Tuesday, July 19, 2022

आजी आजोबांच्या सहवासातील सुंदर क्षण

 


जिव्हाळ्याचे गाव


मुंबई गोवा या महामार्गावर इंदापूर नंतर तीन किलोमीटर वर ’विघवली’ या गावाचा फाटा लागतो. तेथून आत दिड किलोमीटरवर ’विघवली’ हे गाव डोंगराच्या कुशीत असून गर्द वृक्षराजीत वसलेले आहे. कौलारू घरांचे सुंदर  गाव आहे.निसर्गमय आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहून नक्कीच कोणीही गावाच्या प्रेमात पडेल असा आहे. गावातील निसर्ग हाच तर खरा खजिना आहे. फाट्याहून  गावात जाण्याच्या रस्त्याच्या दुतर्फा भातशेती आहे.गावकरी भातशेतीवर आपला उदरनिर्वाह करीत असत. गावात शाळा, तीन देवळे व तीन विहिरी  आणि एक सुंदर तळे आहे. होळी, गणपती, दहीहंडी व पालखी असे उत्सव आनंदात साजरे होतात. अशा या आजोळी मी लहानपणी सुट्टीत कायम यायचो. माझ्या बालपणाच्या इतिहासातील काही सोनेरी पाने. बालपणी आजोळाला एक अनन्यसाधारण स्थान असते. आजोळाचे गाव म्हणजे एक आठवणी देणारं रम्य ठिकाण. 


आजोबाआजी,मामामामी व मावश्याकाका असे मोठे कुटुंब एका मोठ्या घरात एकत्र राहायचो. घराच्या समोर अंगण, त्यावर गवताचा मांडव, ओटी, देवघर, माजघर, स्वयंपाकघर, पडवी आणि मागे परस आहे. गावात घराला लागून घर  आहेत. त्या काळात गावात वीज नव्हती. रात्रीच्या अंधारात दिवे मिनमिनत असत. 


कोंबड्याच्या आरवण्याने व जात्यावर दळण्याचे आवाज आणि परसातील झाडांवरील पक्ष्यांचे किलबिलाटाने पहाटे जाग येत असे. गोठ्यातील गाई-म्हशीचे हंबरणे ऐकू येत असे. सकाळी दूध काढत असू. गुरांना चरायला सोडायचो. आजीच्या हातचा खमंग पदार्थ यामुळे न्याहारीला लज्जत येते. आजीने केलेली साधी भाजी-भाकरीही चवदार लागते. घराच्या मागील डोंगरावरील रानात स्वछंदी भटकायचो. बैलगाडीत बसून शहरात जात असू. घरातली सर्व मंडळी शेतावर काम करण्यास जात असत. शेतावरचे जेवण खूपच चविष्ट लागायचे. शेतावरील पेरणी,लावणी,कापणी व झोडपणीची कामे करताना मजा यायची. नांगर धरायचो. कालव्यात पोहून मग घरी येत असू. निरांजनातील वातीच्या उजेडात शुंभकरोती झाल्याशिवाय जेवण मिळत नसे. कंदीलाच्या प्रकाशात जेवण व्हायचे. भूक लागलेली असल्याने जेवण जास्त जात असे.वीज नव्हती तरी काहीही अडत नव्ह्ते. रात्री काही वेळ गोष्टी ऐकताना व आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण सुरु असताना कधी झोप लागायची हेच कळायचे नाही. मला माझे आजोळ अजूनही अतिशय प्रिय आहे. 


गावातील कालव्यात डुंबत राहण्यात, बैलगाडी पळवण्यात, मासे मारण्यात, गुरांशी खेळण्यात, रानोमाळी आंबे,जांभळे व करवंदे गोळा करण्यात आणि स्वच्छंद भटकण्यात सुट्टी कधी संपते ते समजत नव्हते. अशा या मंतरलेल्या वातावरणातून परतण्याचा दिवस उगवायचा. गावातून आणलेल्या सामानात आजीने दिलेल्या डांग-मेतकुटाची भर असे आणि आजी-आजोबांच्या सहवासातील अमृतमधुर आठवणी मनात रुंजी घालत असायची. उन्हाळ्यातील दोन महिने व दिवाळीतील पंधरा दिवस सुट्टीत मजा करून मुंबईला परतत असू. गावातल्या आजोबाआजीला पत्र पाठवित असू. लहानपणीच्या रम्य आठवणी आाताही आजच घडल्याप्रमाणे आठवतात. कायमच्या स्मरणात राहिल्या आहेत. गाव तसाच राहिला आहे पण आवडीची माणसं राहिलेली नाहीत. आजोळाची ओढ मनात एक खास जागा घेऊन राहली आहे. 

 

आजोळ म्हंटलं की मनात असंख्य आठवणी दाटतात, सुरकुतलेल्या हातांचा मायेचा स्पर्श आठवतो. प्रत्येकाच्या मनातल्या एका कप्प्यात आजी आजोबांसोबतच्या क्षणांचा खजिना दडलेला असतो.  कितीही मोठे झालो व शहरात राहिले तरी गावात येऊन तेथील निसर्गाचा अनुभव आपल्याला नेहमी चांगली ऊर्जा आणि काहीतरी नवीन शिकवण देण्याचे काम करत असतो. No comments: