Saturday, December 19, 2020

रिकव्हरी रेट

 रिकव्हरी रेट


भारताचा करोना रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हा जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. जगाचा एकत्रित रिकव्हरी रेट हा ७०.२७ टक्के इतका आहे. यामध्ये भारताचा रिकव्हरी रेट हा ९५.३१ टक्के आहे. राज्यात करोना रुग्णांच्या तुलनेत करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यात चांगलेच यश येताना दिसत आहे. 


देशात रिकव्हरी रेट वाढण्याची कारणे कोणती असतील? योग्य औषध व उपचार पध्दती, बाधितांची रोगप्रतिकारक शक्ती व लढाऊ वृत्तीत वाढ, डॉक्टर व नर्सेस यांचे अथक प्रयत्न इत्यादी... की करोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आखलेली स्पष्ट रणनीती, सक्रियता तसेच आखले गेलेले कडक निकष याचा हा परिणाम.आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. 


लस येण्या अगोदरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. भारतात कोरोना रिकव्हरी रेट वाढत असताना लसीकरणाने संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे.   


कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आरोग्य खात्यातील परिचारिका डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांची ही निस्वार्थ सेवा इतिहासात नोंदली जाईल आणि कायम स्मरणात राहील. संपूर्ण भारतभरात  परिचारिका अनेकांचे जीव वाचवण्यास मदत करण्यासाठी चोवीस तास अथक प्रयत्न करत आहेत. कोविड१९ विषाणूविरुद्ध देशाच्या संरक्षण फळीत त्या फ्रंटलाईन सोल्जर ठरल्या आहेत. आरोग्य खात्यातील प्रत्येकाचे अथक परीश्रम, सेवाभावी वृत्ती, त्याग व  निस्वार्थ सेवेमुळे रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत.


कोरोना झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढला आहे, तर लोकांना वाटू लागले आहे की हा विषाणू काही बाधा पोहोचवत नाही, हा तर कमकुवत झाला आहे. बरेचसे लोक असाही विचार करू लागले आहेत की जर आपण आजारी जरी पडलो तरी देखील बरे होऊ शकतो. याच  कारणामुळे बेजबाबदारपणा  ही वाढला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने लोकांमधली भिती कमी झाली आहे. निष्काळजीपणा वाढला आहे. हा बेजबाबदारपणा चिंता वाढवणारा आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे जगातील काही राष्ट्रात पुन्हा करोना रुग्णांची संख्या झपाट्यांने वाढत आहे.संक्रमणाला रोखण्यासाठी लोकांना मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन व सतत हात धुण्याची सवय अजून काही दिवस ठेवावी लागेल. रिकव्हरी रेट वाढल्याने धोका टळलेला नाही.याकरिता प्रत्येकाने सतर्क व सुरक्षित राहणे गरजेचे आहे. रिकव्हरी रेट बरोबर नव्या बाधितांचा रेट कमी व्हावा.

No comments: