मोठा आधार
लॉकडाऊनमधला सर्वात मोठा आधार हा मोबाईल आहे.मोबाईल संवादाचं महत्वाचं साधन बनलं आहे.तो जर जवळ नसता तर हा लॉकडाऊनचा कालावधी संपता संपला नसता.सकाळी चार्जींगला लावण्यापासून रात्री झोपेपर्यत कायम साथ असते.मोबाईलमुळेच लोकांना घरात राहणे शक्य झाले.मोबाईल नसता तर काय केले असते याची कल्पना करणे कठीण आहे.वेड लागले असते.प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार मोबाईलचा वापर केला आहे.मोबाईल ही चैन नसून आता गरज बनली आहे.कधी काळी चैनीची वाटणारी वस्तू आता जीवनावश्यक बनलीय.तसेच नुसतं मोबाईल असून चालत नाही तर त्यात नेट देखील असावे लागते.हल्ली तर अतिवापरामुळे दिवसातून दोन वेळा चार्ज करावा लागत आहे. गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन पहायला मिळतो.मोबाईल हे एक प्रकारचे व्यसन लागले आहे.मोबाईलमुळं जग जवळ आलं आहे.
तळहातावर राहील अशा मोबाईलच्या जादुई पेटीत खुप खजिना भरलाय. इंटरनेट, रेडिओ, गाणी, बातम्या , कँलक्युलेटर, घड्याळ, जीपीएस्, कँमेरा... माझ्यात काय नाही ! असं बरच काही असत त्यातल काही गोष्टी तुम्हाला माहीतही नसतात.तरीही मोबाईल मुख्य संपर्काचे साधन असल्याने त्याला प्रत्येकाने जपले आहे.सोशल मीडियावर सक्रिय असणे,मेसेज करणे,वृतपत्र वाचणे,संगीत ऐकणे,नाटक व सिनेमे पाहणे,गेम खेळणे,बातम्या पाहणे,रेसेपी पाहणे,मुलांचं शिक्षण,बॅकेची कामे ,ऑफिसची कामे ,एकत्र ऑनलाईन गप्पा मारणे, किराणासामान व खाण्याची वस्तू मागवणे अशी अनेक कामे करण्याचे एक छोटे उपकरण म्हणजेच मोबाईल.प्रत्येकाला मोबाईल फोनची इतकी सवय झालेली आहे की तो आपल्याजवळ नसला तर ‘एकटे’ असल्यासारखे भासते.
दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या स्मार्टफोनचे आजच्या काळात अनेक उपयोग होतात.सुरुवातीच्या काळात केवळ संवादाचं माध्यम म्हणून मोबाईल फोनचा वापर केला गेला.बदलत्या काळाबरोबर मोबाईल फोनही बदलला आणि आता तो स्मार्ट बनला आहे.संवाद साधण्याबरोबच इंटरनेट,फोटो,जीपीआरएस,व्हीडिओ कॉलिंग,मनोरंजन असं सगळं काही मोबाईल फोनमध्ये सामावलं गेलं. मोबाईल फोनवर इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे शिक्षण, आरोग्य,कला,तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रासाठी मोबाईल फोनला महत्वाची भूमिका बजावत आहे. मोबाईल फोनमुळे आवघं जग मुठीत आलं असून भविष्यात मानवाच्या विकासात त्याचं महत्व आणखी वाढणार आहे. नव्या पिढीचा मोबाईल म्हणजे अत्यावश्यक असं एक अविभाज्य अंग बनलय.मोबाईल शिवाय त्यांच पान हालत नाही.आपली हजारो कामं या मोबाईलमुळे चुटकीसरशी होतात.
मोबाईलमध्ये एक वेड लावणारी गोष्ट आहे ती म्हणजे ' सेल्फी ' होय.ह्या सेल्फीने सर्व जगाला वेड करुन टाकलय.मात्र या लॉकडाऊन काळात या ' सेल्फी ' जास्त झाला नाही. माणसाने मोबाईल बनवला आहे की, मोबाईलने माणूस बनवला आहे, असा प्रश्न कधी कधी पडावा, इतका प्रत्येक जण आज मोबाईलच्या आहारी गेला आहे. मोबाईल गरजेचा आहेच, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण, मोबाईल ही एक सुविधा आहे.
कुटुंबातील कोणत्याच व्यक्तिला ह्या मोबाईलमुळे एकमेकांशी बोलायला पण वेळ नसतो.प्रत्येकजण घरात आला की आपापला मोबाईल घेऊन बसतो. मुलांनाही आपल्या आई-बाबांना काही सांगायच असल्यास आई-बाबांच्या हातात मोबाईल नसेल तेव्हाच संवाद साधावा लागतो.संवाद होत नसल्याने व शेजारी बसलेल्या आपल्या जिवलगाला सहवास द्यायला मात्र एकमेकांना वेळ नसल्याने नव्या जोडप्यांचे घटस्पोट झाले आहेत.तसेच मोबाईलने डोळ्यांचे विकार, मानदुखी व इतरही अनेक दुष्परिणाम अनेकांना झाले आहेत. आपण मोबाईल नावाच्या एका यंत्राच्या आहारी गेलो आहोत. मोबाइलचे चांगले फायदेही आहेत. पण त्याचा उपभोग घेताना गरजेपेक्षा जास्त वापर झाला की त्यातून वाईटच परिणाम दिसून येतात.स्वत:चं आरोग्य, उत्साह, प्रसन्नता यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतांना कृत्रीम साधण्यासोबत वेळ घालवणं योग्य वाटतयं का?
तरीही मोबाईल फोन माणसाचा जीवलग मित्र बनला आहे.
No comments:
Post a Comment