Tuesday, July 28, 2020

ओढ भेटीची
                                                       ओढ भेटीची


खूप दिवसात मित्रमंडळींची व नातेवाईकांची भेट झालेली नसल्याने सर्वांना एकमेकांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली आहे.प्रत्येकजण फोनवर, व्हिडीयो कॉलवर किंवा चॅट करतो तरी देखील सर्वजण एकत्र भेटण्यासाठी आतुर झालेले दिसतात.प्रत्येकाला भेटीची ओढ लागलेली दिसते.ही प्रतिक्षा कधी संपणार? आपण कधी भेटणार अशी सारखी  विचारणा होत आहे.प्रियजणांना प्रत्यक्ष भेटण्याची मजा काही औरच असते नाही.. 

मनात असलेली भेटण्याची अंतरीक ओढ व मनात होत असलेली घालमेल प्रत्येकजणा बोलून दाखवत आहे. आठवणीवर सगळे जगत आहेत. मित्रांना भेटण्याची ओढ,प्रेमी प्रेमिकाला भेटण्यास आतुर, महिलांची मैत्रिणींना भेटण्याची इच्छा,ज्येष्ठांना आपल्या मित्रांची आठवण येत असल्याने भेट घेणे गरजेचे झाले आहे. सर्वात जास्त लहान मुलांना त्यांच्या संवगड्यांच्या भेटीपासून दूर ठेवणे पालकांना कठीण जात आहे. जवळचे मित्र व नातेवाईक यांच्याशी फक्त फोनवर बोलून समाधान होत नाही. त्यांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यात जो आनंद मिळतो तो फोनवर नसल्याने अनेकांची नाराजी आहे.

बदलत्या काळानुसार जडणघडण बदलत आहे पण भावना मात्र त्याच आहेत यात शंका नाही.प्रत्यक्ष भेटता येत नसलं म्हणून ऑनलाइन माध्यमांचा वापर करून भेट घडवली जात आहे.वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत.ऑनलाइन भेटी होत असल्या तरीही  भेटण्याची इच्छा कमी न होता ती सतत वाढत आहे. मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष भेटता येत नसल्यामुळे सोशल लाइफ सुद्धा पूर्णपणे विस्कटले आहे. तरुणाईचा जास्तीत जास्त वेळ हा इंटरनेट वर वाया जात आहे.तंत्रज्ञानाचा उपयोग करून मैत्री जपण्याच्या आजच्या पिढीचा मार्ग जरी सोपा असला तरी प्रत्यक्ष मित्रांची भेट घेण्याचा आनंद वेगळाच आसतो.

भेट हेत नसल्याने मानसिक तणावाखाली प्रेमभंग झाले आहेत. ज्येष्ठ मंडळी आजारी पडली आहेत. पर्यटन नसल्याने पर्यटक भ्रमिष्ठ झाले आहेत.महिला वादावादी विसरल्या आहेत. लहान मुलं मोबाईलचा गेममध्ये गुंतली आहेत. व्यसन करणा-यांना एकट्याने व्यसन करायला लागणे हे मोठे दू:ख झाले आहे.काही सण साजरे झाले तेही घरातल्या घरातच आणि आपल्या कुटुंबातच.कोणाला भेटताही आले नाही. कौटुंबिक सोहळे देखील ऑनलाईन साजरे झाले. भेटणे दूरच राहिले.  


ब-याच वर्षांनी, एकत्र काम केलेले आणि आता लांबलांब राहणारे आम्ही मित्र परवा ऑनलाईन भेटलो. पूर्वी केलेल्या मस्तीच्या आठवणीने सर्वजण सुखावले.त्या सोनेरी दिवसांची आठवण काढीत जुने क्षण जिवंत केले. काही मित्रांची आठवण काढली. पुढच्या भेटीत त्यांनाही सामिल करणार आहोत. या ऑनलाईन भेटीने सुखावलो पण मन भरले नाही. म्हणुनच आम्ही प्रत्यक्ष भेटणार आहोत.  
निकटवर्तीयांसोबत सुख दु:खाच्या शेअरिंग साठी प्रत्यक्ष भेटणे जरुरीचे झाले आहे.  

आपण भेटीची वाट पाहत असलो तरीही अजून काही दिवस प्रत्यक्ष भेटण्याचा मोह आवारला पाहिजे. 

No comments: