Friday, October 9, 2020

प्रामाणिकपणाचा धडा

                 १० ऑक्टोंबरच्या महाराष्ट्र टाईम्सच्या पुरवणी मध्ये प्रसिध्द झालेला माझा लेख. 

आज सकाळी घरात काम करणा-या बाई खूप दिवसांनी आम्हाला भेटण्यास आल्या. ’मला बिनकामाचे पैसे देऊ नका’ असे त्या स्पष्ट सांगू लागल्या. घरातले आम्ही आश्चर्यचकीत झालो. आम्हाला वाटले आमचं काहीतरी चुकलं. ’मी आपल्याकडे मार्च महिन्यापासून काम करीत नाही तरीही तुम्ही मला सप्टेंबर महिन्यापर्यत दर महिन्याला पगार देत आहात. मी आता ब-याच जणांकडे काम सुरु केले आहे.  त्यामुळे माझ्या पैशाचा प्रश्न सुटला आहे. आता मला काम न करता पैसे घेणे पटत नाही. मी जेव्हा तुमच्याकडे काम सुरु करेन तेव्हापासून मला पगार द्या.’ असे तिचे म्हणणे होते. त्यांच्या या विचाराने आम्ही प्रभावित झालो.

माझी कामे बंद झाल्यावर काहीनी मला दोन तीन महिने पगार दिला नंतर त्यांनी पगार देणे बंद केले. त्यावेळी मला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. मला तुमच्याच पगाराचा फक्त आधार होता. ही मदत मी कधीच विसरणार नाही. मिस्टरांचे काम देखील बंद पडल्याने पगार येत नव्हता. दोन मोठी मुलं अशा कुटुंबाचा भार माझ्यावर एकटीवर होता.घराबाहेर पडण्यास भीती व पोलिसांचा धाक होता. कोणतीच कामे करु शकत नव्हते. मोठ्या अडचणीत सापडली होते. देवाच्य कृपेने आता माझे कुटुंब स्थिरावले आहे. त्यांचा संकटाकाळातील प्रवास ऐकून सत्यनिष्ठ, प्रामाणिक माणसं कामाच्या ओझ्याने दबून जात नाही,याचा प्रत्यय आला.

घरात काम करणा-या सामान्य बाई, गरीब असून देखील त्यांना स्वाभिमान आहे. बिनकामाचे पैसे कसे घ्यायचे? त्यांना हे चुकीचं वाटत होते. त्यांनी जर ही विनंती केली नसती तर आम्ही नियमित पैसे देत त्यांना मदत करीत राहीलो असतो.आम्ही केलेल्या मदतीचा गैरफायदा न घेण्याच्या त्यांच्या मानसिकतेने भारावून गेलो. या विंनतीच्या मागे त्यांचा चांगला हेतू दिसला. समाजात गरीब माणसं आहेत पण प्रामाणिक देखील आहेत. सकारात्मक विचारसरणीने त्यांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वेडेवाकडे वळण समर्थपणे पार करण्याची ताकद मिळत असेल.          

करोनाच्या संकटात त्यांना आमच्या मदतीची गरज असेल या करीता त्यांच्याकडून कोणत्याही मदतीच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता  निस्वार्थ भावाने आम्ही त्यांना मदत करीत होतो. आपण लावलेल्या छोट्याशा हातभाराने इतरांची अडचण दूर होऊ शकली, हे समाधानही फार मोठे असते. त्यांच्या प्रामाणिक विचारामुळे आमचे समाधान दुरावले गेले.  

कोरोनाच्या काळात एका सामान्य बाईकडून चांगली शिकवण मिळाली.सकारात्मक विचारांमुळे माणसाच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन होऊ शकते.सकारात्मक विचारांचा पाया असणारी व्यक्ती स्वत:बद्दल कायम जागृत असते. स्वत:च्या गुण-दोषांबद्दल तिला जाणीव असते. स्वत:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी महत्त्वाची असते. सकारात्मक विचारांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारसरणी असणारी सृजनशील माणसे समाजात आपले योगदान प्रभावीपणे देऊ  शकतात.

आम्ही निर्णय घेतला आहे. त्यांचा स्वाभिमान न दुखवता त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले.


No comments: