मुलीचं सहजसुंदर निखळ हास्य मी पाहताच तीचे फोटो काढत राहिलो. निखळ व निरागस हास्य किती गोड दिसतं याचा मला त्यावेळी प्रत्यय आला. तिचे मोहक, लोभस हास्य. जशी हवेची मंद झुळूकच. सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक सुंदर, निरागस व मनमोहक मुलगी आंनदात झोपाळ्यावर बसून हळुवार झोके घेत होती. चेह-यावर हलकसं स्मित उमटल्याने सुंदरता अधिक वाढली होती.चेहर्यावरील हास्य ही निसर्गाने मानवाला दिलेली एक अनमोल व सुंदर देणगी आहे,याचा प्रत्यय आला. लहान मुलांना झोका घ्यायला खूप आवडते. तेथे आजुबाजुला दुसरी कोणी दुसरी मुलं नसल्याने ती शांतपणे झोका घेत स्व:तात रमली होती. बाकीच्या जगाचा जणू तिला विसर पडला होता. झोका घेताना ती स्वत: आंनदात दिसत होती. ती तिच्या खुशीत रमली होती. थंडगार हवेची झुळूक अंगावर घेत झोका घेण्यात सुखावली होती. तेव्हा तेथील वातावरण देखील प्रसन्न वाटले होते. बोलक्या डोळ्यांनी मोकळ्या मनाचे हितगुज साधत होती. जणुकाय स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी. तिच्यात अवखळपणा दिसत नव्हता. प्रत्येक झोक्यासह तीचे हास्य फुलत होतं. तिचे गोड स्मित बघत राहावेसे वाटत होतं. तिचे ते बोलके हास्य व चेह-यावरती कोमलता पाहून ती फुलांसारखी नित्य उमलावी व स्वच्छंदी बागेत बागडावी असे वाटलं. तीचे ते बालपणीचे सुंदर क्षण डोळ्यात साठवूनी ठेवावेत असे झालं होतं. तिला त्यावेळी पाहून कवीला नक्कीच कविता सुचली असती.
निखळ,निर्मळ हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. हास्य हा मनाचा आरसा आहे. चेहऱ्यावर निखळ हास्य हीच तर आहे खऱ्या माणसाची ओळख असते.हसणारे चेहरे स्वत:सह इतरांचे चेहरेदेखील हसरे करून जातात, मने हलकी करून जातात.एका हास्याने समोरच्याचे हृदय जिंकता येते, मनातील मळभ दूर करता येते, मैत्रीचा हात पुढे करता येतो, शत्रूशी वैर संपविता येते, मनावरील ताण हलका करता येतो, अनेक मानसिक आजारांना दूर पळवून लावता येते अशी हास्याची महिमा सांगणारे गुण सर्वपरिचित आहेत. कदाचित म्हणूनच सर्वांनी हसलं पाहिजे.हसल्याने आयुष्य वाढत असल्याने कायम हसत रहा.
No comments:
Post a Comment