना महामारीने सुद्धा प्रत्यय दिला आहे. कोरोनामुळे होणारे हे बदल समाजात पुढेही चालू राहिले तर डामडौल आणि थाटामाटाच्या देखाव्याचे आकर्षण संपुष्टात येईल, निरर्थक थाटमाट थंडावेल ही अपेक्षा करावी का?


करोनाने जसे शारीरिक स्वच्छतेचे धडे दिले तसेच जुनाट सामाजिक प्रथांना अव्हेरून नवे बदल स्वीकारण्याची संधी दिली आहे. 




No comments: