Saturday, October 24, 2020

अनलॉक

 अनलॉक 


अनलॉकच्या नव्या नियमावल्या जाहीर होत आहेत. नियमांमध्ये थिथिलता आणत काही बाबींना मान्यता दिली जात आहे.काही गोष्टी सशर्त सुरु झाल्यात तर काही अजून सुरु व्हायच्या आहेत.निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवताना व प्रत्येक निर्बंध मागे घेताना कमालीची सावधानता बाळगली जात आहे. थांबलेले आपले व्यवहार पुन्हा नव्याने सुरु होत आहे. अनलॉक मध्ये कसे जगायचे याची जबाबदारी  तुमच्यावर आहे. अनलॉक झाले पण आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी वाढलेली आहे.  जीवन पूर्वपदावर येत आहे.


लोकांना एका नव्या आणि तितक्याच सकारात्मक पर्वाची सुरुवात करण्याची हाक दिली. हाकेला साद देत बराच काळ घरात अडकलेली माणसं घरातून बाहेर पडू लागली आहेत. घराबाहेरचे जग ते प्रथमच पाहत आहेत.सतत बाहेर पडण्याची,फिरण्याची सवय असणा-यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे.या परिस्थितीची वाट पाहणारे सुखावले आहेत.पण नियमांचे पालन करीत आपण आपली कामे करायची आहेत.अनलॉक झाले पण पूर्वीचे स्वातंत्र्य अजून मिळालेले नाही.मुखपट्टी लावूनच सर्व व्यवहार करायचे आहेत.


'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व व्यवहार, दैनंदिन जीवन हळूहळू रुळावर येते आहे; पण म्हणून गेल्या चार महिन्यांत शिकलेल्या गोष्टी विसरून चालणार नाही. परीक्षा संपल्यावर अभ्यास विसरला, तर काय उपयोग? करोनाने आपल्या आधुनिक समाजाच्या मूल्यव्यवस्थेला लखलखीत आरसा दाखवला आहे आणि वेळ निघून जाण्यापूर्वीच या मूल्यव्यवस्थेची पुनर्रचना होणे किती आवश्यक आहे हेही सांगितले. प्रत्येकाने आत्मकेंद्रित मनोवृत्तीकडून सामाजिक भानाकडे, स्पर्धाशीलतेकडून सहकार्याकडे, आक्रमकतेकडून क्षमाशीलतेकडे आणि ऐहिक सुखांकडून ते अर्थपूर्ण आनंदाकडे जावे. तसेच निसर्गाला समृद्ध करीत जीव सृष्टीला सांभाळले पाहिजे.


देश आर्थिक संकटात असल्याने देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु करणे गरजेचे झाले होते. लोकांचे जीव वाचवणे किंवा सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था टिकवणे अशी दोन आव्हानं होती. पाश्चात्य देशांना अनलॉक प्रक्रिया राबवताना तितकीशी अडचण आली नाही कारण त्यांची कमी लोकसंख्या,राहणीमान आणि मुख्य म्हणजे नियम हे पाळण्यासाठीच असतात अशी तिथल्या जनतेची धारणा. आपल्याकडे तसे नसल्याने टप्याटप्याने अनलॉक करावे लागले."नियम हे मोडण्यासाठीच असतात" असं मानून तो नियम खरोखरच मोडणाऱ्या भल्यामोठ्या जनसंख्येला तितकीच समर्थ साथ मिळते ती "माझ्या एकट्याने नियम पाळून काय होणार आहे" अशा पळवाटी, दोषी विचारांच्या जनतेची. बधितांच्या आकड्यांचा "मेळ" साधत अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे.सर्वांनी नियमांचे पालन केले तर अनलॉक ची प्रक्रिया यशस्वी झाली असे म्हणता येईल. पण नियमांचे उल्लंघन केल्यास पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.  

 

नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पूर्ण अनलॉक होणार अपेक्षा करू शकतो.पण जेव्हा तोडांवरची मुखपट्टी निघेल तेव्हाच पूर्ण अनलॉक होईल.
No comments: