Monday, November 9, 2020

यंदाची दिवाळी साधेपणात

                                                  यंदाची दिवाळी साधेपणात 


दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा​. दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे.भारतात साज-या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळी हा दीपोत्सव भारतातील उत्सवांमधील एक अतिशय महत्वाचा आणि अत्यंत सुंदर व आंनदाचा सण आहे. रोषणाई हे या सणाचं खास वैशिष्ट्य. सर्व प्रकारचे अंधकार दूर करून मनामनात आशेचे, सकारात्मकतेचे दीप उजळवण्याची प्रेरणा हा सण देतो.यावर्षी राज्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह सर्वधर्मियांचे सण यावर्षी साधेपणाने साजरे केले आहेत. त्यामुळेच येणारा दिवाळी सणही तशाच पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आधीच राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.राज्य सरकारने दिवाळी सणासाठी मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जारी केल्या आहेत.दिपावली सण पूर्ण खबरदारी घेऊन साधेपणाने साजरा करावा. नागरिकांनी गर्दी टाळावी, एकत्र येऊ नये, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे.फटाके फोडणे टाळावे.दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करावी. सार्वजनिक उत्सव वा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करण्यात येऊ नयेत. आरोग्य विषयक उपक्रम-शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे,या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत यावर्षी दिवाळी साजरी करावी लागणार. संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे.


दिवाळी सुरू होण्यापूर्वी लगबग सुरू होते ती खरेदीची. कंदीलापासून ते फटाक्यांपर्यंत विविध वस्तू विकत घेणासाठी ग्राहक गर्दी करतात आणि बाजारपेठा गजबजू लागतात. नवीन कपडे घालून एकमेकांना भेटून शुभेच्छा देत सणाला सुरुवात होते.दिवाळीत रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. दिवाळीच्या उत्साहात खऱ्या अर्थानं रंग भरते ती रंगबिरंगी रांगोळी. दारासमोरच्या रांगोळीमुळं सणाचं मांगल्य व पावित्र्य वाढते. दिवाळीत खरा उत्साह निर्माण होतो तो फटाक्यांच्या आतषबाजीनं. फुलबाज्या, पाऊस, भुईचक्रापासून ते अगदी लवंगी माळ, रस्सी बॉम्बसारख्या फटाक्यांनी आनंद द्विगुणित होतो. दिवाळी दरम्यान गोड पदार्थांची रेलचेल असते. सणाचं निमित्त पुढं करून सगळेच मिठाईवर ताव मारतात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. शुभेच्छा व भेट वस्तूंची देवाणघेवाण होते. आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस साजरा होतो. आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी साजरी होते. आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी साजरा केला जातो.आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन होते.कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो.तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज होते.दिवाळी आंनदात व उत्साहात साजरी होते.दिवाळी तोंडावर आली की जिथे व्यावसायिकांना दुपारच्या जेवणाचीही उसंत नसते, अशी खास दिवाळीनिमित्त झगमगणारी बाजारपेठ यंदा टाळेबंदी आणि करोनाच्या झळा सोसत आहे. विजेवर चालणाऱ्या माळा, पणत्या, रांगोळी आदींचे विक्रेते यंदा ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीला केवळ दहा दिवस शिल्लक असतानाही अद्याप म्हणावा तसा ग्राहक फिरकत नसल्याने दुकानदारांची निराशा झाली आहे.या वर्षी दिवाळी सण साजरा करताना नेहमीच सारखी खुषी व उत्साह नसणार आहे.कोण कोणाला भेटणार नाही की कोणाच्या घरी मिठाई घेऊन जाणार नाही. फक्त मोबाईल एकमेकांना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी होणार आहे. फटाके नसल्याने लहान मुलं खूपच नाराज झाली आहे. तरीही दिवाळी सण साजरा व्हायलाच पाहिजे आणि तो साजरा होणारच पण साधेपणाने.हा दिवाळीचा सण तुमच्यासाठी मंगलमय व आरोग्यमय असो. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि तुमचे आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीने जावो.

No comments: