Wednesday, November 14, 2012

बाळासाहेब लवकर बरे व्हावेत.


 माराठी माणसाचे लाडके  व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरे ह्ल्ली आजारी असल्याच्या बातम्या येत आहेत.मराठीतले प्रतिष्ठित व महाराष्ट्रातील राजकारणी त्याना भेटण्यास जात आहेत.आजारी असूनही त्यानी मराठी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.ते लवकरच बरे व्हावेत.महाराष्ट्राला बाळासाहेबांची गरज आहे.
 
 बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक आहेत.मराठी माणसावर त्यांचे प्रेम असल्याने ते मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी झटले.मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली.माणसावर होणा-या अन्यायाला मार्मिकने वाचा फोडली.इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.

 हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले.स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.

 जय महाराष्ट्र...जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो अशा आपल्या चिरपरिचित आवाजात साद घालतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांशी चित्रफितीद्वारे दसरा मेळाव्याचा संवाद साधला.

राजकारण्यांचे राजकारण संपून जाते.पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे आहेत.या आजाराला सामोरे जात त्याच्याशी सामना करीत ते लवकर बरे होतील.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे,कसाबला फाशी व्हावी,पाक दौरा नको व सुलोचनाताईना पद्म्श्री देण्यात यावी ही त्याची मते ते कायम मांडत आले आहेत.

सातत्याने बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी शिवसैनिकांना लागलेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जिवापाड प्रेम करण-या शिवसैनिकांच्या शुभेच्छांमुळे त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक असे नाव ज्याच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास यापुढे लिहला जाऊ शकत नाही.महाराष्ट्राचा गेल्या पाच दशकांचा इतिहास लिहायचा झाल्यास, बाळासाहेब ठाकरे ही आठ अक्षरे टाळून पुढे जाताच येणार नाही.

मराठी माणसानीही बाळासाहेबांवर मनापासून प्रेम केल्याने त्याची सोबत कायम हवी आहे.

No comments: