Friday, November 30, 2012

अर्भकांची चोरी


         कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यातून जंगम मालमत्ता तिच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे नेण्याकरिता हलविली, तर त्या कृत्यास कायद्याच्या परिभाषेत चोरी म्हणतात.दुस-याची वस्तू आपली करणे म्हणजेच चोरी.  जकात चोरी ,पैशाची चोरी,जमिनीची चोरी,मौल्यवान वस्तुची चोरी,विजेची चोरी,गुणांची चोरी,कलाकृतीची चोरी, काव्या व लेखनाची चोरी, मोनोग्रामची चोरी ,वाळू चोरी,करांची चोरी,वाहनांची चोरी,मोबाईलची चोरी,गाण्याची चोरी,माहितीची चोरी ,इंधन चोरी,चंदनाच्या झाडांची चोरी,संगीताची चोरी,पाण्याची चोरी,धान्याची चोरी अशा चो-या सुरु आहेतच . त्या आता लहान मुलांच्या चो-या.चोरीच्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमध्ये तशा नेहमीच वाचतो. कोणाचे मंगळसूत्र ओढले, कोणाची सदनिका फोडली वगैरे आणि वगैरे. कधीमधी बॅंकांच्यावर डाके पडतात, दुकाने फोडली जातात.सर्वच माणसे कसली तरी चोरी करीत असतो.सगळीकडे चोरीच्या घटना होतच असतात.चोर चोरी करतो त्याच्या गरजेसाठी पण चोरीने नुकसान होते मालकाचे.चोरी पकडली गेल्यास चोराला शिक्षा होते पण चोरलेला माल मिळेल का याची खात्री नसते.

                    दागदागीने,मौल्यवान वस्तू व पैशाची नेहमीच चोरी होतात. घरात,रस्त्यावर,देवळात,बँकेत  ह्या चो-या पैशासाठी होतात.पुराणकाळापासून चो-या होत आहेत.पण आताच्या युगात माणसाच्या चो-या होत आहेत.मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये नवजात अर्भक चोरीला जाण्याची घटना घडू लागल्या आहेत.काही महिन्यांपूर्वी सीएसटीत पाच वर्षांच्या मुलीला पळवून नेले.तिचे पालक स्थानकावर झोपले होते आणि ती चिमुरडी बाजूला बसली होती. काही पैशासाठीच या लहान मुलांच्या चो-या हल्ली वाढल्या आहेत.ही मुलं का पळवली जातात? त्यांना  भिक मागायला लावतात, त्याना विकतात,वाईट मार्गाला लावतात,परदेशात पाठवतात व कामे करुन घेतात,बळी देतात. हा मानवी व्यापारच असतो..

                अपत्य नसल्याने अर्भकांची चोरी होते.नरबळीसाठी रुग्णालयातून अर्भकाची चोरी होते. एखाद्या कुटुंबात होणारा बाळाचा जन्म हा त्या कुटुंबासाठी अतिशय आनंददायी अनुभव असतो. पण हा आनंद हिरावून घेणार्‍या, जन्माला आलेलं बाळ पळवून नेणार्‍या प्रवृत्ती समाजात वाढत चालल्या आहेत.

                      रुग्णालयात बाळचोरी करण्यापूर्वी, संबंधित महिला या प्रसूत झालेल्या महिलांना हेरतात. जसे की, ती एकटी आहे, गरीब आहे. जन्मलेले बाळ मुलगा आहे. एकदा चोरी करणार्‍या महिलेला प्रसूत झालेल्या महिलेची पूर्ण माहिती मिळाली की, मग ती बाळाच्या आईशी मैत्री करण्याचा प्रयत्न करते. मग ती तिला तिच्या विविध कामांत मदत करते. तिला बाथरूमला घेऊन जाते. तिचे कपडे धुते. त्यामुळे बाळाच्या आईचाही त्या महिलेवर विश्वास बसतो. हा विश्वास बसल्यामुळे अशी प्रसूत माता स्वत:च्या बाळाला तिच्या जबाबदारीवर सोपवून बाथरूमला जाते किंवा झोपून जाते. याचाच फायदा उठवून चोरी करणारी महिला बाळाला घेऊन पळून जाते. बाळचोरी होण्याचे प्रकार हे पहाटे किंवा रात्रीच्या वेळी होत असतात.

                    बाळचोरीच्या या प्रकरणामुळे जन्मानंतर अर्भकाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बाळाला त्याच्या आईजवळ ठेवणेच बंद करायला हवे. नुकतीच जन्मलेली बाळे त्यांच्या मातांच्या जवळ न ठेवता दुसर्‍या कक्षात नर्सरीमध्ये ठेवण्याची व्यवस्था असली पाहिजे. त्यांची ओळख पटण्यासाठी बाळाच्या पायात आणि आईच्या हातात ब्रेसलेट घालता येणे शक्य आहे. जेणेकरून आईला बाळाची अचूक ओळख पटवणे शक्य होईल. जेव्हा बाळाला दूध पाजायचे असेल तेव्हा ती आई नर्सरीमध्ये जाईल आणि दूध पाजेल. मात्र, मातेव्यतिरिक्त इतर कोणाच्याही संपर्कात हे बाळ येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. 

                    साधारणपणे रुग्णालयात बाळाला पाहण्यासाठी नातेवाईकांसह शेजारी-पाजारीही येत असतात आणि अतिशय नाजूक असलेल्या त्या बाळाला अयोग्य पद्धतीने हाताळत असतात. ओंजारून, गोंजारून गालाला हात लावत मुके घेत असतात. यामुळे बाळाला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाळ आणि माता यांना स्वतंत्र ठेवणे ही गरज आहे. मुळात एक लक्षात घ्यायला हवं की, यामुळे रुग्णालयातील अनावश्यक रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी कमी होऊन त्यांच्यामुळे होणार्‍या अस्वच्छतेचे प्रमाण कमी होईल. 

                       सुरक्षा व्यवस्थेवरचा ताणही यामुळे कमी होऊ शकेल. शेवटी बाळ आणि माता यांच्या सुरक्षेबरोबरच आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे अशी उपाययोजना राबविणे अतिशय आवश्यक आहे.नवजात अर्भकाच्या चोऱ्यांविषयी कसून चौकशी केली जावी.


No comments: