Saturday, November 14, 2020

मुलांनी बनविलेले किल्ले.

 मुलांनी बनविलेले किल्ले. 


आपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. इतिहासकालीन पराक्रम आणि संघर्षाची गडकिल्ले प्रतीके आहेत. दिवालीच्या सुट्टीत लहान मुलांनी  किल्ले बनविणे ही आपल्या महाराष्ट्राची परंपराच आहे.दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे.या परंपरेतूनच आमचे गडकोटांविषयी प्रेम वाढते. पुढे दुर्गभ्रमंतीची आवड जडते. कल्पक निर्मितीसोबत शौर्याच्या कथांची उजळणी करणं, हीच तर खरी गंमत असते दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या किल्ल्यांची.गडकिल्ल्यांचा इतिहास मुलांना खरोखर समजवायचा असेल तर दगड-मातीचे किल्ले बनवणे ही उत्तम पर्याय आहे.


मातीचे किल्ले आणि दिवाळी हे एक अतुट नातं आपल्याकडे दिसून येतं. दिवाळीच्या दिवसात आपल्या परिसरात फेरफटका मारल्यास प्रत्येक सोसायटी एक लहानसा किल्ला हा असतोच. मातीचा किल्ला बनविण्याची मजा काही औरच असते. बरेचदा या कामात आपल्या बच्चे कंपनीला सोसायटीतल्या मोठ्यांची मदत होत असते. फराळ, फटाके, रांगोळी आणि नव्या कपडय़ांबरोबरच दिवाळीचा अविभाज्य घटक म्हणजे घराबाहेर मुलांनी बनविलेले मातीचे किल्ले. लहान मुले इतिहासाच्या पुस्तकात असणारे किल्ले दिवाळीच्या सुट्टीत जशाच तशा स्वरूपात माती, दगड व वीटांनी बनवत आहेत. त्यांची हुबेहुब किल्ले बनविण्याची कला मोठयांना चकित व आचंबीत करणारी असते. आजची बच्चे कंपनी महाराष्ट्राचा मराठमोळया इतिहास संस्कृतीची आठवण दिवाळीच्या किल्ल्यांच्या स्वरूपात ताजी करत आहेत. किल्ल्याची ओळख करून देणारे छोटे माहितीपत्रक लावण्याबरोबरच या विद्यार्थ्यांनी येथे येणाऱ्या प्रत्येकाला किल्ल्याची परिपूर्ण माहिती देण्याचीही व्यवस्था केलेली असते.

आजची बच्चे कंपनी तरूणाच्या चंगळवादी, पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍या तरूण पिढीला मात देत बच्चे कंपनी आपली परंपरा, संस्कृती व आपला इतिहास दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना आठवण करूण देत आहेत. किल्ला बनविण्यासाठी लहान मुलं दगड,माती, विटा, पाणी लाकडे मिळवण्यासाठी दुपारी उन्हा-तान्हात फिरत असतात. एरवी मोबाईल व संगणकीय पडद्यावर ऑनलाइन विश्वात दंग असणारी मुले किल्ले बनविण्याच्या निमित्ताने का होईना मातीत हात घालतात. विशेष म्हणजे विविध  संस्थांच्या माध्यमातून किल्ले स्पर्धाचे आयोजन केले जात असल्याने आणि त्यात पारितोषिके मिळवण्यासाठी काल्पनिक आणि रेडिमेड किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्यांची छोटी प्रतिकृती बनवण्याकडेच मुलांचा अधिक कल दिसून येत आहे. लहान मुलं किल्ल्यावर  जाऊन न आल्याने त्या किल्ल्यांची माहिती गुगल मॅप आणि इमेजेसच्या साहाय्याने मिळवत किल्ला अधिक रेखीव कसा होईल यासाठी बच्चे कंपनीकडून प्रयत्न होत असतो. लहानमुलांना किल्ले बनविण्यात मोठयांनी मदत केल्यास मुलांचा आंनद वाढेल. देखणा किल्ला साकारल्यानतंर मुलांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे असते.


महाराष्ट्राच्या गतवैभवाची साक्ष देणारे किल्ले शासकीय दुर्लक्षिततेमुळे ढासळू लागले असताना लहान मुलांच्या दिवाळीत किल्ले बनवण्याचा उपक्रमाला महत्व आले आहे. किल्ले बनवण्याचा उद्देश केवळ मनोरंजन किंवा खेळ नसून त्यामुळे आपल्यातील प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळतो आहे. त्या माध्यमातून अनेक नवनवीन क्लृप्त्या आपल्या डोक्यात येत असतात. या मुलांना शाबासकी देऊन कौतुक केल्यास ही मंडळी आनंदी होतात.


No comments: