Wednesday, January 20, 2021

विश्वचषक जिंकल्याचा आंनद

 


अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा आंनद झाला. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून मालिका जिंकणे हा पराक्रम विश्वचषक जिंकल्याचा आंनद देतो. नवोदितांनी प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिळवलेला हा विजय ऐतिहासिक आहे. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत संघाला नवख्या खेळाडूंनी दिलेल्या लढ्याने विजय संपादन केले हे विशेष आहे. भारतीय संघाने नवोदित खेळाडू आणि दुखापतींचे आव्हान पेलत हा मालिका विजयाचा अध्याय लिहिला.

एकामागून एक येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरं जात त्यांनी ही मालिका जिंकून दाखवली आहे.भारतीय संघाने या मालिकेत संपूर्ण ताकदीनं उतरलेल्या मुरब्बी यजमानांना धूळ चारल्याने हा विजय अविस्मरणीय ठरला.  


ऑस्ट्रेलियाने कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की त्यांचा असा पराभव करीत चांगली जिरवली आहे.ऑस्ट्रेलियाच्या जेष्ठ खेळांडूची भाकित चुकीची ठरली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची लाज काढली होती.भारताच्या युवा संघानं त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केल्याने भारतीय संघाचे कौतुक होत आहे.


भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक केल्याने ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे.ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंसह संपूर्ण मालिका खेळूनदेखील ऑस्ट्रेलियाला पराभव पत्कारावा लागल्यानं खेळांडूना धक्का बसला आहे. कसोटीतील सर्व निर्णायक क्षणाला भारतीय खेळाडूंनी आपला खेळ उंचावला, जे ऑस्ट्रेलियाला जमलं नाही. दोन्ही संघात फक्त हाच फरक होता.भारतीय संघाने कधी ३२८ धावा केशा केल्या ? हा प्रश्न सतावत आहे. 


तशी ही मालिका गाजली. ३६ धावात भारतीय संघ गारद झाल्याने पराभव, भारतीय संघाचे ९ खेळाडू दुखापतग्रस्त, बदली कर्णधाराचे   कुशल व कल्पक नेतृत्व, पुजाराची झुंजार वृत्ती, नवोदीत गोलंदाजांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं, चौथ्या कसोटी सामन्यात संघाचा सांघिक व सकारात्मक खेळ व अनेक विक्रम नोंदवले गेले, नॅथन लायनला भारतीय संघातील खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली संघाची जर्सी खास भेट.


ऑस्ट्रेलियाच्या तीन वेगवान गोलंदाजांनी सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला.स्वत:ची विकेट वाचवताना एक चेंडू पुजाराच्या खांद्याजवळ येऊन आदळला. एक चेंडू तर अतिशय जोरदार उसळी घेऊन थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला. पण अनेकविध फटके अंगावर झेलून पुजाराने अतिशय शांतपणे फलंदाजी सुरू ठेवली. एखाद्या भिंतीप्रमाणे अभेद्य असा तो यजमान संघापुढे उभा राहिला. त्याच्या याच गुणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 


पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतर लढाऊ वृत्ती दाखवत भारताने केलेल्या या पुनरागमनाचे कौतुक अनेक दिग्गजांनी केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इत्यादींनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाला ५ कोटी रुपयांचा बोनस देखील जाहीर करण्यात आला आहे.


 

विजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व नोंदवलेला विजय अविस्मरणीय ठरला आहे .भारतीय युवा संघाने सामना  वाचवायचा नाही तर तो जिंकून मालिकेचा शेवट धडाकेबाज करायचा बेत आखाला आणि सिध्द करुन दाखवले आहे​. याकरीता ’सलाम’ या युवा संघाला.


No comments: