Friday, March 5, 2021

’अतुल’ तु जाऊ नकोस.

मित्राचा सकाळीच फोन आला. आज सकाळी आपला मित्र ’अतुल’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मी ’काय’ असे मोठ्याने ओरडलो. क्षणभर काहीच कळले नाही. अत्यंत धक्कादायक बातमीने काहीच सुचत नव्हते. फोन सारखा वाजू लागला. बातमी खरी आहेत का? अशी विचारणा होत होती. कोणाला विश्वास बसत नव्हता. 


अतुल हा माझा मित्र. मी वडाळ्याला कॉलनीत राहायला होतो तेव्हापासूनची आमची ओळख. मस्त देखणा व रुबाबदार व्यक्तिमत्व. अतुल, मुंबई पोर्ट ट्रस्टला माझ्या नंतर नोकरीला लागल्यावर आमची मैत्री आणखी वाढत गेली.त्यानंतर त्याचा लहान भाऊ ’अभय’शी ओळख झाली. दोघेही उंच व भारदस्त शरीरयष्‍टीचे मोटर सायकलने कामावर यायचे. या दोघांची आई देखील मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये काम करीत होत्या. त्यामुळे या दोघांची सर्वांशी लवकर ओळख झाली. कामात दोघेही हुशार होते. आई सेवानिवृत झाल्यावर कॉलनीतून अभय दादरला व अतुल ठाण्याला राहायला गेला. अतुल ठाण्याला आल्यानंतर रेल्वेत नेहमी भेट होत गेली. अतुल बरोबर काही सहली झाल्या.  


लहान भाऊ अभयचे आजारात निधन झाल्यावर त्यांच्या कुंटुंबावर मोठे संकट कोसळले.अभय नंतर अतुल व त्यांचा लहान भाऊ अनिकेत यांनी कुटुंबाला सावरले. काही दिवसाने आई आजारी झाली.अतुलने आईला ठाण्याला आणले होते.अतुल ऑफिसला गेल्यावर अतुलची पत्नी व आई दोघी घरी असायच्या.   


अतुल च्या निधनाची बातमी ऑफिसमध्ये गेल्यावर जवळच्या मित्रांनी ठाण्याच्या दिशेने धाव घेतली.सर्वांना दु:ख झाले होते.अंतिम दर्शनासाठी नातेवाईक जमत होते. घरी जाऊन त्याच्या भावाला व अतुलच्या पत्नीला भेटलो.त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. सांत्वन करणे शक्य नव्हते. सर्व कुंटुंबीय कालच रात्रीच सहलीहून परतले होते. सहलीत मजा करून घरी परतले होते आणि लगेच दु:खात गेले.   


सर्व नातेवाईक जमल्यावर अंतिम तयारीला वयस्कर मंडळी लागली. अतुल पार्थिव देहाला खाली आणण्यात आले.विधी झाल्यावर सगळ्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी अतुलची आई गॅलरीतून सर्व पाहत होती. प्रेतयात्रा सुरु झाली. त्यावेळी ती ’अतुल तु जाऊ नकोस’ अशी म्हणत होती. काय वाटले असेल त्यावेळी त्या माऊलीला? माझा अतुल मला आता परत दिसणार नव्हता. माझी दोन्ही मुलं मला सोडून गेली, हे दु:ख तिला सहन करणे कठीण होतं.   

No comments: