Friday, October 2, 2020

मास्क

 मास्क



रोगाच्या साथींनी जगाला शिकवलेला सर्वांत महत्त्वाचा धडा म्हणजे मास्कचा वापर. व्हायरसपासून स्वत:चा बचाव होण्यासाठी आणि आपल्यापासून दुसऱ्या कोणाला संसर्ग होणार नाही यासाठी वापरला जातो .सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये, वाहनांत मास्क वापरणे बंधनकारक झाल्रे आहे.घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर केला नाही तर गुन्हा दाखल होतो व दंड भरावा लागतो. बाहेर जाताना जवळ वापरण्यांच्या वस्तूंमध्ये मास्कची नव्याने भर पडली आहे. तसेच मास्कला जपावे लागते आहे. मास्कमुळे घराबाहेर तुमचे तोंड बंद झाले व तुमची ओळख राहीलेली नाही. रस्त्यावरुन जाताना प्रत्येकांच्या चेह-यावरचे मास्क पाहून थोडे विचित्र वाटते. प्रत्येक जण दुस-याकडे  संशयित नजरेने पाहत असतो.दुस-यांना टाळतो व दूस-यांपासून दूर राहतो. 


मास्क वाप-यातून कोणाची सुटका झाली नाही. पंतप्रधान ते सामान्य नागरिकापर्यत सर्वाना वापरण्याची गरज आहे.श्रीमंत व गरीब, स्त्री व पुरुष, तरुण व वयस्कर, नेते वे कार्यकर्ते, नट व नट्या, डॉक्टर व परिचारीका, पोलीस व सफाई कामगार यातील कोणालाही मास्क न वापरण्याची मुभा नाही.बोलायला लागलेल्या लहान मुलांची मास्क लावून बोलती बंद केली आहे.चष्मेधा-यांना तर या मास्कचा बराच त्रास सहन करावा लागत आहे. मास्कमुळे संवाद साधताना अनेक अडचणी येतात.चेहऱ्यावर मास्क असल्याने समोरच्या व्यक्तीला नेमके  काय सांगायचे आहे हे लक्षात येणं अवघड जातं. अशावेळी समोरच्याकडून पुन्हा एकदा झालेल्या संवादाबद्दल खात्री करून घेतली पाहिजे. मास्क असल्याने लिपस्टिक कितीही आवडत असली तरी त्याचा उपयोग नाही हे मुलींना कळून चुकलंय.


काही जण फक्त पोलिसांची भीती किंवा बाहेर पडताना मास्कची सक्ती ह्याच विचारांनी मास्क वापरत असताना दिसतात. मास्क फक्त देखावा म्हणून घालतात, किंबहुना बाहेर अनेक जणांच्या गळयाभोवती हे मास्क लटकलेले दिसतात. क्वचितच कोणाचं लक्ष गेलं, किंवा उगाच रोखून पाहिल तर हा ‘मास्क’ लोक वर उचलतात, आणि पुन्हा मग पहिले पाढे पंचावन्न. लोकांना मास्कचे खरे महत्व किती समजले आहे का ह्यावर आजही प्रश्न चिन्ह आहे. लोकांनी स्वतःच्या आरोग्यासोबत इतरांचा देखील विचार करणं महत्वाचं आहे. जेव्हा मास्क न घालता बाहेर पडता, तेव्हा स्वत: बरोबर इतरांनाही अडचणीत आणता.


बाजारात आणि ऑनलाईन मास्कमध्येही विविधता दिसून येत आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळत आहेत. स्त्रियांसाठी आता प्रत्येक ड्रेसला मॅचिंग असलेले रंगीत मास्कही मिळू लागले आहेत.बाजारात ह्या नव्या वस्तुची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. संपूर्ण जगभरामध्ये कोरोनानं घातलेला धुमाकूळ पाहिल्यानंतर मास्क किती महत्वाचा आहे, याची जाणीव झाल्यानंतर या मास्कची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी मास्कची किंमत अव्वाच्या सव्वा वाढवली आहे.  


लोकांची गरज लक्षात घेऊन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचतगटाना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.राज्यातील बचतगट पुढे आले आणि त्यांनी तयार करण्याचे काम सुरु केले.या कामातून घरात बसून राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार उपलब्ध झाला.हे आपत्तीच्या काळातील सर्वात मोठे यश आहे. वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहेत. एवढेच नाही तर शिस्तीत मास्क बांधणाऱ्या ब्रिटिशांना आता हा मास्क संरक्षक ठरत आहे.रोजगार गमावलेल्या काळात खादीने रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला आहे.


मास्कला मराठीत ’मुखनाक संरक्षक जीवजंतूरोधक हवागाळ झाकोळ पट्टी’ असे मजेत म्हणतात.    


मास्क वापरुन माणसं कंटाळली आहेत. चेह-यावरून हा मास्क कधी उतरवला जाणार याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. मास्क पासून कधी रे सुटका होणार? ज्या दिवशी ही सुटका होईल तो दिवस सगळ्यांसाठी खुपच आंनदाचा असेल.



No comments: