Monday, June 14, 2021

चहाची तलफ

 


चहाची तलफ


" चहाला वेळ नसते .... पण वेळेला चहाच लागतो "  


पाणी, चहा पावडर, साखर व थोडेसे दुध यांना उकळल्यानंतर बनतो ’चहा’  


चहाची वेळ नसते हो.... चहाची तलफ असते..... मग येताय ना तुमची चहाची तलफ भागवायला.


वाफाळत्या गरमागरम अशा चहाचे तुम्ही दिवाने असालच!  दिवसाची सुरवातच एका मस्त चहाने होत असेल. दिवसभरातही अध्येमध्ये चहाचा आस्वाद घेऊन तुम्ही तुमचा कंटाळा आणि मूड ठिक करत असाल. सकाळी सकाळी गरमागरम चहा कपात घेऊन फुरकी मारत वर्तमानपत्र चाळणे म्हणजे स्वर्गानंद घेण्यासारखे आहे.  बाहेर मस्त मुसळधार कोसळणारा पाऊस, जोडीला धुक्याची अलवार पखरण अशा वातावरणात हमखास आठवणारं पेय म्हणजे ग्लासातला चहा. 


आज चहा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे.चहा म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखं असतं. चहाविना जगणे अशक्य होईल अनेक लोकांना इतकी सवय असते.आपण चहा आपल्या ताणतणावाला कमी करण्यासाठी पीत असतो. बरेच लोक थंडीच्या काळात आपली थंडी पळवण्यासाठी चहाचा वापर करत असतात. दिवसाच्या कुठल्याही वेळी आणि कुठेही अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या चहाचे हमखास ठिकाण म्हणजे गल्लीतील टपरी.घरी आलेल्या पाहुण्यांना चहापान देऊन संतुष्ट केल्यावर पुढची बोलणी वा सोपस्कार पटकन पार पडतात. चहाचा अतिरेक आरोग्याला हानीकारकही आहे.




चहा म्हणजे दोन मनांना एकत्र आणणारा दुवा होतो कधी कधी.समोरच्यासोबत चहा पिता पिता आपण खूप साऱ्या गप्पा मारतो. एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी भेटली कि " चल , कुठेतरी बसून मस्त चहा पिऊ आणि गप्पा मारू. " हे वाक्य अगदी ठरलेले असते. चहा फक्त बहाणा असतो , तो  वेळ असतो जो आपल्याला समोरच्यासोबत घालवायचा असतो. 



लहानथोर, गरीब व श्रीमंत अशा सगळ्यांनी आपलंसं केलेला, माणसं जोडणारा, भूक भागवणारा, कधी भूक मारणाराही, नेहमीच्या टपरीवाल्याकडे कटिंग बनून येणारा आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नजाकतीने ’कस्टमर’ समोर ‘प्रेझेंट’ होणारा... हे समस्त गुणविशेष मिरवणारा चहा हे जगात पाण्याच्या खालोखाल प्यालं जाणारं पेय आहे.



अनेक ठिकाणी खेडेगावांमध्ये गुळाचा चहा करतात, तो खमंग लागतो.तो पेल्यातून दिला जातो.  ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या बागेत तुम्हाला गवती चहा ही औषधी वनस्पती सापडेल.गवती चहा  औषधी समजला जातो. गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो, ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. मागे रेल्वेच्या प्रवासात कुल्लड्मध्ये चहा दिला जात होता.त्या चहाला भाजलेल्या मातीचा स्वाद येत होता. 


चुलीवरचा धुरकटलेला चहा, कमी दुधाचा किंवा बिगरदुधाचा काळा चहा, गुळाचा किंवा कमी साखरेचा कमी गोड चहा! साखरेचा चहा अभावानेच मिळे. बहुदा गुळाचाच चहा घ्यावा लागे, पण त्या चहात प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा गोडवा भरपूर असे. सुटाबुटातील पाहुण्याने आपल्या घरचा घोटभर चहा घेतला तरी गावाकडील माणसे कृतकृत्य होत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.


आधुनिक काळात ग्रीन टी, लेमन टी असे चहाचे कितीतरी प्रकार आढळतात. गरम पाणी वा दुधात चहापत्तीचे छोटे पॅकेट बुडवून (डीप करून) झटपट चहा बनवला जातो. चहा-कॉफीची यंत्रेही आली आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या चहाची चवच न्यारी!


दैनदिन जीवनात चहाचं महत्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जगभर २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात आहे.


तर चला मग चहाचा अस्वाद घेत आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करुया ,येताय ना !

No comments: