Monday, March 25, 2013

गावाकडली माणसे



       काल मुंबईतल्या लोकलने माझा प्रवास सुरु झाला.गर्दी होती. पुढच्या स्टेशनला दोघे गाडीत चढले व माझ्या समोर येउन उभे राहीले.मी पेपर वाचत होतो.गाडी सुरु झाल्यावर त्या दोघाच्या गप्पा सुरु झाल्या.त्याच्या बोलण्यातून ते खुप दिवसानी भेटलेले वाटले.

  दोधेही मालवण पट्ट्यातील एका गावातले होते.मालवणी भाषेत त्यांचा संवाद सुरु होता.त्याचा संवाद ऐकायला बरे वाटत होते.मुंबईला नोकरी करीत गावातली कामे करणारे हे दोघे होते.त्याच्या बोलण्यात गावातलेच विषय होते.सुरुवात घरातून झाली.घरासाठी वासे जमविणे,घरासाठी कौले कोणती टाकायची,वणव्यात जळलेली कलमे व गवत, विहीरीतील पाण्याची टंचाई,देऊळातील देवाच्या मुर्त्या,माडावर चढणा-या उंदंरांचा त्रास,त्यावर झाडाला पत्रा लावण्याचा उपाय,होळीच्या सणाचे धुळीवंदन,कोणा नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नाची बोलणी, शेतीची कामे असे त्यांच्या चर्चेचे  विषय बदलत होते. मी पेपर वाचायचे सोडुन डोळे मिटून त्यांच्या गप्पा ऐकत बसलो होतो.

    त्यांचा संवाद ऐकून मी गावात असल्यासारखे वाटत होते.मनाने मी गावात फिरत होतो.माझ्या डोळ्यासमोर माझा गाव येत होते.जवळच्या नातेवाईकाच्या निधनाबद्द्ल बोलल्यानतंर थोडा ते दोघे गप्प होते.

काही स्टेशनानंतर त्या दोघाना बाजुलाबाजुला बसायला मिळाल्याने गप्पाना रंग आला.


थोड्यावेळाने गावातील कोणत्यातरी भांडणाच्या विषयावरून पुन्हा संवाद सुरु झाला.मला बरे वाटले.गावातील भटकत्या गुरांबद्दल गावात भांडणे वाढली आहेत.गावात लोक जागा विकत आहेत याबद्द्ल त्याना चिंता व्यक्त केली.तसेच दारु पिण्याच्या वाढत्या व्यसनाबद्द्ल काय करायचे त्याना कळत नव्हते.गावात डाँक्टर नियमित येत नसल्याने औषधोचार करण्यास लांब जावे लागण्याच्या समश्येला काही उपाय शोधले पाहिजेत असे त्यांचे म्हणणे होते.

त्यांच्या परिचयाचा एक गृहस्थ त्याना दिसला लांब बसलेला होता.त्याला त्यानी जवळ बोलवले पण त्याला पुढच्या स्टेशनावर उतरायचे असल्याने तो त्यांच्याजवळ आला नाही.

येणा-या पावसाचा अदांज घेत कोणते पिक घ्यायचे याची चर्चा केली.एकामेकांच्या तब्तेतीची व आजाराची विचारपूस केली.

रेल्वेच्या प्रवासाचे आरक्षण मिळत नसल्याने गावाकडे जाण्य़ाच्या फे-या कमी झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरून कळले. 


गावातल्या जत्र्येला जाण्याची दोघांची बोलणी झाली.दोघानी एकमेकाचा निरोप घेत ते बोलत बोलत गाडीतून खाली उतरले.मी पण पुन्हा जागेवर आलो.माझी तयारी करून मी गाडीतून उतरून आँफिस गाठले. तो दिवस माझा छान गेला.अशी गावाकडली माणसे भेटली की ताजेतवाने होता येते.

दुस-या दिवशी मी त्या दोघांची वाट पाहत होतो.ही मडंळी रोज भेटावीत असे वाटत होते.