Friday, November 25, 2022

नव्या दोस्तांसह सजली मैफल

 

                                               नवी दोस्ती दापोलीच्यापुढे दाभोळ रस्त्यावर २० किलोमीटरवर आगरवायंगणी या गावाजवळ ’कोकण ट्रेल’ नावाचे मोठे गॄहसंकुल विकसित होत आहे. येथील परिसर व हवामान खूपच छान असल्याने येथे मुंबई व पूण्यामधील निसर्गप्रेमींनी घरे घेतली आहे. काही घरे तयार झाल्याने त्या घराचा ताबा मालकांना दिला आहे. तर काही घरे लवकरच पूर्ण होणार आहेत.


नव्या घरात दिवाळी साजरी करण्यासाठी काही कुंटुंब येथे राहण्यास आली होती. मुंबईतले श्री.बिपीन छेडा, ठाण्य़ातून मी आणि पूण्यातून श्री.शिरीष लिमये व श्री.सचिन शेटे अशी चार कुंटुंब दिवाळीच्या पहिल्या दिवशी तेथे गॄहसंकुलात राहणार होती. अदल्या दिवशी मी व पत्नीने आमच्या गॄहसंकुलाच्या स्वागतकक्षात ’दिवाळी पहाट’ कार्यक्रम करण्याचा बेत आखला. चार कुंटुंबात काय दिवाळी पहाट करणार? पण या वर्षी सुरुवात तर करुया असे आम्ही ठरवले. मी व पत्नीने इतर तीन कुंटुंबाना फोन वरुन दिवाळी पहाटची संकल्पना सांगितली. उद्या सकाळी आठ वाजता स्वागतकक्षात पारंपारीक गणवेषात आपल्या कुंटुंबातल्या सर्व सदस्यासह जमावयचे आहे. गाणी,विनोद, नकला, नाच जे जमेल ते करायचे आहे. शेवटी दिवाळी फराळ फस्त करायचा.असा एक दिड तासाचा कार्यक्रम ठरला. बाजुच्या गावातून स्पिकरची सोय झाली. कार्यक्रम ठरला पण उद्या मडंळी जमतील की नाही याची भिती वाटत होती.


दिवाळीचा पहिला दिवस उजाडला. आम्ही पहिली आंधोळ करून देवाची पुजा करून फराळ घेऊन स्वागतकक्षात पोहचलो. तेथे कोणीच आले नव्हते.प्रथम श्री.बिपीन छेडा पत्नीसह आले नंतर श्री.शिरीष लिमये व श्री.सचिने शेटे कुंटुंबासह जमले. आता आपण छोटासा कार्यक्रम करु  शकतो याची  मला खात्री पटली. सर्वांनी एकामेकांना दिवाळीच्या शुभेछा दिल्या. श्री प्रतिभा लिमये यांनी प्रथम      ’स्वच्छंद निर्मळ वाहतो निर्झर’ हे  गाणं गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. दिवाळीच्या पहाटे थंड वातावरणात प्रसन्न वाटत होते. प्रत्येकाने करमणूक करायचे ठरले. नंतर पत्नीने ’अच्युतम केशवम’ हे भजन घेतले. कुमारी स्मेरा शेटे हिने छान नाच केला आणि माहोल बदलून टाकला. सर्वांना वाटू लागले आपणही काय तरी केले पाहिजे.’जगी ज्यास कोणी नाही’,’आनंदाच्या डोही आनंद तरंग’ अशी बरीच मराठी गाणी झाली. श्रीमती मिनल शेटे यांनी आपल्या मुलीसह सुंदर नाच केला. सर्वांना नाच खूप आवडला. छेडा कुंटुंबियांनी गुजरातीत एक गाणे गायले. श्री.शिरीष लिमये यांनी देखील हिंदीत गाणे गायले. सगळ्याचा उत्साह वाढला होता. आम्ही चार पुरुषांनी ’ये दोस्ती नही तोडेंगे’ हे गाणे गायले. गरबा केला. नंतर मी पत्नीसह ’महाराष्ट्र गीत’ घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. गॄहसंकुलात कामाला आलेले गावकरी आमच्या कार्यक्रमाचे प्रेक्षक झाले होते. फराळ व चहापाणी करून आम्ही आंनदाने आपापल्या घरी परतलो. कार्यक्रमाचे फोटो व व्हिडियो पाठवल्यावर सगळी मंडळी खूष झाली. अगोदर काहीच तयारी नसताना कार्यक्रम छान झाला. 


दिवाळीनंतर एक मोठे ’गेट टुगेदर’ ठरले होते. दिवाळी आपल्या घरी साजरी करून या कार्यक्रमाला श्री.सागर,श्री.दिक्षीत,श्री.दिवेकर व श्री.पार्ले ही कुंटुंब सामील झाली होती. गेम व हौझी झाले. पाणी पुरी,रगडा पॅटीस,शेव पुरी व भेळ असे पदार्थ ठेवले होते.सगळ्यांनी ताव मारुन मजा केली. गेममधली बक्षीस वाटली.       


या दोन्ही कार्यक्रमाने आम्ही सगळे घरमालक व कुंटुंब एकत्र आले. नव्याने ओळखी झाल्या. नवे दोस्त मिळाले. नवी दोस्ती सुरु झाली.  या वर्षाच्या अखेरीस परत भेटण्याची उत्सुकता सगळ्यांनी दाखवली आहे. 


No comments: