Thursday, January 7, 2021

मैत्रीचं नातं

’मदतीला धावून येणारा सखा’ हा माझा लेख महाराष्ट्र टाईम्स यावृतपत्रात दिनांक ०७ जानेवारी २०२१ रोजी प्रसिध्द झाला आहे.  

 मैत्रीचं नातं

मुंबई पोर्ट ट्रस्ट मधला माझा एक जवळचा सहकारी "एकनाथ मराठे". अत्यंत साधे राहणीमान,तल्लख बुद्धी व स्पष्टवक्ता अशी एकनाथ मराठेची ओळख. बराच काळ आम्ही एकाच कार्यालयात एकत्र काम केल्याने आम्ही केव्हा मैत्रीच्या नात्यात गुंतलो ते कळचेच नाही. मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये प्रथम संगणक आणल्यापासून आम्हाला त्यावर काम करण्याची संधी मिळाली. संगणकातली कोणालाच काहीच माहीती नसल्याने आमच्यावर मोठी जबाबदारी होती. आम्हाला त्यातली माहीती घेऊन नंतर आमच्या कर्मचा-यांना शिकवून कामात संगणकाचा उपयोग करुन घेण्याचे काम आम्ही यशस्वीरित्या पार पाडले होते. त्यावेळी संगणकातील समस्यांचे निराकरण करीत कर्मचा-यांना कामात दिवसरात्र मदत करावी लागली.        


एकनाथ, कामात एकदम तत्पर आणि संगणक वापरात पारंगत असल्याने त्याच्यावर बरेच अवलंबून असत. त्याने संगणकीय प्रणालीत सोयीचे बरेच बदल केल्याने संगणक वापरणा-यांना सोयीचे झाले. नंतर तो वेगवेगळ्या प्रणालीवर कामे करु लागला व व्यवस्थापननेला मदत करु लागला. त्याची कामातली हुशारी पाहून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांच्या वैयक्तिक सचिव यापदावर त्याची नियुक्ती झाली.तेथेही कामे करुन अध्यक्षांची शाबासकी मिळवली. त्याच्या कार्यकाळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे तीन अध्यक्ष बदलले.सर्व अध्यक्षांनी त्याच्या कामाची वाहवा केली.


हल्ली कोविडच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी घरात राहून खुपजणांना मदत केली. तो व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या मधला दुवा ठरला होता. कर्मच्या-यांना घराजवळील औषधांच्या दुकानातून औषधं मिळण्याची सोय केली. कोविड झालेल्यांना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल करून घेणे. डॉक्टर व मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिका-यांशी संपर्कात राहून त्यांना कामात येणा-या अडचणी दूर केल्या. दिवस रात्र घरातून तो फोनवरून सर्वांना मदत करत होता. घरातून कामे करणे कठीण होऊ लागल्यावर आठवड्यातून चार दिवस कार्यालयात येऊन कामे करु लागला. या काळात त्याच्यावर कामाचा ताण बराच वाढला होता. त्यावेळी घरी जाण्याच्या व येण्याच्या त्रासामुळे अध्यक्षांनी त्याची मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय केल्याने त्याला कार्यालयातील कामावर लक्ष केंदीत करणे सोयीचे झाले. नेहमीच व्यवस्थापनच्या लोकोपयोगी उपक्रमाला सुचना देत असतो.ब-याच कर्मचा-यांची अडलेली काम निरपेक्ष वृत्तीने केली आहेत. कोणालाही मदत करण्यास तो नेहमीच तप्तर असतो. मी सेवानिवृत झालो तेव्हा त्याने पुढाकार घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य दक्षता अधिकारी यांच्या हस्ते छोट्याश्या सोहळ्यात मला सन्मानित केले होते.


असा हा माझा मित्र ट्रेकिंग, ब्लॉगींग, वृतपत्रलेखन करीत स्वच्छंदी जीवनात रमला आहे. ब-याच ट्रेकना आम्ही दोघे एकत्र असतो. ’ब्लॉगींग’ मी त्याच्याकडून शिकलो.लोकांना कामात मदत करणा-या या माझ्या मित्राची सर्वांशी मैत्री आहे. पण आमच्यात मैत्रीचं एक आगळंवेगळं नातं जुळलं आहे. त्याच्या हातून निस्वार्थ भावनेने जनसेवा घडावी, हीच सदिच्छा.


No comments: