Monday, August 20, 2012

दाता न मिळाल्याने निधन

   महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.विमानतळावर लोकांची प्रचंड गर्दी लोटली होती. विमानतळ ते बाभळगाव हे १५ किलोमीटर अंतर कापण्यास सुमारे तीन तास लागले. विमानतळ ते बाभळगाव रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड संख्येने लोक आपल्या नेत्यास मानवंदना देण्यास उभे  होते.विलासरावांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पाच किलोमीटरपेक्षा अधिक अनेक रांगा होत्या. अंत्यदर्शनास प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्यामुळे पोलिसांना काही काळ सौम्य लाठीहल्ला करावा लागला.घरातच दूरदर्शनच्या समोरून न उठणारेही लाखोंनी होते.देशातले जेष्ट नेते बाभळगावात आले होते.पंतप्रधानांपासून ते रोजंदारीवर काम करणा-या मजुरापर्यंत सर्व थरातील लोकांचा ओघ विलासरावांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आले होते.

     विलासरावाना वेळीच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्राक्रिया झाली असती तर सर्वाना हवेहवेसे वाटणारे विलासराव आज  आपल्यात असते.अंत्यदर्शनासाठी मोठा जनसमुदाय जमला होता.पण या जनसमुदायातला त्यांच्या एकाही समर्थकाने ( ( दाता ) यकृत देण्याची तयारी दाखवली असती तर ते वाचू शकले असते.ही शोकांतिका आहे.आधुनिक विज्ञानाच्या मदतीने रुग्णाला जीवनदान मिळणे शक्य असतानाही केवळ अवयव मिळत नाही म्हणून जिवास मुकणा-यांची संख्याही मोठी आहे.पण गरजवतांना हे अवयव मिळाल्यास त्याना नवीन जीवन मिळते.

       असाध्य आजाराने , अपघाताने किंवा अन्य कारणाने माणसाच्या शरीरात निकामी झालेले हृदय , यकृत , मूत्रपिंड , यासारखे मोठे अवयव किंवा हृदयाच्या झडपा , नेत्रपटल किंवा त्वचा यांचे प्रत्यारोपण करून संबंधिताला नव्याने आपले जीनव जगण्याची संधी देणारे हे तंत्र आयुर्विज्ञानाने विकसित केले आणि मानवी जीवनातच क्रांती घडवून आणली .


       आधुनिक विज्ञानाने केलेल्या प्रचंड प्रगतीमुळे खरेतर असाध्य आजारांवरही उपचार होऊन मानवी जीवन वाचविणे शक्य झाले आहे. आज जगभरात हृदय, फुफ्फुस, यकृत तसेच मूत्रपिंडासह अनेक अवयवांचे प्रत्यारोपण केले जाते.बहुतेक वेळा अवयव मिळण्याच्या बाबतीत अनेक अडचणी उद्भवतात.राज्यात तसेच देशपातळीवर आरोग्य यंत्रणेच्या उदासीनतेमुळे कॅडेव्हर दात्यांची संख्या अत्यल्प राहिली आहे. काही डॉक्टरांनी पैशाच्या लालसेपोटी अवयव विक्रीचे केलेले उद्योग. भ्रष्टाचार जसा समाजाच्या सर्व क्षेत्रात पसरला आहे तसाच तो वैद्यक क्षेत्रातही पसरल्यामुळे त्याचा फटका रुग्णांना मोठय़ा प्रमाणात बसत आहे. देहदानाची इच्छा व्यक्त होते पण मृत्यूनंतर नातेवाईकांकडूनच त्याला विरोध होतो.

       समाजात जागृती करणे आवश्यक आहे.आपल्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतरही तिचा समाजाला उपयोग होऊ शकतो,ही धारणा समाजमानसात रुजायला हवी.हव्या  त्या प्रमाणात अवयवदाते मिळत नसल्याने अनेक रुग्ण वेदनामय जीवन जगत आहेत.अवयवांची निकड आणि त्यांची उपलब्धता यांचं प्रमाण व्यस्त आहे.देहदान,नेत्रदान,अवयवदान, त्वचादान याची नितांत गरज आहे.त्यासाठी लोकजागृती हवी.

      देहाचे खरे मोल स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात आहे.

No comments: